नवी मुंबई

नारळी पौर्णिमेच्या दिवशी सागराला सोन्याचा नारळ अर्पण केल्यानंतर कोळी बांधव मासेमारीला सुरुवात करतात. त्यामुळे किनारी भागातील संस्कृतीचा महत्त्वाचा सण असलेल्या नारळीपौर्णिमेच्या दिवशी नवी मुंबईतील सर्वच खाडीकिनाऱ्यांवर, कोळीवाड्यांत बुधवारी  उत्साह पाहायला मिळाला. दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या जल्लोषात आणि भक्तिभावाने नारळी पौर्णिमा साजरी करण्यात आली.

बुधवारी सकाळपासून ऐरोली, दिवा कोळीवाडा, वाशी खाडीकिनारा, सारसोळे जेट्टी, बेलापूर दिवाळे गावासह समस्त कोळीवाड्यांमध्ये जल्लोशाचे वातावरण होते. अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत धूमधडाक्यात सोहळ्याची सुरुवात झाली. सारसोळे कोळीवाडा येथून सकाळी साडेअकराच्या सुमारास पालखी मिरवणुकीला सुरुवात झाली. पालखीत सोन्याचा नारळ ठेवून वाजतगाजत पालखी सारसोळे खाडीच्या दिशेने रवाना झाली. यावेळी कोळी बांधव आपल्या पारंपरिक वेशभूषेत या मिरवणुकीत सहभागी झाले होते. महिलांचे पारंपरिक पेहराव, दागिने सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. यावेळी पारंपरिक संगीताच्या तालावर अनेकांनी ठेका धरला. एका मोठ्य कौटुंबिक सोहळ्याप्रमाणे अनेक जण आपलेपणाने या पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते.

सणासाठी खाडीजवळील जेट्टीच्या परिसराची साफसफाई करण्यात आल्याने जेट्टीला नवीन रूप आले होते.बुधवारी सकाळी नारळाची विधिवत पूजाअर्चा करून समुद्राला नारळ अर्पण करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन सारसोळे कोळीवाडा ग्रामस्थ मंडळ यांनी केले होते.सारसोळे कोळीवाड्यातून ग्रामस्थ  आणि कोलवाणी माता मित्र मंडळाच्या माध्यमातून साजरी करण्यात येणारी नारळी पौर्णिमा बहूचर्चित व आकर्षणाचा विषय बनली आहे.  सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास सारसोळे कोळीवाड्यातील कोलवाणी मातेच्या मंदिरापासून पालखी सोहळ्यास सुरूवात झाली. कोळी समाजातील पुरूष, महिला आणि लहान मुले पारंपारिक वेशामध्ये या पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते.शिरवणे ,दिवाळे याठिकाणी ही मिरवणूक काढण्यात आली होती.

पालखी सोहळ्यामध्ये देवीचे दर्शन घेण्यासाठी व पालखीला खांदा लावण्यासाठी ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री  गणेश नाईक सहभागी झाले होते,आमदार मंदाताई म्हात्रे याशिवाय  नगरसेवक सुरज पाटील,  प्रभाग समिती अध्यक्षा रूपाली  भगत,नगरसेवक सुरज पाटील  नगरसेविका सुजाताताई सुरज पाटील,  राष्ट्रवादी  तालुकाध्यक्ष गणेश भगत यांच्यासह राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवर सहभागी झाले होते.

अवश्य वाचा