धाटाव

रोहा रेल्वे स्टेशन यार्डात डोलवी येथील जे. एस. डब्ल्यू.कंपनीला लागणारा माती सारखा लोखंडी कच्चा मालाची वाहतूक केली जाते. हा माल जरी रेल्वे यार्डात उतरवला जात असला तरी त्याची वाहतूक धामणसई पंचक्रोशीतील नागरिकांच्या रोजच्या वाहतुकीच्या मार्गावरून केली जात आहे. पावसाळा सुरु असल्यामुळे या संपूर्ण मार्गावर लोखंडी चिखल मातीचे साम्राज्य पसरलेले दिसत आहे. त्यामुळे येथील नागरिकांना व डॉ. चिंतामणराव देशमुख कॉलेज विद्यार्थ्यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळ्याच्या सुरवाती पासुनच नागरिकांना त्रासदायक ठरणाऱ्या या समस्येकडे मध्य रेल्वे प्रशासनासह स्थानीय प्रशासकीय अधिकारी वर्गाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. काही दिवसांवर आलेल्या गणेशोत्सव लक्षात घेत प्रशासनाने हा संपूर्ण रस्ता गणरायाच्या आगमनासाठी दुरुस्त करावा अशी मागणी पंचक्रोशीतील नागरिकांतून होत आहे. हा रस्ता दुरुस्त न झाल्याने रेल्वे सह तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलनाचा पवित्रा उचलावा लागेल अशी भूमिका त्रस्त नागरिकांनी व्यक्त केली आहे.

रोहा रेल्वे स्थानकाच्या मालवाहतूक यार्डात पावसाळा सुरु झाल्यापासून डोलवी (पेण) येथील जिंदाल स्टील कंपनीला लागणारा लोखंडी कच्चा माल उतरवला जात आहे. हा माल एक परप्रांतीय ठेकेदार रेल्वेच्या मालगाडीमधून आणून रोहा स्थानकात उतरवत आहे.रोहा येथे रेल्वे वाघिणीमधून उतरवलेला हा माती सदृश्य लोखंडी अवजड माल नंतर डंपरमध्ये भरून रोहा नागोठणे राज्य मार्गाचा वापर करत पुढे त्यांच्या कंपनीपर्यंत वाहतूक केली जाते. रोहा रेल्वे यार्डाला लागुनच धामणसई, सोनगाव, गावठाण, मालसई, मुठवली या पंचक्रोशीतील गावाना रोहा शहराशी जोडणारा प्रमुख जिल्हा मार्ग गेला आहे. मध्य रेल्वेने आपल्या यार्डाला कोणतीही संरक्षण भिंत न बांधल्यामुळे यार्डातील हा बहुतांशी लोखंडी माल या रस्त्यावर आला आहे. रेल्वेमधून उतरवलेला हा माल यार्डात मोठया दहा चाकी डंपरमध्ये भरल्यानंतर वाहतूक ठेकेदार हे नागरिकांचे रहदारीचा रस्ता वापरून त्यावरून आपली वाहने नेत आहेत. त्यामुळे जवळपास एक किमिच्या अंतराचा रस्ता संपूर्ण चिखलमय झाला आहे. दुचाकी वरुन जाताना दुचाकी घसरून छोटेमोठे अपघात घडत आहेत. स्थानिक नागरिकांनी माणुसकी म्हणून येथील संबंधित लोकांना हा चिखल हटविण्यास सांगितल्याने त्यांना दमदाटी केली जाते.

रात्रीच्या वेळी मालाने भरले डंपर संपूर्ण रस्त्यावर उभे केल्याने वाहने व दुचाकी स्वाराना मार्ग काढताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. यामुळे एखादा गंभीर अपघात होवून जीवितहानी झाल्यावरच रेल्वे सह स्थानिक प्रशासनाला जाग येणार आहे का असा सवाल स्थानिकांचे मधून विचारला जात आहे. धामणसई ग्रामपंचायतीमधील नागरिकांना रोहा शहराशी जोडणारा हा जवळचा मार्ग आहे.रोहा रेल्वे स्थानक परिसरात जिंदाल कंपनीचा लोखंडी कच्चा माल उतरवून त्याची वाहतूक होत असल्यामुळे या भागात लोखंडी चिखलाने संपूर्ण रस्ता व्यापला आहे. यासंबधी वेळोवेळी संबधिताना तोंडी सांगूनही समस्या जैसे थे आहे. नागरिकांना होणाऱ्या या त्रासावर कायमची उपाययोजना रेल्वे व रोहा महसूल विभागाने करावी अन्यथा याविरुद्ध नागरिकांना आंदोलन करावे लागेल असे धामणसाई सरपंच शंकर काते यांनी सांगितले.

 

अवश्य वाचा

असे आणखी एन्काउंटर व्हावेत !