अलिबाग, 

    अलिबागमधील कच्छी भवन येथे रविवार, ११ ऑगस्ट रोजी अवयवदानासाठी काम करणार्‍या डॉक्टर्स व विविध संस्थांच्या प्रतिनिधींना मार्गदर्शनपर कार्यशाळा लायन्स क्लब पोयनाडच्या सहकार्याने महाराष्ट्र फडरेशन ऑफ ऑर्गन डोेनेशन व रिजनल कम स्टेट  टिश्यु ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेमध्ये मार्गदर्शन करण्यासाठी केईएम हॉस्पिटल, परेल येथून डॉक्टर योगेश नाईक, फेडरेशनचे संचालक पुरुषोत्तम पवार व श्रीमती मीरा सुरेश उपस्थित होते. 

     या कार्यशाळेत नेत्रदान, त्वचादान देहदान कोठे करावे, कोणाशी संपर्क साधावा याची माहिती देण्यात आली, तसेच जर रुग्ण ब्रेनडेड असेल तर कसे ओळखावे, त्यासाठी कोणाशी संपर्क साधावा, कार्यकर्त्याचा नेमका सहभाग कसा असावा हे सांगण्यात आले. लायन्स हेल्थ फाउंडेशन, सिव्हील हॉस्पिटल, अलिबाग येथे नेत्रदानासाठी संपर्क व किटची व्यवस्था करण्याचे ठरले, तसेच त्वचादानासाठी पुढील ट्रेनिंग घेण्यासाठी डॉ. रवींद्र म्हात्रे व डॉ. प्रकाश जाधव यांनी तयारी दर्शविली. १८ तारखेनंतर हे ट्रेनिंग ऐरोली येथील बर्न सेंटरमध्ये देण्यात येईल. सहा महिन्यात स्किन रिट्रिवल सेंटर प्रयास हॉस्पिटल कार्लेखिंडीत उपलब्ध होईल. या कार्यशाळेमुळे तीन ते चार लोकांवर अवलंबून न राहता ४२ कार्यकर्त्यांची टीम आता रायगडमध्ये कार्यरत असेल. त्यामुळे रायगडमधील नेत्रदान, त्वचादान, देहदानाचा टक्का वाढेल. 

     पोयनाड लायन्स क्लबचे अध्यक्ष मनीष अग्रवाल व झोन चेअरमन प्रदीप शंकर यांनी या कार्यशाळेत शुभेच्छा दिल्या तसेच लागेल ते सहाय्य करण्याचे आश्वासन अभिवचन दिले. यावेळी सिव्हील हॉस्पिटलचे  सुधीर पाटील यांचा नेत्रदानाच्या कार्यासाठी सत्कार करण्यात आला.

      या कार्यशाळेस डॉ. रवींद्र म्हात्रे, डॉ. अभिजीत घासे, डॉ. कविता रुईकर, लायन्स हेल्थ फाऊंडेशनच्या डॉ. वर्षा नाईक,  आनंद ज्ञाने, सिव्हील हॉस्पिटलचे डॉ. दीपक गोसावी व त्यांचे सहकारी, तसेच  वंदे मातरम ग्रुप, ज्येष्ठ नागरिक संस्था अलिबागच्या सदस्यांची उपस्थिती होती.

    या कार्यक्रमाचे प्रास्ताविक फेडरेशनच्या रायगड डिस्टिक कोऑर्डिनेटर शुभदा कुरतडकर यांनी केले. तर सूत्रसंचालन अलिबागच्या वैशाली केतन शहा यांनी केले.  या कार्यक्रमाचे नियोजन केतन शहा, अनिल अगाशे, शुभदा कुडतरकर यांनी लायन्स क्लब पोयनाडच्या सहकार्याने केले.

अवश्य वाचा

असे आणखी एन्काउंटर व्हावेत !