अलिबाग 

भारतीय ग्रंथालय चळवळीचे जनक डॉ. एस.आर. रंगनाथन यांच्या जयंती निमित्त प्रभाकर पाटील सार्वजनिक वाचनालय व तालुका ग्रंथालय अलिबाग येथे त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली.

यावेळी प्रभाकर पाटील सार्वजनिक वाचनालयाचे ज्येष्ठ संचालक सखाराम पवार यांच्या हस्ते डॉ. एस.आर. रंगनाथन याच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी रायगड जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष ग्रंथमित्र नागेश कुळकर्णी, ज्येष्ठ साहित्यिक आणि वरिष्ठ पत्रकार उमाजीदादा केळुसकर, माजी नगरसेवक आर.के. घरत, ज्येष्ठ नागरिक संघ भालचे अध्यक्ष श्रीरंग घरत, जिल्हा रुग्णालयातील रक्तपेढी तंत्रज्ञ हेमकांत सोनार, ज्येष्ठ नाट्यकर्मी शरद कोरडे, जिल्हा पोलीस पाटील संघटनेचे सचिव विकास पाटील, तसेच प्रभाकर पाटील सार्वजनिक वाचनालयाच्या ग्रंथपाल ज्योती म्हात्रे  आदी उपस्थित होते.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना रायगड जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष ग्रंथमित्र नागेश कुलकर्णी यांनी डॉ. एस.आर. रंगनाथन यांचे ग्रंथालय चळवळीतील योगदानाबद्दल माहिती देताना सांगितले की, ग्रंथालयांचे विकासात डॉ. रंगनाथन यांचा फार मोठा वाटा आहे. देशातील सर्वसामान्यांना ज्ञानाची कवाडे विनामूल्य खुली करण्याचा विचार सर्वप्रथम डॉ. रंगनाथन यांनी रुजविला. नंतर तो जोेपासण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य झिजवले. सुसंस्कृत समाज निर्मितीसाठी शालेय शिक्षणासोबतच निरंतर शिक्षण देखील किती आवश्यक असते याचे महत्व डॉ. रंगनाथन यांनी पटवून दिले. ग्रंथालयाचे जतन करणारा ग्रंथपालही मोठा महत्वाचा घटक  आहे.

यावेळी आयोजित केलेल्या पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन वरिष्ठ पत्रकार उमाजीदादा केळुसकर यांनी केले. प्रभाकर पाटील सार्वजनिक वाचनालयाच्या ग्रंथपाल सौ. ज्योती म्हात्रे या गेली बावीस वर्षे चांगल्या प्रकारे ग्रंथपाल पद भूषवित असल्याबद्दल त्यांना रायगड जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष नागेश कुळकर्णी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

 

अवश्य वाचा