उरण

     उरण तालुका व शहरातील वीज पुरवठा वारंवार खंडीत होत आहे. तसेच विजेचा लोड कमी जास्त होत असल्याने वीज उपकरणांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याच जाब विचारण्यासाठी उरण शिवसेना ग्राहक कक्षाच्या वतीने वीज कार्यालयावर धडक दिली. यावेळी उप कार्यकारी अभियंता हरिश्चंद्र चोंडे यांना निवेदन देण्यात आले.

     पावसाळा सुरुवात झाल्यापासून विजेचा खेळखंडोबा मोठ्या प्रमाणात सुरू झाला आहे. याचा त्रास सर्वसामान्य जनतेला सहन करावा लागत आहे. त्यात विजेचा लोड कमीजास्त होत असल्याने अनेकांची घरातील विजेची उपकरणे जळून आर्थिक भुर्दंड बसला आहे. त्यात काही दिवसांवर हिंदूंचे आराध्यदैवत गणरायाचे आगमन होणार आहे.  त्यावेळी विजेचा पुरवठा सुरळीत ठेवण्यात यावा यास मागणीसाठी शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्या वतीने जिल्हाप्रमुख रमेश म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली उपजिल्हाप्रमुख नरेश रहालकर, नगरसेविका वर्षा पाठारे, माजी नगरसेविका सुजाता गायकवाड, धीरज बुंदे, संदीप जाधव, गजानन माळी, अजय सुतार, चेतन म्हात्रे, विना तलरेजा, मेघा मेस्त्री, केशव यादव आदींनी वीज कार्यालयावर धडक देत उपकार्यकारी अभियंता हरिश्चंद्र चोंडे यांची भेट घेत चर्चा केली. 

     सदरची चर्चा सकारात्मक होऊन त्या सोडविण्याचा आपण निश्चितच प्रयत्न करू असे अधिकारी चोंडे यांनी सांगितले. त्यानंतर शिवसेना ग्राहक कक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आले.  त्यामध्ये वीज पुरवठा नियमित करावा, विजेमुळे नुकसान झालेल्यांना भरपाई मिळावी, तक्रार फोन नेहमीच सुरू ठेवून तकारींचे निवारण करावे, वीज डीपी सुरक्षित ठेवणे, वेळच्या वेळी वीज रिडींग घ्यावी. आदी मागण्यांचा समावेश आहे. त्या मार्गी लावण्याचे चोंडे यांनी आश्वासन दिले.

अवश्य वाचा