नेरळ,ता.13

     नेरळ-माथेरान रस्त्यावर असलेल्या हुतात्मा चौकात हुतात्मा स्मारक समिती च्या वतीने 14 ऑगस्ट च्या मध्यरात्री तिरंगा फडकविला जाणार आहेत.हुतात्मा स्मारक समितीकडून गेली 13 वर्षे भारताचा स्वातंत्र्य दिन 14 ऑगस्ट च्या मध्यरात्री 12 वाजून 1 मिनिटांनी तिरंगा फडकवून साजरा केला आहे.

     150 वर्षांच्या प्रदीर्घ गुलामगिरी नंतर आणि अनेक क्रांतिकारकांच्या बलिदानानंतर 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्याची सुवर्ण पहाट उगवली. 14 ऑगस्टच्या मध्यरात्री लालकिल्यावर राष्ट्रध्वज डौलाने व दिमाखात फडकला. त्या ऐतिहासिक क्षणांच्या आठवणी जागृत ठेवण्यासाठी दरवर्षी प्रमाणे यंदाही देशाचा स्वातंत्र्यदिन सोहळा साजरा करण्यात येणार आहे. यावेळी मध्यरात्रीचे ध्वजारोहण होणार असून सीआएसएफचे माजी डेप्युटी कमांडर तथा कर्जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या हस्ते तिरंगा फडकवण्यात येणार आहे.तर नेरळ गावातून दहावी च्या परीक्षेत पहिली आलेल्या पूर्वा फराट या विद्यार्थिनीचा सत्कार समिती कडून केला जाणार आहे.

     नेरळ येथील कर्जत कल्याण राज्यमार्ग रस्त्यावर असलेल्या हुतात्मा चौकात मध्यरात्रीचे ध्वजारोहण हा कार्यक्रम दरवर्षी प्रमाणे हुतात्मा स्मारक समितीच्या वतीने यंदाही साजरा होणार आहे. या कार्यक्रमात शेकडो तरुणांच्या उपस्थितीत मशाल फेरी निघणार आहे. नेरळ मधील हुतात्मा चौकातून निघालेली मशाल फेरी जिजामाता तलाव,कुंभारआळी,छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे बाजारपेठेतून हेट्करआळी व पुन्हा हुतात्मा चौकात 12 वाजेपर्यंत पोहचेल. त्यानंतर सीआएसएफचे माजी डेप्युटी कमांडर तथा कर्जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल घेरडीकर यांच्या हस्ते 12 वाजून एक मिनिटांनी तिरंगा फडकवण्यात येणार आहे. तद्नंतर प्रमुख पाहुणे असलेले घेरडीकर हे उपस्थित तरुणांना व विद्यार्थ्यांना त्यांच्या काश्मीर मधील आपल्या सेवेतील आठवणीना उजाळा देतील. मागील वर्षी हुतात्मा स्मारक समितीच्या वतीने रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते जागतिक कीर्तीचे मानसोपचार तज्ञ डॉ. भरत वाटवाणी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले होते. याठिकाणी ध्वजारोहण करण्याची संधी हि रॅमन मॅगसेसे पुरस्काराहून अधिक भाग्याची आहे असे गौरोदगार त्यांनी काढले होते. दरम्यान दरवर्षीप्रमाणे यंदाही तरुण, विद्यार्थी, मान्यवर, व नेरळकर मोठ्या प्रमाणात उपस्थित राहणार असल्याची माहिती समितीने दिली.

अवश्य वाचा