अलिबाग 

आठ दिवसापूर्वी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती. या अतिवृष्टीने पूरस्थिती, डोंगर, दरड कोसळली. अलिबाग तालुक्यात खानाव येथील वेलटवाडी गावात डोंगर कोसळल्याने येथील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. याचवेळी अलिबाग रोहा रस्त्यापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या महान आदिवासी वाडीवर डोंगर कोसळला होता. यामुळे डोंगराच्या मातीचा ढिगारा शेतकऱ्याच्या शेतात घुसला आहे.

अतिवृष्टीने अलिबाग तालुक्यातील वन विभागाच्या अखत्यारीत असलेल्या डोंगराचा मोढा भाग कोसळून शेतकऱ्याच्या शेताता आला. त्यामुळे सहा ते सात जणांच्या शेतात मातीचा ढिगारा आला आहे. यामुळे शेतीचे नुकसान झाले आहे. मात्र, याबाबत जिल्हा प्रशासनाला कोणतीच माहिती नसल्याने याठिकाणी प्रशासनाचे कोणीही अधिकारी पोहोचलेले नाहीत. यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीच्या नुकसानीचा पंचनामा करण्यात आलेला नाही.

भाया लेंडी, भाग्या लेंडी, जानू काष्टी व इतर पाच जणांच्या शेतात ही माती व झाडे झुडपे वाहून आली आहेत. डोंगराच्या मातीचा ढिगारा व झाडे झुडपे शेतात वाहून आल्याने लावलेली शेतीची पिके नष्ट झाली आहेत. पिकत्या शेतात गुडघाभर माती साचल्याने लागवडीची जमीन नष्ट झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान झाले आहे. एवढी नैसर्गिक आपत्ती येऊनही महसूल विभागाचा एकही कर्मचारी, अधिकारी याठिकाणी पोहोचलेला नाही. त्यामुळे शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करून त्वरित नुकसान भरपाई मिळावी, अशी विनंती येथील आदिवासी शेतकरी करत आहेत.

अवश्य वाचा

सारे काही पाण्यासाठी..,