पोलादपूर 

तालुक्यातील कशेडी घाटातील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरील कशेडी घाटातील धामणदिवी गावाजवळील दरवर्षी कोटयवधी रूपयांची मलमपट्टी करूनही धोकादायक होत खचणारी मोरी आणि खेडचा ऍप्रोच रोड खचणारा जगबुडी नदीवरील पुल दाखविण्यासाठी येत्या शनिवार, दि.17 ऑगस्ट 2019 रोजी रायगड लोकसभा मतदार संघाचे खासदार सुनील तटकरे यांनी राष्ट्रीय महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सर्वच अभियंत्यांना पाचारण केले आहे.

कशेडी घाटातील धामणदिवी गावाच्या हद्दीतील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरील सुमारे 98 मीटर्स लांबीची मोरी दरवर्षी खचत असून यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी बांधकाम विभागाने मेगाब्लॉकही घेतला आहे. मात्र, कोटयवधी रूपये खर्च करूनही कायमस्वरूपी उपाययोजना न होताच याठिकाणी मलमपट्टीच झाल्याने हा भूभाग खचत आहे.

याखेरिज, खेड भरणानाक्यावरील जगबुडी नदीवरील पुल अनेक वर्षे ऍप्रोचरोड विना ठेऊन अचानक तातडीने ऍप्रोचरोडचे काम पुर्ण करून वाहतुकीस खुला करण्याचा प्रयत्न केल्यानंतर रस्त्याची चाळण होऊन वाहतुकीस अडथळा झाला. यामुळे जनतेची गैरसोय लक्षात घेणाऱ्या राजकीय नेत्यांविरूध्द गुन्हे दाखल होऊन पेच निर्माण झाला आहे.

कोकणातील अनेक नेत्यांनी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दुरवस्थेकडे लक्ष देऊन संबंधित अभियंत्यांविरूध्द गुन्हे दाखल करू असे सत्तेत असताना सांगूनही तसे केले नव्हते. मात्र, रस्त्याच्या दुरवस्थेमुळे संबंधित अभियंत्यांवर विरोधी राजकीय पक्षातील नेत्यांनी जाब विचारला असता त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यास सध्याचे सत्ताधारी प्रोत्साहन देत असल्याने आता पोलादपूरच्या कशेडी घाटात आणि खेडच्या जगबुडीवर या पार्श्वभूमीवर कोणते नाटय घडते, हे महत्वाचे ठरणार आहे.

अवश्य वाचा