मुंबई, दि. १०

आषाढी वारीच्या तोंडावर देहू नगरीतील इंद्रायणी नदीत हजारो

मासे मृत अवस्थेत आढळले आहेत. यामुळे इंद्रायणीचे पावित्र्य धोक्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांनी

‘रिव्हर अँथम’च्या नावाखाली गाणी गाण्यापेक्षा नद्यांना प्रदूषणमुक्त करण्यासाठी एखादा ठोस

कार्यक्रम हाती घेतला असता तर ही घटना झाली नसती, अशी टीका प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस

व प्रवक्ते सचिन सावंत यांनी सोमवारी केली.

इंद्रायणी नदीत मृत मासे सापडल्याच्या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना सावंत बोलत होते.

आषाढीवारीनिमित्त लाखो वारकरी इंद्रायणी नदीत स्नान करत असतात. मात्र, नदीत मैलायुक्त

सांडपाणी व रासायनिक पाणी सोडले जात असल्यामुळे या नदीचे पावित्र्यच धोक्यात आले आहे.

अशा प्रदूषित पाण्यात वारकऱ्यांनी स्नान कसे करायचे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

‘रिव्हर अँथम’च्या नावाखाली मुख्यमंत्र्यांनी राज्यातील वरिष्ठ अधिकारी, मंत्री यांना संगिताच्या

तालावर ठेका धरायला लावला. मुख्यमंत्री कार्यालयाने नद्यांसंदर्भात अनेक स्वयंसेवी संस्थांना

बरोबर घेऊन रिव्हर ऍथॉरिटी स्थापन करू असे म्हटले होते. त्याचे काय झाले? नद्यांचे

पुनरूज्जीवन करण्यासाठी काही उपयोग झालेला तर दिसत नाही. म्हणजे रिव्हर अँथम हा केवळ

करमणुकीचा भाग होता का, असा सवालही त्यांनी केला.

अवश्य वाचा