इ.स.१९०८

            भारतीय क्रांतिकारकांचे  पिस्तूल हे ब्रिटिशांच्या विरोधात  वापरलेले प्रभावी हत्यार, पिस्तुलापेक्षाही प्रभावी असे हत्यार म्हणजे बॉम्ब .या बॉम्बचे  तंत्र स्वा.सावरकर व सेनापती  बापट यांनी भारतात आणले.त्याचा यशस्वी प्रयोग ३० एप्रिल, १९०८ रोजी खुदीराम बोसने केला. किंग्जफोर्डवर याच दिवशी बॉम्ब फेकून बॉम्ब युग भारतात अवतरले ते खुदीराम बोसमुळेच. 

                      खुदीराम बोस यांचा जन्म ३ डिसेंबर, १८८९ रोजी बंगालमधील मिदनापूर जिल्ह्यातील बहुवैनी या गावी झाला. शाळेत असताना बेंचवर गुद्दे मारण्याच्या स्पर्धेत आपला हात रक्तबंबाळ होईपर्यंत ते गुद्दे मारतच राहिले होते. एकंदरीत लहानपणापासूनच त्यांचा स्वभाव जिद्दी, हार न मानणारा होता.

                  १९०५ मध्ये बंगालच्या फाळणीमुळे सारा भारत पेटला होता. खुदिरामनेही आपले शिक्षण सोडले आणि  क्रांतिकारी  चळवळीत सामील  झाले.त्यांच्या नेतृत्वाखाली  मिदनापूर येथील विदेशी भांडारावर हल्ला चढविण्यात  आला. पोलिसांना लाथाबुक्क्या  मारून 'सोनार बंगला' या जहाज  पत्रकाच्या प्रती मिदनापूर येथे  शेतकी  व औद्योगिक  प्रदर्शन  पाहण्यासाठी आलेल्या हजारो लोकांना वाटल्या.याबद्दल  राजद्रोहाच्या आरोपावरून त्यांना अटकही करण्यात आली होती. तरीही खुदीरामची क्रांतिकार्य थांबली नाहीत .बंगाल्या गव्हर्नरला ठार मारण्याच्या अयशस्वी प्रयत्न त्यांनी केला . क्रांतिकार्यासाठी पैसा लागतो यासाठी त्यांनी दोन गोष्टी  केल्या.पहिली गोष्ट म्हणजे सरकारी खजिन्याची लूट आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःच्या गरजा मर्यादित केल्या.या सुमारास वंगभंग चळवळीत  अनेकांना क्रूर शिक्षा  ठोठावणाऱ्या न्यायाधीशाचे नाव  होते किंग्जफोर्ड.त्याला कायमचा   धडा शिकवायचा असे युगांतर  या क्रांतिकारी समितीने ठरवले.

                या देशातील  लोकांना लाठ्याकाठ्यांनी  बडवायला पाहिजे या विचारांचा  किंग्जफोर्ड होता .त्याने १५ वर्षाच्या सुशीलकुमारांना हंटरने फटकावून काढले होते. संध्या, नवशक्ती, युगांतर इ.पत्रकांच्या  संपादकांना सश्रम  कारावासाच्या शिक्षा ठोठावल्या होत्या .याबद्दल  अरविंद बाबूंनी त्याच्यावर  टीका केली .तोच इंग्रजांनी किंग्जफोर्डची सेशन्स जज्ज  म्हणून नेमणूक करून त्याला बढती दिली.या प्रकरणामुळे  क्रांतिकारकांच्या जखमेवर मीठ चोळले गेले. युगांतर समितीने किंग्जफोर्डला उडविण्याचा  कामासाठी खुदीराम बोस  आणि प्रफुल्लकुमार चाकी यांची निवड केली. २४ एप्रिल , १९०८ रोजी हे दोघे  किंग्जफोर्डला  मारण्यासाठी मुझफ्फरपूर येथे पोहोचले.एका धर्मशाळेत  मुक्काम  करून किंग्जफोर्डच्या हालचालींवर त्यांनी लक्ष ठेवले. तेव्हा त्यांच्या असे लक्षात आले की , सायंकाळी युरोपियन क्लबमध्ये तो न चुकता येतो.

             ३० एप्रिल ,१९०८, वेळ रात्रीची साडेआठची. खुदिरामच्या हातात  चार इंच  परिघाचा तो टिन बॉम्ब होता.तोच किंग्जफोर्डची गाडी  युरोपियन क्लबमधून बाहेर येताना  दिसताच ती ऐतिहासिक क्रांतिकारी घटना घडली. ह्या  गाडीवर खुदीरामने बॉम्ब टाकला .बॉम्ब जरी  मुझफ्फरपूरमध्ये फुटला तरी त्याचा धमाका लंडनच्या  पार्लमेंटमध्ये ऐकायला  

आला.तथापि  या घोडागाडीत  किंग्जफोर्ड नव्हता . दोन इंग्रज महिला होत्या .हे खुदीरामला नंतर समजताच तो हळहळला  .तथापि या हल्ल्याने  किंग्जफोर्डची पाचावर धारणा  बसली.आपल्यामुळे ज्या माहिला मारल्या गेल्या त्या बघायला तो गेला नाही.इकडे गाडीवर बॉम्ब टाकल्यानंतर हे दोघे पळाले. पण खुदीराम पोलिसांच्या हाती लागला.त्याला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली.तत्पूर्वी प्रफुल्लकुमारने  स्वतःवर गोळी  झाडून आत्मबलिदान केले होते. 

                       मंगळवार, ११ ऑगस्ट, १९०८ हा त्यांचा फाशीचा दिवस निश्चित करण्यात आला होता. अखेरची इच्छा म्हणून देवीचा प्रसाद भक्षण  करून सायंकाळी सहाच्या  सुमारास शांतपणे खुदीरामची पावले वधस्तंभाकडे चालली  होती.फाशी देणाऱ्या मांगाशी स्मितहास्य करून हातात भगवदगीता घेऊन हसत हसत ते फाशी गेले.आणखी एका क्रांतिकारकाची स्वातंत्र्याच्या यज्ञात आहुती पडली .

अवश्य वाचा