जेएनपीटी दि९

योग्य प्रशिक्षण आणि घरच्या मंडळींच्या साथीने येत्या शनिवार पासून  उत्तराखंड येथे होणाऱ्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेच्या आखाड्यात उरणच्या खोपटे गावातील दंगल गर्ल अमेघा अरुण घरत ही राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत खेळणार आहे . आई सौ. अपूर्वा घरत आणि वडील श्री. अरुण घरत या पेशाने शिक्षक असलेल्या दाम्पत्यांच्या घरात जन्मलेल्या अमेघाचा वयाच्या चौथ्या वर्षांपासून असलेला क्रीडाक्षेत्राकडील कल तिच्या वडिलांनी तिच्या लहानपणीच हेरला होता. तिची विविध खेळांमधील आवड, जिद्द पाहून तिला घराच्या घरीच प्रशिक्षणाचे बाळकडू पाजण्यास सुरुवात केली. तिला विविध खेळांचे प्रशिक्षण देण्यास सुरु केले.त्याचाच प्रत्यय म्हणून येत्या सतरा ते एकोणीस ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या उत्तराखंड येथील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत ती खेळणार आहे. 

वयाच्या सातव्या वर्षी वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून क्रीडा क्षेत्रात आपलं करियर घडविण्याचे  उद्दिष्ट समोर ठेवून आणि वडिलांकडून प्राथमिक प्रशिक्षण घेणाऱ्या अमेघाने इयत्ता तिसरीमधे असताना धावण्याच्या स्पर्धेत गुरुकुल अकॅडमी-उरण मधून पहिलं तालुका स्तरीय पारितोषिक मिळवलं. त्यानंतर तिने मागे वळून न पाहता अनेक स्पर्धां मध्ये भाग घेतला. नेचर ग्रुप ऑफ-चिरनेर (उरण), उरण जिमखाना, गुरुकुल अकॅडमी-उरण, द्रोणागिरी स्पोर्ट्स-उरण, कर्नाळा स्पोर्ट्स-पनवेल, रामशेठ ठाकूर सामाजिक  संस्था -पनवेल आणि राज्य तसेच जिल्हा स्तरीय स्पर्धेमध्ये धावणे, लांब उडी, उंच उडी, हॅन्डबॉल, गोळा फेक, बुद्धिबळ, स्केटिंग आणि फुटबॉल यांसारख्या खेळांमध्ये आपली घोडदौड सुरु केली. या बहुतांशी  खेळांमध्ये अमेघाने आजतागायत शेकडो बक्षीसे आणि मेडल्स मिळवलेली आहेत. 

माध्यमिक शिक्षण घेत असताना (इयत्ता सातवी) फुटबॉल या खेळाकडे तिचा कल आणि मिळालेल्या संधीचं सोनं करत राज्यस्तरीय अनेक स्पर्धामधे तिने उत्तम कामगिरी केली आणि त्याच जोरावर अमेघाला राष्ट्रीय स्तरावर आपली प्रात्यक्षिके देण्याची संधी मिळाली. कोणीतरी आश्वमेघाला रोखावं तसंच अमेघाच्या स्फूर्तीला इयत्ता आठवीमधे असताना यापुढे मुलींसाठी फुटबॉलच्या स्पर्धा होणार नाहीत असं सांगून विद्यालयाकडून रोखण्यात आलं. नशिबात आलेली निराशा सोबत घेऊन अमेघाने तब्बल पाच वर्षे सर्वच खेळापासून अलिप्तपणाचा वनवास भोगत शिक्षणावर लक्ष केंद्रित केले.

उच्च महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना महाविद्यालयातील खेळ मंत्रालयाकडे मुलींच्या फुटबॉल टीम साठी काही वाव आहे का अशी विचारणा करत असताना. श्री. रुपेश पावसे (नुकतेच नियुक्त झालेले महाराष्ट्र कुस्ती कोच संघांचे मुंबई विभाग उपाध्यक्ष) यांनी अमेघाची शरीरयष्टी पाहून "तुला कुस्ती खेळायला आवडेल का? " अशी हाक दिली. आणि फक्त एका वर्षात खेळामधे प्रवीण तसेच कुशल असलेल्या अमेघाने विद्यापीठातील कुस्तीच्या सामान्यांत रौप्य पदक मिळवले तसेच महाराष्ट्राचा मानबिंदू असलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेपर्यंत ५० किलो या वजनी गटात मजल मारली. पारितोषिकांना गवसनी घालता आली नसली तरी स्पर्धेतील काही स्तर पार केलेल्या अमेघाने कोठेही न थांबता मेहनत आणि प्रशिक्षणाच्या जोरावर काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या ५५ किलो वजनी गटासाठी होणाऱ्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमधे आपली जागा बनवली आहे तिच्या या यशाबद्दल उरण तालुक्यातून अमेघां घरत हिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. 

अवश्य वाचा