अखेर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी स्वबळाचा नारा दिला. लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर दुसर्‍यांदा पंतप्रधानपदाची शपथ नरेंद्र मोदी घेत असतानाच राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील महत्त्वाचा पक्ष असलेल्या जनता दल युनायटेडचे सर्वेसर्वा नितीशकुमार यांनी नाराजीचा बिगुल वाजवला आणि एनडीएमध्ये सारे काही आलबेल नसल्याचे संकेत दिले होते. नरेंद्र मोदी सरकारमध्ये आपल्या पक्षाला कॅबिनेट खाती जास्त मिळतील, अशी अपेक्षा नितीशकुमार यांची होती. मात्र, त्यांची अवघ्या एका मंत्रीपदावर बोळवण करण्यात आल्याने, ते नाराज झाले. जेडीयूचे १६ खासदार बिहारमध्ये निवडून आले आहेत. अटल बिहारी वाजपेयी सरकारमध्ये जसे सर्व मित्रपक्षांना त्यांच्या यशाच्या प्रमाणात स्थान दिले गेले होते, ती अपेक्षा नितीशकुमार करत असतील. पण, तसे काही झाले नाही. यामुळे नितीशकुमार नाराज झाले आणि त्यांनी मंत्रिमंडळात सहभागी होण्यास नकार दिला. एनडीएतील आणखी एक महत्त्वाचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेचे १८ खासदार निवडून आले आहेत. गेली पाच वर्षे राज्य मंत्रिमंडळातील सदस्यांचे राजीनामे खिशात तयार असल्याची सिंहगर्जना करणार्‍या या वाघांच्या खिशातील राजीनामे तर बाहेर निघालेच नाहीत. उलट, यापुढे आता भाजपसोबत निवडणूक लढवणार नसल्याची घोषणाही अवघ्या काही महिन्यात हवेत विरली. सोळा खासदार असलेल्या जदयूने एकच मंत्रीपद मिळतेय म्हटल्यानंतर नाराजी जगजाहीर केली. मात्र, त्यापेक्षा दोन खासदार जास्त असतानाही एकाच पदावर शांत राहणे शिवसेनेने पसंत केले. यातूनच शिवसेनेची लाचारी दिसून येते. असो. तर मुद्दा हा की, आता नितीशकुमार स्वबळावर लढणार आहेत. जनता दल युनायटेड (जेडीयू) बिहारच्या बाहेर राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटक पक्ष म्हणून यापुढे राहणार नाही. तसेच, जेडीयू जम्मू-काश्मीर, झारखंड, हरियाणा आणि दिल्लीत होऊ घातलेल्या आगामी निवडणुकादेखील स्वबळावरच लढणार आहे. हा निर्णय रविवारी पाटणा येथे पार पडलेल्या जेडीयूच्या कार्यकारिणीच्या बैठकीत घेण्यात आला. आज झालेल्या बैठकीत नितीशकुमार काही तरी मोठा निर्णय घेतील, अशी अपेक्षा होतीच, तसेच त्यांनी केले. भाजप आपल्या मित्रपक्षांना नेहमीच फसवत आला आहे. विशेषत: पक्ष नरेंद्र मोदी आणि मोटाभाई अमित शहा यांच्या वर्चस्वाखाली आल्यानंतर तर कोणताही मुलाहिजा न ठेवता राजकारण करीत समोरच्याला संपवायचेच आणि आपली एकहाती सत्ता स्थापन करायची, असे धोरणच या दोघांचे राहिले आहे. यातूनच मग महाराष्ट्रातही शिवसेना आणि भाजपमध्ये गेल्या पाच वर्षांत अनेक कुरबुरी झाल्या. एकमेकांवर खालच्या पातळीवर जात आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. पण, अखेर लोकसभा निवडणुकीत दोघांनी जुळवून घेत यश पदरी पाडले. बिहारमध्ये तर भाजपने नितीशकुमार यांच्यासमोर अक्षरश: लोटांगण घातले, असे म्हणता येईल. गेल्या लोकसभा निवडणुकीत जिंकलेल्या जागांपेक्षा कमी जागा लढवत नितीशकुमारांना खूष ठेवण्याचा निर्णय भाजपने घेतला. लोकसभा निवडणुकीत अपेक्षित नसेल एवढे यश भाजपला मिळाले. त्याबरोबरच नितीशकुमार यांचेही १६ खासदार निवडून आले. तरीही नितीशकुमारांनी वेगळी वाट निवडली आहे. तूर्तास, बिहारमधील आघाडी एकसंघ असली तरी बिहारबाहेरील आघाडीतून जदयू बाहेर पडला आहे. तसे पाहिले तर, भाजप आणि नितीशकुमारांची अनेकदा मैत्री झाली, नंतर फारकतही झाली आहे. २०१५च्या विधानसभा निवडणुकीअगोदर देशात गोवंश हत्येवरुन, सरसंघचालकांच्या आरक्षण बंद करण्याच्या विधानावरुन जो उन्माद, गदारोळ माजला होता, त्यावर टीका करत नितीशकुमार यांनी ‘मोदीमुक्त भारत’ची घोषणा दिली. त्यांनी भाजपसोबतची अनेक वर्षांची युती तोडली आणि परंपरागत शत्रू असलेल्या लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाशी युती केली. बिहारच्या राजकारणात जातीय समीकरणे ही नेहमीच प्रभावशाली राहिली आहेत. पण, हिंदुत्वाच्या विचाराला विरोध करुन परंपरागत शत्रूशी मैत्रीचा हात पुढे करणे, हे तसे खळबळजनकच होते. या मैत्रीमुळे ‘महागठबंधन’ झालेल्या नितीश-लालू यांनी विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवले. भाजपचा बिहारमध्ये दारुण पराभव झाल्याचे पाहून मोदीविरोधी पक्षांमध्ये चैतन्य आले होते. पण, एक वर्षात नितीशकुमार लालूंच्या एकूण कार्यशैलीविषयी प्रश्‍न उपस्थित करत गेले. आपल्याला सरकार चालवता येत नाही, अशी विधाने त्यांनी केली आणि थेट मोदींच्या मांडीला मांडी लावून भाजपशी युती करुन लालूंना विजनवासात टाकले. नितीशकुमार केव्हा काय निर्णय घेतील, याचा काही भरवसा नाही. यामुळेच बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव हे नितीशकुमार यांना ‘पलटू चाचा’ असे संबोधतात. आता नितीशकुमारांनी बिहारच्या बाहेर एनडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थात, काही दिवसांनंतर ते बिहारमधील आघाडीतूनही बाहेर पडतील, याची पूर्ण खात्री राजकीय पंडितांना आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शहा या राजकीय चाणक्यांना तर ती नक्कीच असावी. देशातील सार्‍याच संस्था आपल्या कह्यात घेतलेल्या मोदी आणि शहा या जोडीला देशातील सर्वच प्रमुख पक्षांच्या नेत्यांच्या हालचालीवर नजर ठेवणे सहज शक्य आहे. कोणाला किती जवळ करायचे? कोणाला कशी जागा दाखवायची? याची पुरेपूर जाण त्यांना आहे. शिवसेनेला वेळोवेळी जागा दाखवण्याचे काम या जोडीने सहज केले आहे. यामुळे नितीशकुमारांच्या पुढील चालीचा अंदाज या जोडीला नक्कीच आला असणार. केंद्रीय मंत्रिमंडळापासून दूर राहणार्‍या नितीशकुमारांनी बिहारमधील मंत्रिमंडळ विस्ताराच्या वेळी भाजपला दूर ठेवले. यामुळे पुढील स्थितीचा अंदाज मोदी- शहांना आलाच आहे. यामुळे ते बिहारमध्ये नवा पर्याय तयार ठेवतील. तसा त्यांनी रामविलास पासवान यांच्या रुपाने तयार केला आहे, असे म्हणणे  थोडे धाडसाचे वाटते. कारण, नितीशकुमारांची ताकद आणि रामविलास पासवान यांची ताकद यांच्यात मोठे अंतर आहे. मात्र, तरीही मोदी-शहा जोडी यातून मार्ग काढतील.

अवश्य वाचा