नेरळ -माथेरान मिनिट्रेन सेवा प्रदीर्घ कालावधी करिता बंद करण्याचा कठोर निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतल्याबाबत नगरपालिकानगराध्यक्षा प्रेरणा प्रसाद सावंत यांनी मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांना निवेदन सादर करून ही सेवा लवकरच कामे पूर्ण करून सुरू करण्यात यावी यासाठीसमस्त माथेरानच्या जनतेच्या वतीने गाऱ्हाणे घातले आहे.

 इथल्या संपूर्ण पर्यटनाची एकमेव मदार ही नेरळ माथेरानच्या मिनिट्रेन वर अधोरेखित आहे. सध्या पावसाळ्यात अमनलोज ते माथेरान दरम्यान शटल सेवा उपलब्ध करून देत असताना नेरळ माथेरान ट्रॅक च्या घाटरस्त्यात प्रचंड प्रमाणात दरड कोसळून रेल्वे ट्रेकचे अतोनात नुकसान झाले आहे सदरच्या असणाऱ्या त्रुटी लक्षात घेऊन पी.डब्ल्यू.आई.ने ट्रॅक दुरुस्ती आणि इतर कामे करण्यासाठी दोन वर्षांपेक्षा अधिक काळ लागू शकतो असा अहवाल सादर केल्याने रेल्वे प्रशासनाने नेरळ माथेरान तसेच शटल सेवा देखील  बंद करण्याचा कठोर आणि दुर्दैवी निर्णय घेतला आहे.

 दोन इंजिन आणि ८ रॅक माथेरान स्टेशनमध्ये उपलब्ध असल्याने नेरळ माथेरान ट्रॅक वरील काम पूर्ण होईपर्यंत अमनलोज ते माथेरान शटल सेवा सुरू ठेवण्यासाठी कोणत्याही प्रकारची   अडचण नसावी ही बाब रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आणून देने आवश्यक आहे.

 २०१६ ला देखील अशाच प्रकारचा दुर्दैवी निर्णय रेल्वे विभागाने घेतला होता त्यावेळेसही आपण त्याचा पाठपुरावा करून ही सेवा पूर्ववत सुरू करून घेतली होती त्याकरिता माथेरानकर आपले सदैव ऋणी असणार आहेत.

   माथेरानला येणारे पर्यटक हे केवळ याच मिनिट्रेनच्या सफरीचा आनंद घेण्यासाठी नियमितपणे येत असतात. आणि जर हीच सेवा प्रदीर्घ कालावधी साठी बंद करण्यात आल्यास याचा एकंदरीतच इथल्या पर्यटनावर परिणाम होणार आहे. यासाठी आपल्या माध्यमातून रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत एका विशेष बैठकीचे आयोजन करून यातून काहीतरी सुवर्णमध्य काढणे आवश्यक आहे. अन्यथा आगामी काळात मिनिट्रेन बंद असल्यामुळे स्थानिकांसह हॉटेल इंडस्ट्री वर त्याचप्रमाणे मोलमजुरी करणाऱ्या श्रमिकांच्या उपजीविकेवर गदा येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

  माथेरानमधील पर्यटन कायमस्वरूपी अबाधित राहण्यासाठी मिनिट्रेनच्या मार्गातील दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर पूर्ण करून घेण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांची तातडीची आपत्कालीन बैठक आपल्या अध्यक्षतेखाली तात्काळ लावण्याचे आदेश रेल्वे प्रशासनाला द्यावेत  सर्व माथेरानकरांच्या या महत्वपूर्ण गरजेसाठी प्रयत्न करावेत असे निवेदनात म्हटले आहे.

 

अवश्य वाचा