नेरळ

कर्जत तालुक्यातील रायगड जिल्हा परिषदेच्या रिक्त असलेल्या कळंब गटाच्या पोटनिवडणुकीसाठी एकमेव नामांकन अर्ज दाखल झाला आहे. दिवंगत सुदाम पेमारे यांच्या निधनाने रिक्त झालेल्या कळंब गटासाठी पोटनिवडणुकीकरिता नामांकन अर्ज दाखल करण्याची शनिवारी शेवटची मुदत होती. कर्जत तालुक्यातील सर्व राजकीय पक्षांनी आपल्याकडून कोणत्याही उमेदवाराचा नामांकन अर्ज दाखल न करता दिवंगत सुदाम पेमारे यांच्या पत्नी सीमा पेमारे यांच्या उमेदवारीला सर्वसंमती दिली आहे. त्यामुळे ही पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे.

मार्च 2017  मध्ये झालेल्या जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शेतकरी कामगार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार सुदाम पेमारे यांनी शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांचा पराभव करून विजय मिळविला होता. त्यानंतर सुदाम पेमारे यांचे 28 मे 2018 रोजी निधन झाले. राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषदेच्या कळंब गटासाठी पोटनिवडणूक जाहीर केली. नियोजित कार्यक्रमानुसार 23 जून रोजी मतदान घेतले जाणार आहे. दरम्यान शेतकरी कामगार पक्षाने आपल्या पक्षाचे दिवंगत सदस्य सुदाम पेमारे यांच्या पत्नी सीमा पेमारे यांना शेकापने उमेदवारी देण्याचे नक्की करीत कळंब या नागरिकांचा मागासप्रवर्ग राखीव जागेसाठी होणारी पोटनिवडणूक बिनविरोध करावी असे आवाहन आणि विनंती कर्जत तालुक्यातील सर्व राजकीय पक्षांना करणारे निवेदन प्रत्येक राजकीय पक्षाच्या प्रमुखांची भेट घेऊन केले होते. त्यानुसार शुक्रवारी शेकापच्या उमेदवार म्हणून सीमा पेमारे यांनी नामांकन अर्ज दाखल केला. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, काँग्रेस या तीन पक्षांचे तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. मात्र अन्य तीन प्रमुख राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित नसल्याने नामांकन अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत निवडणूक बिनविरोध होईल किंवा नाही याबाबत साशंकता होती.

कळंब जिल्हा परिषद गटाच्या पोटनिवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी असलेल्या वैशाली परदेशी यांच्या निवडणूक कार्यालयाकडे कोणी इच्छुक उमेदवार फिरकले नाही. त्यामुळे या पोटनिवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत शनिवारी संपली. त्या कालावधीत कळंब जिल्हा परिषद गटाच्या पोटनिवडणुकीसाठी शेतकरी कामगार पक्षाच्या सीमा पेमारे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा कर्जतचे तहसीलदार अविनाश कोष्टी यांनी दिली. त्यामुळे दिवंगत सुदाम पेमारे यांच्याबद्दल सर्व राजकीय पक्षांनी दाखवलेली सहानुभूती दिसून आली आहे. त्याचवेळी शेतकरी कामगार पक्षाचे कर्जत तालुक्यातील पदाधिकार्‍यांनी पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी घेतलेली भूमिका यामुळे केवळ एकच नामांकन अर्ज दाखल होऊ शकला आहे. मात्र दाखल नामांकन अर्जाची 10 जून रोजी निवडणूक निर्णय अधिकार्‍यांच्या कार्यालयात छाननी होणार आहे. त्यावेळी वैध ठरलेला अर्ज मागे घेण्यासाठी 15 जून रोजी दुपारी 3 पर्यंत मुदत असून त्यानंतर अर्ज कायम राहिल्यानंतर पोटनिवडणूक बिनविरोध झाल्याचे अधिकृत होईल.

प्रथम छाननी प्रक्रिया आणि नंतर माघारीचे दिव्य पार केल्यानंतर कळंब गटाबद्दल अधिकृत निर्णय होऊ शकेल. त्यानंतर शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते विलास थोरवे, जिल्हा परिषदेचे सभापती नारायण डामसे, तालुका चिटणीस प्रवीण पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गजानन पेमारे आणि अन्य पदाधिकारी कर्जत तालुक्यातील सर्व राजकीय पक्षांचे आभार मानणार आहेत. पोटनिवडणूक बिनविरोध करून कर्जत तालुक्यातील सर्व राजकीय पक्षांनी दिवंगत सुदाम पेमारे यांना एकप्रकारे श्रद्धांजली वाहिली असल्याची प्रतिक्रिया आमदार सुरेश लाड यांनी व्यक्त केली आहे.

अवश्य वाचा