अलिबाग

कृषीवलचा 83 वा वर्धापन दिन मोठ्या दिमाखात आणि उत्साहात अलिबाग येथील पीएनपी नाट्यगृहात साजरा करण्यात आला.

या समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून माजी मंत्री मीनाक्षी पाटील, माजी नौदल प्रमुख अ‍ॅडमिरल एल. रामदास, लोकसत्ताचे माजी निवासी संपादक सुधीर जोगळेकर, सुनंदाताई पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अ‍ॅड. आस्वाद पाटील, जिल्हा परिषद सदस्य चित्रा पाटील, माजी जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. प्रसाद पाटील, आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष सुरेश पाटील, अभिजीत पाटील, डॉ. दीपक पाटील, मुख्य संपादक प्रसाद केरकर आदी मान्यवर उपस्थित होते.

गणेश वंदनाने वर्धापनदिन सोहळ्याचा प्रारंभ करण्यात आल्यानंतर माजी नौदल प्रमुख अ‍ॅडमिरल रामदास यांच्या हस्ते कृषीवलच्या नवीन संकेतस्थळाचे अनावरण करण्यात आले. यावेळी संकेतस्थळ बनविणार्‍या संदेश नाईक आणि टीमचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संदेश नाईक यांनी संकेतस्थळाबद्दल माहिती दिली. याप्रसंगी अ‍ॅडमिरल एल रामदास यांनी आपले मनोगत व्यक्त करताना पर्यावरणाच्या र्‍हासाबद्दल चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, 20 वर्षांपूर्वी या विभागातील पर्यावरण चांगले होते. कसलेही प्रदूषण दिसत नसल्याने लोकांचे आरोग्यदेखील सुस्थितीत होते. मात्र, अलीकडे वाढलेल्या औद्योगिकीकरणाचा या निसर्गरम्य परिसरावरदेखील मोठा परिणाम जाणवत आहे. याच्यावर मात करण्यासाठी सर्वांनी आपल्या भावी पिढीचा विचार करुन जास्तीत जास्त वृक्षारोपण करण्याची गरज आहे. त्यासाठी सर्वांनी हातात हात घालून पुढे जायला हवे, अशी अपेेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

त्यानंतर संजय वझेरकर यांनी कृषीवलमधून सुरु केलेल्या ‘साहित्यिकांची मांदियाळी’ या लेखमालेचे पुस्तकात रुपांतर केले. या पुस्तकाचे प्रकाशन अ‍ॅडमिरल रामदास, तसेच जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अ‍ॅड. आस्वाद पाटील, जिल्हा परिषद सदस्य चित्रा पाटील, मुख्य संपादक प्रसाद केरकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी संजय वझेरकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते 25 ते 35 वर्षे सेवा बजावणार्‍या ज्येष्ठ वार्ताहर, ज्येष्ठ वितरक, ज्येष्ठ कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी कृषीवलमधील संपादकीय विभाग, मुद्रीतशोधन विभाग, संगणक विभाग, जाहिरात विभाग, लेखा विभाग, प्रिंटींग विभाग, बायडींग विभाग, गार्डन विभाग तसेच अ‍ॅडमिन विभाग या सर्वच विभागातील कर्मचार्‍यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी संगीतकार विक्रांत वार्डे प्रस्तूत निषाद संस्थेच्यावतीने सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला. यात योगेश काळबेरे, जुईली पाटील, प्रशांत पाटील यांनी आपल्या आवाजात गाणी सादर केली. नृत्यांगना हर्षा राऊत हिने विविध नृत्य सादर करीत आपल्या अदाकारीने मोहित केले, तर रुद्राक्ष डान्स अकॅडमीच्या कलाकारांनी कोळीगीतासह इतर सांस्कृतिक नृत्यांनी सर्वांची दाद मिळवली. या समारंभाला कृषीवलचे जिल्ह्यातील वाचक, वितरक, वार्ताहर व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होेते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अभिनेत्री ज्योती बावधनकर-राऊळ यांनी केले.

अवश्य वाचा