अमेरिकेतील अ‍ॅरिझोना राज्यात ‘झीरो मास वॉटर’ हा उपक्रम  राबवण्यात येत आहे. त्यात विशिष्ट प्रकारचे मटेरिअल, सौरऊर्जा आणि संबंधित भूभागातील हवामान तसेच पर्जन्यमानाची एकंदर माहिती एवढ्यावरुन सोलर पॅनल उभारून त्यापासून पाणी मिळवता येते. आधी या ‘झीरो मास’चे काम मंद होते; परंतु आता पॅनल्सचे उत्पादन वाढवण्यात आले असून, निदान अमेरिकेत तरी ती सर्वत्र मिळू लागली आहेत.

 

पाण्याला जीवन असे उपनाम दिले जाते तेव्हाच त्याची प्राणीमात्रांसाठीची उपयुक्तता अधोरेखित होते. असे असले तरी मर्यादित जलस्त्रोत, मर्यादित जलसाठे आणि वापरकर्त्यांची वाढती संख्या हे व्यस्त गुणोत्तर अधिकाधिक व्यस्त होत असल्यामुळे सध्याच्या काळात पाणीप्रश्‍न अधिकाधिक गंभीर होत आहे. पाण्यासाठी वणवण फिरणारी माणसे तसेच पाण्याअभावी तडफडून मरणारे प्राणीजगत हा जागतिक पातळीवर चर्चेत असणारा एक मुद्दा आहे. कितीही योजना आखल्या आणि कितीही पैसे खर्च केले तरी मार्च ते जूनचा मध्य या कालावधीत आपल्याकडे पाण्याची प्रचंड कमतरता जाणवते. देशातला काही भाग तर अगदी कोरडाठाक पडतो. कितीही खोल खणले तरी विंधनविहिरींना पाणी लागत नसल्यामुळे एकंदरच भूजल पातळी खालावल्याचे भीषण वास्तव समोर येते. काही ठिकाणी महिन्यातून एकदा पाणी पुरवले जाते तर काही भागांची तहान भागवण्यासाठी चक्क रेल्वेच्या वॅगन्स उपयोगात आणल्या जातात. भारतासारख्या विकसनशील आणि लोकसंख्येचा उद्रेक असणार्‍या देशातच हे चित्र पाहायला मिळते असे नव्हे, तर बर्‍याच कटिबंधीय देशांमध्ये, अगदी अमेरिकेच्याही नैऋत्येकडील राज्यांमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवते. यामागची कारणे वेगवेगळी असली (नैसर्गिक स्थिती, गरिबी, भ्रष्टाचार, योजना राबवण्यात समन्वय नसणे, अंतर्गत राजकारण, दूरदृष्टीचा अभाव इत्यादी) तरी शेवटी पाण्याचा पेला रिकामा किंवा अर्धाच भरलेला राहतो, हे कटू वास्तव आहे.

पिण्यायोग्य अथवा वापरायोग्य पाणी पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसण्याचे आणखी एक कारण प्रदूषणामुळे उद्भवले आहे. नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये रासायनिक द्रव्ययुक्त सांडपाणी, कचरा, मैलापाणी, विविध कारखान्यांमधून निघणारे वेस्ट वॉटर बिनदिक्कत मिसळले जात असल्यामुळे बहुसंख्य नद्यांची अवस्था अत्यंत गंभीर आहे. पाण्याची दृश्यमानता, पारदर्शकता कमी होत असून, विविध प्रकारचे विषाक्त घटक मिसळत असल्यामुळे ते जलचरांच्या जीवितासाठी अयोग्य ठरत आहेतच; खेरीज ते माणसाच्या वापरायोग्यही राहात नाहीत. पाणीटंचाईला ही वस्तुस्थितीदेखील मोठ्या प्रमाणावर कारणीभूत ठरत आहे. याव्यतिरिक्त पाण्याचा गैरवापर, पाण्याची गळती, अनियोजित वापर यासारख्या अनेक कारणांमुळे देश-विदेशातले नागरिक भीषण पाणीटंचाईचा सामना करताना दिसतात. वेळीच हातपाय हलवले नाहीत, तर नजीकच्या भविष्यकाळात पाणीप्रश्‍न अधिक गंभीर होणार असून, तिसरे महायुद्ध झालेच तर ते पाण्याच्या प्रश्‍नावरुन होईल, असा अंदाज अनेक तज्ज्ञांनी वर्तवला आहे. म्हणूनच याप्रश्‍नी देश-विदेशातले तज्ज्ञ संशोधनात गुंतले असून, सर्वच पातळ्यांवर उपाय शोधले जात असतात. त्यामध्येही नैसर्गिक ऊर्जास्त्रोत शक्य तितके अधिकाधिक वापरुन शाश्‍वत विकास साधण्याचे प्रयत्नही जागरूकतेने होताना दिसतात. यामध्ये सोलर पॅनेलचा नंबर बराच वरचा आहे. सौरऊर्जेचा वापर फक्त पाणी तापवण्यासाठी न करता पाणी मिळवण्यासाठीही करण्याचे प्रकल्प हाती घेतले जात आहेत. अशा आगळ्यावेगळ्या प्रयोगाची माहिती घ्यायलाच हवी.

नवकल्पना उचलून धरून संबंधितांना पैशाची तसेच इतर मदत पुरवण्याकडे सध्या अनेकांचा कल राहात आहे. या संकल्पनेला ‘स्टार्ट अप’ असे नाव आहे (भारत सरकारनेही स्टार्ट अपना प्रोत्साहन देणे सुरू केले आहे). अमेरिकेतल्या अ‍ॅरिझोना राज्यातला ‘झीरो मास वॉटर’ हा असाच एक उपक्रम (ुुु.ूशीेारीीुरींशी.लेा). विशिष्ट प्रकारचे मटेरिअल (ते कोणते हे कंपनीचे गुपित आहे), सौरऊर्जा आणि संबंधित भूभागातले हवामान तसेच पर्जन्यमानाची एकंदर माहिती एवढ्यावरून सोलर पॅनेल उभारून त्यापासून पाणी मिळवता येते, असे या उपक्रमाचे संस्थापक आणि मुख्याधिकारी कोडी फ्रिसेन यांचे म्हणणे आहे. ही स्टार्ट अप गेली काही वर्षे सुरू आहे. प्रथम ‘झीरो मास’चे काम मंद होते; परंतु आता पॅनेल्सचे उत्पादन वाढवण्यात आले असून, निदान अमेरिकेत तरी ती सर्वत्र मिळू लागली आहेत. हवा आणि सूर्यप्रकाशापासून पाणी कसे मिळते बुवा, हा प्रश्‍न अर्थातच कोणीही विचारेल, तर हवेमध्ये आर्द्रता उर्फ वाफेच्या रुपात पाणी असतेच. गरम हवेचा कमी तापमानाच्या पृष्ठभागाशी संपर्क झाल्यावर सूक्ष्म थेंबांच्या रुपात हे पाणी प्रकट होते. आपण गवताच्या पात्यांवर, काचेच्या तावदानांवर असे जलबिंदू जमलेले नेहमी पाहतो. त्याचप्रमाणे काही पदार्थांच्या अंगी हवेतले बाष्प शोषण्याचा गुण असतो, म्हणजेच ते ‘हायग्रोस्कोपिक’ असतात. कॉफी आणि साखर ही अगदी नेहमीच्या पाहण्यातली उदाहरणे आहेत. कॉफी तासभर उघडी ठेवली तरी गुठळ्या झाल्याच म्हणून समजा! या सगळ्याचा अभ्यास करुनच संशोधकांनी हा उपक्रम राबवला आहे. 

संबंधित संशोधकांनी या झीरो मास सोलर पॅनल्सवर पेटंट घेतलेले वैशिष्ट्यपूर्ण मटेरिअल चढवलेले असते. पॅनलच्या आत आणखी एका वेगळ्या मटेरिअलचा थर असतो; जो हवेतली आर्द्रता शोषण्याचे काम करतो. दोन थरांमधल्या तापमानातल्या फरकाचा परिणाम म्हणून पाणी तयार होते. प्रक्रियेतून मिळालेले हे पाणी पॅनलखालच्या टाकीत जमा होते. त्यामध्ये काही प्रमाणात कॅल्शिअम आणि मॅग्नेशिअम मिसळले जाते. अशा प्रकारे दोन पॅनल्समधून दिवसाला साधारणत: दोन ते पाच लीटर पाणी मिळते. अर्थात, ही कार्यपद्धती इथे अगदीच थोडक्यात आणि सोपी करून सांगितली आहे. मटेरिअल सायन्स आणि फ्लुइड डायनॅमिक्स या विषयांचे ज्ञान असणार्‍यांना ही पद्धती अधिक चांगल्या प्रकारे समजेल. प्रचलित नवतंत्रज्ञानानुसार या पॅनल्समध्येही प्रोग्रॅमेबल सर्किट बोर्ड बसवला आहे. झीरो मासच्या मुख्य कार्यालयातले इंजीनिअर त्यांच्या जगभरातल्या पॅनल्सकडून डेटा घेत असतात. मिळालेले पाणी आणि हवामानाचा अंदाज हे या माहितीतले मुख्य घटक असतात. ही सर्व पॅनल्स मुख्यालयाबरोबरच परस्परांशीही स्वतंत्रपणे जोडलेली असल्यामुळे संपर्क साधणे सोपे असते. प्रत्येक नवनिर्माणाला दुसरी बाजू असतेच आणि त्या कसोटीवर नवकल्पना टिकणे अत्यंत महत्त्वाचे असते. खेरीज त्या व्यावहारिक पातळीवरही परवडण्याजोग्या असाव्या लागतात. इथेच ‘झीरो मास’चे हे संशोधन (सध्या तरी) थोडे मार खात आहे. 

मात्र हा प्रयोग साकारणार्‍या फ्रिसेन यांना हे मान्य नाही. अशाप्रकारे पाणी मिळवण्यासाठी कोणतीही ऊर्जा वापरावी लागत नाही, असा त्यांचा मुख्य मुद्दा आहे. शिवाय, कालांतराने हे तंत्रज्ञान पुष्कळच ओपन सोर्स पद्धतीने पुरवण्याचीही त्यांची तयारी आहे. अर्थात, कोणत्याही नव्या वस्तूची आरंभिक किंमत जास्तच असते हा साधा नियम लक्षात ठेवला तर काही वर्षातच हे प्रकरण वाजवी किमतीत मिळण्याचीही शक्यता आहे. पाहू काय होते ते! सध्या तरी खरं महत्त्व आहे पाणीसमस्या लक्षात घेऊन ती दूर करण्यासाठी वेगळ्या दिशेने विचार आणि प्रयत्न करण्याला!

 

अवश्य वाचा