पुलवामा इथे केंद्रीय राखीव दलाच्या जवानांवर केलेल्या आत्मघाती हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानमध्ये जाऊन एअर स्ट्राइक केला. त्यामुळे भारतीय विमानांना पाकिस्तानची हवाई हद्द बंद करण्यात आली. त्याचा फटका भारतीय विमान कंपन्यांना बसला होता. पाकिस्तानलाही याचा आर्थिक फटका बसला. भारताने कोणतीही विनंती न करताच पाकिस्तानने हवाई हद्द खुली केल्यामुळे दोन्ही देशांचा फायदा होणार आहे.

भारत आणि पाकिस्तान हे दोन शेजारी देश असले, तरी दोघांमध्ये कधीही शेजारधर्म नीट निभावला जात नव्हता. पाकिस्तानने कधीही निखळ मैत्रीचा हात पुढे केला नाही. ठराविक अपवाद वगळता भारत आणि पाकिस्तानदरम्यानचे संबंध कधीच चांगले राहिलेले नाहीत. अन्य शेजारी देशांमधल्या मैत्रीसंबंधात चढ-उतार दिसले; परंतु पाकिस्तानने कायम कुरापती काढण्याचे धोरण सुरू ठेवल्याने या दोन देशांमध्ये कधीच मैत्रीपर्व निर्माण होऊ शकले नाही. आता तर दहशतवादाला चिथावणी देण्याचे आणि पाकिस्तानमधल्या दहशतवादी तळांवर कारवाई केल्याशिवाय पाकिस्तानशी कोणतेही संबंध ठेवायचे नाहीत, अशी भूमिका भारताने घेतली आहे. पठाणकोट आणि पुलवामा इथल्या दहशतवादी हल्ल्यांनंतर तर भारत अधिक आक्रमक झाला आहे. पाकिस्तानचा विशेष प्राधान्य देशाचा दर्जा भारताने रद्द केला, काश्मीरमधून पाकिस्तानला होणारा व्यापार थांबवला. भारतातून पाकिस्तानला भाजीपाल्यासह अन्य वस्तू जात होत्या. त्या थांबल्याने पाकिस्तानमध्ये महागाई वाढली. पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानमध्ये घुसून अतिरेकी तळ उद्ध्वस्त केले, विमाने पाडली. त्यानंतर भारताच्या विमानांना पाकिस्तानची हवाई हद्द वापरू द्यायची नाही, असा पवित्रा पाकिस्तानने घेतला. भारतानेही त्याकडे फार गांभीर्याने पाहायचे नाही आणि पाकिस्तानची त्यासाठी मिनतवारी करायची नाही, अशी भूमिका घेतली. 
आज जगात पाकिस्तान एकाकी पडला आहे. पाकिस्तानमध्ये महागाईने उच्चांक गाठला आहे. तिथली अर्थव्यवस्था अडचणीत आहे. अशा वेळी भारताशी जुळवून घेतले नाही, तर परिस्थिती आणखी अवघड होईल, याची जाणीव पाकिस्तानला झाली आहे. त्यामुळे तर कर्तारपूर कॉरिडॉर असो वा अन्य विषय; पाकिस्तान तडजोडीच्या भूमिकेत आला आहे. दहशतवाद्यांचे अड्डे पाकिस्तानातून अफगाणिस्तानात हलवले गेले आहेत. भारतात होऊ शकणार्‍या दहशतवादी हल्ल्याची पूर्वकल्पना पाकिस्तान भारताला द्यायला लागला आहे. खलिस्तानी दहशतवाद्यांना कर्तारपूर कॉरिडॉरचा वापर करू देणार नाही, अशी भूमिका पाकिस्तानने घेतली आहे. तसे नुकत्याच झालेल्या बैठकीत पाकिस्तानने मान्य केले आहे. असे असले, तरी पाकिस्तानवर फार विश्‍वास ठेवावा, अशी स्थिती नाही. त्यामुळे भारत सावध आहे. ब्रिश्केक परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी जाणार होते. या विमानाचा मार्ग पाकिस्तानमधून जाणार होता. भारतीय विमानांना पाकिस्तानची हवाई हद्द बंद असल्याने भारताने पर्यायी मार्ग निवडला. त्यानंतर पाकिस्तानने भारतीय पंतप्रधानांच्या विमानासाठी हवाई हद्द वापरू देण्यास मान्यता दिली; परंतु, भारताने कठोर होत पाकिस्तानची हवाई हद्द न वापरता प्रवास केला. ही पार्श्‍वभूमी मुद्दाम नमूद करायचे कारण असे, की आता भारताने मागणी केली नसताना पाकिस्तानने भारतीय विमानांसाठी आपला हवाई मार्ग वापरण्याची परवानगी दिली आहे. पाकिस्तानने सर्व नागरी उड्डाणांसाठी आपले अवकाश खुले केले आहे. अर्थात, हवाई हद्द बंद केल्यामुळे पाकिस्तानलाच दररोज हजारो डॉलरच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागत होते, हे यामागील महत्त्वाचे कारण आहे.
फेब्रुवारी महिन्यात बालाकोट इथे भारतीय हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राइकनंतर पाकिस्तानने हवाई अवकाश वापरण्यास बंदी घातली होती. त्यानंतर भारताच्या कोणत्याच विमानांना पाकिस्तानच्या हवाई हद्दीचा वापर करता येत नव्हता. यासंदर्भात पाकिस्तानच्या नागरी हवाई उड्डाण प्राधिकरणाने एक नोटीस प्रसिद्ध केली आहे. या नोटिशीत पाकिस्तानचे हवाई क्षेत्र सर्व नागरी विमानांसाठी खुले करण्यात येत असल्याचे म्हटले आहे. पाकिस्तानचे हवाई क्षेत्र एक महत्त्वाचा हवाई मार्ग आहे. या मार्गावरून दिवसभरात हजारो प्रवासी आणि मालवाहतूक करणारी विमाने प्रवास करत असतात; पण, पुलवामा इथे झालेल्या हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने बालाकोट इथल्या दहशतवादी तळांवर हवाई हल्ला केला होता. या हल्ल्यानंतर पाकिस्तानने आपले हवाई अवकाश वापरण्यास बंदी घातली होती. त्याचा थेट परिणाम अनेक विमान कंपन्यांवर झाला होता. पाकिस्तानचे हवाई अवकाश वापरता येत नसल्यामुळे विमानांना दुसर्‍या मार्गाने प्रवास करावा लागत होता. अन्य मार्गाचा वापर करताना इंधन अधिक लागत होते. तसेच खर्चदेखील वाढत होता. 
पाकिस्तानने हवाई मार्ग बंद केल्याचा फटका भारतीय विमान कंपन्यांना बसत होता, मात्र त्यात पाकिस्तानचेही नुकसान होते. हवाई अवकाश वापरल्याबद्दल पाकिस्तानला प्रत्येक विमानामागे 500 डॉलर मिळत असत; पण, त्यांनी स्वत:हून हवाई अवकाश वापरण्यावर बंदी घातली. त्यामुळे पाकिस्तानचे नुकसान व्हायला लागले. अगोदरच पाकिस्तानची अर्थव्यवस्था अडचणीत असताना हमखास मिळणारे परकीय चलन गमवावे लागत असल्याने पाकिस्तान सरकारच्या निर्णयावर तिथल्या अर्थतज्ज्ञांनी टीका सुरू केली होती. एकीकडे पाकिस्तान सरकार बाहेरून मदत मिळवण्यासाठी जगाचे उंबरठे झिजवत असताना दुसरीकडे भारताशी पंगा घेतल्याने अनेक बाबतीत नुकसान सहन करावे लागत होते. पाकिस्तानचे पंतप्रधान महागाईच्या बाबतीत जनतेला सहकार्याचे आवाहन करत असताना तिथल्या सरकारच्या चुकीच्या निर्णयाचा त्यांनाच फटका बसत होता. इंधन आयात करण्यासाठीही पाकिस्तानकडे परकीय चलन राहिले नव्हते. दररोज मिळणारे हजारो डॉलर आपल्याच चुकीमुळे गमवावे लागत असल्याची जाणीव पाकिस्तानला झाली. अर्थतज्ज्ञ आणि संरक्षणतज्ज्ञांनाही हवाई अवकाश वापरण्यावर बंदी घालण्याचा निर्णय आवडला नव्हता. त्यामुळे पाकिस्तानलाच या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची गरज होती. बालाकोट हल्ल्यानंतर तब्बल 139 दिवसांनी पाकिस्तानकडून त्यांचे हवाई तळ सर्व प्रकारच्या उड्डाणांसाठी पुन्हा सुरू करण्यात आले आहेत.
अखेर पाकिस्ताननेच आर्थिक संकटासमोर झुकत हवाई अवकाश मोकळे केले. ही बंदी उठवल्यामुळे भारतीय विमाने पाकिस्तानच्या हवाई हद्दीतून प्रवास करू शकणार आहेत. पाकिस्तानच्या बंदीच्या निर्णयामुळे अनेक भारतीय विमान कंपन्यांना फटका बसला होता. एअर इंडिया आणि अन्य विमान कंपन्यांना मिळून 548 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. अशा परिस्थितीत पाकिस्तानने सहकार्याचा हात पुढे केला आहे. अर्थात, त्यात पाकिस्तानचाच फायदा होणार आहे. त्यामुळे पाकिस्तानची हवाई हद्द वापरणार्‍या विविध देशांचाही फायदा होणार आहे.

अवश्य वाचा