सृष्टीत अनंत पदार्थ आहेत. त्यांचा अंतिम घटक कोणता, हा प्रश्‍न अनंत काळापासून शास्त्रज्ञ व तत्त्ववेत्त्यांना सतावत होता. ग्रीक तत्त्ववेत्ता डिमोक्रेटीसन पदार्थाच्या अविभाज्य घटकाला ‘अ‍ॅटम’ हे नाव दिले. भारतातील कश्यप ऋषींनी म्हटले की, पदार्थांचा अंतिम घटक म्हणजे कण; परंतु ही संकल्पना ते सिद्ध करू शकले नाहीत. परिणामी, आधुनिक काळात पदार्थाचा अंतिम घटकाविषयीचे रहस्य वाढतच चालले होते आणि या रहस्याचा उलगडा करण्यात यशस्वी झाला रसायनशास्त्रज्ञ जॉन डाल्टन!
डाल्टनचा जन्म 6 डिसेंबर 1766 रोजी ब्रिटनमधील इल्सफिल्ड येथे एका गरीब कुटुंबात झाला. लहानपणीच उत्तम गणितज्ज्ञ म्हणून त्याने नाव कमावले. वयाच्या 12व्या वर्षीच त्याने स्वतःची शाळा उघडली. आणि, आश्‍चर्य म्हणजे, 15 ते 17 वर्षांची मुले त्याच्या शाळेत विद्यार्थी म्हणून शिकत. आपल्या अखेरच्या श्‍वासापर्यंत हवामानाची नोंद घेण्याचे त्याचे काम अखंडतेने चालू होते. त्याच्या या हवामानाच्या नोंदीची संख्या दोन लक्षांच्या आसपास भरेल.
संशोधणासाठी अधिक वेळ मिळावा म्हणून त्यांनी मॅचेंस्टर कॉलेजातील आपल्या कामाचा राजीनामा दिला. फक्त स्वतःचा चरितार्थ चालविण्यासाठी तो खासगी शिकवण्या घेई व उरलेल्या वेळ संशोधनासाठी खर्च करी. 
आता त्याचे सर्व लक्ष या सृष्टीत जे निरनिराळे पदार्थ आहेत, त्यांचा अंतिम घटक कोणता याकडे लागले होते आणि त्याच्या या संशोधनाला यश आले. सृष्टीतील अंतिम घटक त्यांनी शोधून काढला. त्याचे संशोधन समकालीन शास्त्रज्ञांनी ग्राह्य मानले. फ्रेंच संशोधकांनी तर त्याला आपल्या अकॅडमी ऑफ सायनसचा सभासद करुन घेतले व पॅरिसला त्याचे भव्य स्वागत केले. इंग्लंडच्या रॉयल सोसायटीने त्याला त्याच्या वैज्ञानिक संशोधनाबद्दल पदक बहाल केले व खुद्द इंग्लंडच्या राजाने त्याला आपल्या भेटीला बोलावले. 
संकल्पनेचा. त्याच्या मते, पदार्थाच्या अविभाज्य घटक म्हणजे अणु! अणुचा भेद होऊ शकतो हे रेडिओ अ‍ॅक्टिव्ह किरणांचा शोध लागला तेव्हा सिद्ध झाले. या संशोधनामुळेच डाल्टन याला ‘अणुचा जनक’ म्हणून मान्यता मिळाली. अणुसिद्धांत प्रस्थापित करून डाल्टनने रासायनिक प्रयोगांना निश्‍चित व विविक्षित रुप आणण्यात फार मोठे सहास्य केले. या सिद्धांताच्या आधारे पुढे सर्व वस्तू या विद्युतकणमय आहेत, हे निर्विवाद सिद्ध झाले. या संशोधनातूनच नंतर अणुस्फोटाची कल्पना अन्य शास्त्रज्ञांना आली व मानव जातीचा विनाश करणारा अणुबॉम्ब तयार झाला. डाल्टनने मात्र शांततेसाठी अणू हेच सूत्र ठेवले होते. 
डाल्टन याने अणुसिद्धांत मांडून आधुनिक रसायनशास्त्राचा पाय रोवला. मूलद्रव्यांना संज्ञा आणि चिन्हही त्याने प्रथम केली. 14 मूलद्रव्यांच्या वस्तुमानाची एक सूची त्याने तयार केली. एकाच मूलद्रव्यातील सर्व अणु हे सर्व समान गुणधर्म व समान वस्तुमान असलेले असतात, असा एक सिद्धांत त्याने मांडला. त्याने मांडलेल्या सिद्धांतात काळानुरूप बदल झाले. उदा. अणु हा अविभाज्य नसून, त्याचे भंजन करता येत, हे सिद्ध झाले. तथापि, त्यामुळे त्याच्या संशोधनाचे महत्त्व कमी होत नाही. ‘रसायन तत्त्वज्ञानाची एक नवी प्रणाली’ हे पुस्तक त्याने प्रसिद्ध केले. 
डाल्टनच्या आयुष्याचा बराच काळ संशोधनासाठी गेल्यामुळे लग्न त्याने केलेच नाही. तो ब्रह्मचारी राहिला. वयाच्या 78व्या वर्षी 27 जुलै 1844 मध्ये मृत्यू पावला, तेव्हा त्याच्या अंत्ययात्रेला अर्धा लाखाच्या आसपास जनसमुदाय लोटला होता. यावरुन त्याची लोकप्रियता आणि संशोधन कार्याचे मोल ध्यानी येते.

अवश्य वाचा