जगन्नाथ शंकरशेठ ऊर्फ नाना शंकरशेठ मुर्केटे एक मराठी माणूस, आधुनिक मुंबईचा शिल्पकार होते, हे आजच्या पिढीला, जी मुंबईत राहात आहेत त्यापैकी किती लोकांना ठाऊक आहे? मुळातच मराठी माणूस आणि तो शेठ ही कल्पनाच मुळी आपण करत नाही. पण, हे शेठ चक्क मराठी होते. 

नानांचा जन्म 10 फेब्रुवारी 1803 रोजी अत्यंत धनवान कुटुंबात झाला. नानांचे वडील जेव्हा मृत्यू पावले, तेव्हा त्यांनी नानांसाठी 15 लक्ष रुपये व ठाकूरद्वार येथे एक मोठा वाडा ठेवला होता. वडिलांच्या मृत्यूनंतर नाना उद्योगधंद्यात पडले, पैसा कमवला. लोक त्यांना शेठ म्हणू लागले. पण, त्यांची ओळख शेठजींची नव्हे, तर मुंबईच्या आद्य शिल्पकाराचीच!

महात्मा फुल्यांच्या अगोदर नानांनी स्वतःच्या जागेत मुलींच्या शाळेची सोय केली. त्या काळात मुलींना शिक्षण दिले की, नवर्‍याचे आयुष्य कमी होते, असा घातक गैरसमज समाजात होता. त्या काळात हे कार्य त्यांनी केले. नानांनी अनेक शिक्षण संस्था काढल्या. त्यात जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्स ही मोठमोठ्या कलाकारांची जननी नानांच्या प्रयत्नातून उभी राहिली. 

नानांचा कालखंड 1803 ते 1835. म्हणजे पेशवाई संपलेली, 1857चे स्वातंत्र्ययुद्ध अपयशी ठरलेले होते. लोक संभ्रमावस्थेत. अशा वेळी ब्रिटिशांशी जुळवून घेण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यात आपला समाज मागासलेला, अंधश्रद्धेने बुजलेला. अशा परिस्थितीत इंग्रजांच्या इंग्लिश भाषेची, आधुनिक ज्ञानाची गंगा भारतात आली होती. गंगेत स्वतः उडी मारुन स्वतः पुरते पुण्य पदरात न घेता इतरांनीही उडी मारायला लावली ती नानांनीच. म्हणजे, इंग्रजी विद्या शिकून त्यांनी फक्त स्वतःचा फायदा करून घेतला नाही. 

त्या वेळेच्या छोट्याशा मुंबईच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न नानांनी पहिले. आज मुंबईकरांच्या प्रत्येक पिढीच्या लहान मुलांना ज्या बागेने रिझवले आहे, ती राणीची बाग ही कल्पना नानांची. जागतिक दर्जाची महापालिका म्हणून आज मुंबईला जे स्थान आहे, या महापालिकेचा पाया नानांनीच घातला. वाढत्या मुंबईसाठी पाणीपुरवठा ही भविष्यात एक समस्या बनू शकते, हे नानांनी 150 वर्षांपूर्वीच जाणले आणि मुंबईकरांसाठी तलावची योजना आखली. तानसा, वैतरणा आणि भातसा ही नानांचीच कल्पकता. आपली संस्कृती, इतिहास जपून ठेवण्यासाठी  एखादे वस्तुसंग्रहालय असावे, ही जाण नानांनाच. आज मुंबईत जे ऐतिहासिक  वस्तुसंग्रहालय उभे  आहे  त्याचे श्रेय नानांनाच. इतकेच  काय,  पण  मुंबईतील सोनापूरची स्मशानभूमी बांधण्याचे  श्रेयही नानांनाच.

आजच्या धावपळीच्या जीवनात रेल्वे हे मुंबईकरांचे हृदय. रेल्वे थांबली की मुंबई थांबते. ही रेल्वे आणण्याचे श्रेय नानांनाच. त्या वेळेची जी.आय.पी. रेल्वे सुरु करण्यात नानांचा फार मोठा वाटा होता. त्यांच्या रेल्वे कार्याचे द्योतक म्हणून कुठेही प्रवास करण्यासाठी  सोन्याचा पास त्यांना देण्यात आला होता. मुंबईचा हा मुकुट नानांनी  आपल्या पदराच्या रत्नालंकारांनी सजविला, पण रेल्वेची उभारणी हा त्या मुकुटातील कोहिनूर हिरा ठरला.

आणखी एका गोष्टीचा उल्लेख केल्याशिवाय नानांची हा ओळख  पूर्ण होत नाही. ती म्हणजे, नानांच्या नावाने मिळणारी स्कॉलरशिप. संस्कृतची स्कॉलरशिप मिळणे हा त्या काळात मिळणारा मोठा सन्मान असायचा. जुन्या पिढीतील आय.ए.एस. झालेला माणूसही आपण जगन्नाथ शंकरशेठ स्कॉलर आहोत, असे अभिमानाने सांगायचा. ‘तो शंकरशेठ स्कॉलर आहे,’ अशी त्या विद्यार्थ्यांची ओळख असायची. 

असे हे थोर नाना मुंबईचे पहिले सार्वजनिक पुढारी व थोर समाजसेवक होते. मुंबईत अशी एकही सार्वजनिक चळवळ किंवा संस्था नव्हती, की जिच्याशी नानांचा संबंध नव्हता. असे हे थोर, भल्या वृत्तीचे महासागर नाना शंकरशेठ वयाच्या 62व्या वर्षी, 31 जुलै 1865 रोजी अनंतात विलीन झाले. खरे तर, मुंबईच्या विमानतळाला किंवा रेल्वे स्टेशनला (जगन्नाथ शंकर शेठ टर्मिनस असे नाव द्यायला हवे होते.

अवश्य वाचा