माणसाने आयुष्यात कष्ट करून समृद्धी मिळवावी, असे माझे ठाम मत आहे. काहीजणांना कमी श्रमात झटपट पैसा मिळवण्याची हाव असते. पण, ती बर्‍याचदा नैतिक तत्त्वांशी तडजोडी करायला व वाईट कृत्ये करायलाही भाग पाडते. घामाने मिळवलेला दाम मात्र याला अपवाद असतो. मेहनत केल्यावरच घामाची किंमत आणि आनंद समजतो आणि माणूस शहाणा होतो. 

दुबईतील आमच्या व्यवसायाला पहिल्याच वर्षी नुकसान झाल्यानंतर आमच्या कुटुंबाच्या आयुष्यात जबरदस्त उलथापालथ घडली. बाबांनी नोकरीत साठवलेली त्यांची सर्व पुंजी दुकानात म्हणून गुंतवल्याने त्यांच्या हाती पैसाच शिल्लक नव्हता. सगळे खर्च कसे भागवायचे, हा मोठा प्रश्‍नच होता. मी त्यावेळी वयाच्या विशीत असल्याने मला तेवढासा पोच नव्हता. या संकटाने मी गांगरुन गेलो आणि ‘दुकान विकून भारतात परत जाऊया’, असा धोशा बाबांच्या मागे लावला. माझे बाबा मात्र लष्करी शिस्तीत वाढल्याने मनाने खंबीर होते. त्यांनी व आईने अशा आर्थिक अडचणींच्या वेळा अनेकदा अनुभवल्या होत्या आणि त्यातून ते सहीसलामत सुटलेही होते. बाबांनी मला बजावले, ‘दादाऽ क्या खाना तो दम खाना, मिट्टी मत खाना.’ 
बाबांना संकटापासून पाठ फिरवून पळून जाणे नापसंत होते. ते भावनेच्या फार आहारी जात नसत. दुबईला नोकरी मिळवण्यासाठी त्यांनी दोन-तीन एजंटना सांगून ठेवले होते. त्यापैकी एकाने बाबांना नोकरी मिळवून दिली व तात्काळ रोख रक्कम मागितली. बाबांकडे त्यावेळी पैसे नव्हते, तर त्यांनी आईच्या गळ्यातील सोन्याची साखळी काढून एजंटला दिली आणि सांगितले, की दोन महिन्यांत त्याचे पैसे चुकते केले नाहीत तर त्याने ती साखळी स्वतःकडेच ठेवून घ्यावी. अर्थात, तशी वेळ आली नाही. पण, सांगायचा मुद्दा इतकाच, की बाबा व्यवहारी विचार करत. बाबा स्वतः दुकानात अखंड राबत होते. त्यांच्याकडे पाहून मीही निश्‍चय केला, की कितीही कष्ट करायला लागले तरी चालतील; पण आता माघार घ्यायची नाही. दुकान फायद्यात आणेपर्यंत भारतात घरी पाऊल ठेवायचे नाही. त्यानुसार मी पुढची साडेतीन वर्षे घरी न जाता स्वतःला दुकानात गाडून घेतले. 
मला ही घाम गाळण्याची प्रेरणा मिळण्यामागे आणखीही एक कारण होते. ते म्हणजे, आमच्या फ्लॅटमध्ये राहात असलेले काही केरळी तरुण. माझ्या बाबांनी दुकानाच्या वरच्या मजल्यावर चार खोल्यांचा एक फ्लॅट भाड्याने घेतला होता व चार पैसे सुटण्यासाठी त्यातील एकच खोली मला व त्यांना वापरासाठी ठेवून उरलेल्या तीन खोल्यांमध्ये पोटभाडेकरु ठेवले होते. हे सगळे केरळमधून दुबईत आलेले कामगार होते. लवकरच त्यांची आणि माझी गट्टी जमली. मला त्यांची मल्याळम् भाषा येत नव्हती. मी जमेल तितक्या इंग्रजीत अन्यथा सरळ खाणाखुणांनी त्यांच्याशी बोलायचो. त्यांच्या सहवासात राहून मीही चट्टेरी-पट्टेरी लुंगी वापरायला शिकलो, कमी वेळेत व कमी मसाल्यांत झटपट स्वयंपाक कसा करायचा याचे तंत्र शिकलो. 
मला या केरळी तरुणांचे फार कौतुक वाटत असे. ते इतके मेहनती होते, की सकाळी सातला कामाला बाहेर पडायचे ते रात्री नऊलाच घरी परत यायचे. कामावरही टिवल्या-बावल्या करत वेळ घालवण्याची सवय त्यांना नव्हती. एकदा कामाला भिडले, की बारा तासांत त्याचा फडशा पाडून रिकामेही व्हायचे. मी एकदा एका केरळी तरुणाला त्यांच्या मेहनतीचे रहस्य विचारले. त्यावर तो हसून म्हणाला, धनंजय त्यात रहस्य काहीच नाही. केरळमध्ये गरिबी खूप आहे. दैनंदिन खर्च भागवण्याइतके पैसे मिळण्यासाठीही दिवसभर कष्ट करावे लागतात. त्यामुळे आम्हाला कष्टाची आणि घाम गाळण्याची सवय आहे. आता या आखाती देशांमध्ये आमच्या मेहनतीची चांगली कमाई मिळते. त्यातील गरजेपुरती ठेवून बाकीची आम्ही घराकडे पाठवून देतो. त्याचा उपयोग करून काही घरगुती व्यवसाय करण्यासाठी घरच्यांना प्रोत्साहन देतो. कष्ट केले नाहीत तर आम्हाला घास गोड लागत नाही. 
या त्यांच्या सकारात्मक विचाराने मी खूप प्रभावित झालो. हळूहळू समजले, की परदेशात कामाला असलेला सर्व केरळी समाज असाच अथक घाम गाळणारा आहे. विशेषतः जहाजांवर मेहनतीची कामे करण्यात त्यांचा हात धरणारा कुणी नाही. केरळी लोक सुखाचे दिवस आले तरी कष्टाला पाठ दाखवत नाहीत. त्यांच्या लहानशा सवयींतून उद्योजकता शिकण्यासारखी होती. एखादा केरळी बांधव सुटीसाठी घरी जाई तेव्हा येताना कधीही रिकामा परत येत नसे. तो आपल्या दक्षिण भारतीय बांधवांना सवयीचे असलेले मसाले व खाद्यपदार्थ हमखास घेऊन येई. यामुळे दुबईत राहणार्‍या केरळी लोकांचे कधीही खाण्याचे हाल होत नसत आणि इकडे त्या तरुणालाही चार पैसे सुटत असत. 
एकदा मेहनतीचा हा मंत्र लक्षात आल्यावर मीसुद्धा आमच्या दुकानात सोळा तास कष्ट करू लागलो. कोणतेही काम लहान न समजता सकारात्मक विचाराने त्याचा आदर करू लागलो. दुकानात झाडू-पोछा, लादी-सफाई अशी कामे सरसावून करू लागलो. काटकसरीने जीवन जगायला शिकलो. बहुतेक दुबई मी वयाच्या विशी-बाविशीत पायी फिरुन पालथी घातली आहे. टॅक्सीचे भाडे वाचवण्यासाठी मी ठिकठिकाणी चालत जायचो. 
या मेहनतीचे फळ मला साडेतीन वर्षांनी मिळाले. आमचे दुकान फायद्यात आले. तेव्हापासून आजवर मी हा श्रमाचा मार्ग कधीही सोडलेला नाही. मला ‘आकाशी झेप घे रे पाखरा’ या चित्रपट गीताच्या अखेरच्या ओळी फार समर्पक वाटतात. 
घामातून मोती फुलले, श्रमदेव घरी अवतरले 
घर प्रसन्नतेने नटले, हा योग जीवनी आला साजिरा

अवश्य वाचा

सारे काही पाण्यासाठी..,