भारतीय राजकारणात वाचाळवीरांची संख्या काही कमी नाही. गेल्या काही वर्षांत तर त्यात चांगलीच भर पडली आहे. आपण काय बोलत आहोत, याचे जराही भान त्यांना राहात नाही. अर्थात, यातील अनेक जण ठरवून तसे बोलत असावेत. कारण, त्यांच्या बोलण्यावर समोरुन प्रतिसाद मिळत असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. या वाचाळवीरांमध्ये उजव्या विचारसरणीच्या लोकांची संख्या जरा जास्त दिसते. सुब्रमण्यम स्वामी, साक्षी महाराज, गिरिराज सिंग या राजकारण्यांबरोबरच विश्‍व हिंदू परिषद, बजरंग दल यांसारख्या संघटनांमधील अनेकजण धार्मिक द्वेष पसरवताना प्रक्षोभक वक्तव्य करीत असतात. विश्‍व हिंदू परिषदेच्या नेत्या साध्वी प्राची पुन्हा एकदा बरळल्या आहेत. हरिद्वारमधील भगवान शंकराच्या कावड यात्रेसाठी मुस्लिमांनी बनवलेल्या कावडींवर बहिष्कार घाला, असे वादग्रस्त विधान त्यांनी केले. या विधानामुळे त्यांच्यावर टीका होत असली तरी, त्यांचे हे विधान त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेशे आहे. उत्तर प्रदेशात कावड यात्रा मोठ्या प्रमाणात निघत असतात. भाविक उत्तर प्रदेशातील हरिद्वार, उत्तराखंडमधील गौमुख आणि गंगोत्री तसेच बिहारमधील सुलतानगंज येथून गंगा नदीचे पाणी कावडींमधून वाहून नेऊन त्याने भगवान शंकराची पूजा करतात. या कावड बनविण्याचे काम मुसलमान कारागीर करतात. 99 टक्के कावड मुसलमान कारागीर बनवतात. अनेक वर्षांपासूनची ही परंपरा. एवढेच काय तर, ज्या अयोध्येतील राम मंदिरावरुन देशभर रान पेटविले जाते, त्या राम मंदिराच्या परिसरात अनेक मुसलमानांची मंदिरे आहेत. रामलल्लासाठी लागणारे कपडे मुसलमान शिवत असतात. अनेक वस्तू मुसलमान त्यांच्या दुकानात विक्रीला ठेवत असतात. यावर आतापर्यंत सर्वसामान्य हिंदूंनी कधीच आक्षेप घेतला नाही. मात्र, तथाकथित नेत्यांना बोलताना काही तरी मुद्दा लागतो. लोक टाळ्या वाजवतात म्हणून मग त्यांनाही स्फुरण चढते आणि ते बोलत राहतात. म्हणूनच की काय, यानंतर साध्वी प्राची वादग्रस्त बोलतच राहिल्या. जे मदरशांमध्ये जन्म घेतात, ते मुंबईवरील हल्ल्याचा सूत्रधार आणि लष्कर-ए-तोयबाचा संस्थापक हाफीज सईदसारखे दहशतवादी बनतात. तसेच भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर आणि महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेसारखे लोक कधीही तसे होऊ शकत नाहीत. यावर देशातील बुद्धिवादी लोक कधीही भाष्य करीत नाहीत. मात्र, ‘मला फाशी झाली तरी चालेल; पण मी खरे बोलणारच’, असे साध्वी प्राचीने म्हटले आहे. ज्या साध्वी प्रज्ञासिंहचे कौतुक साध्वी प्राची यांनी केले, त्या साध्वी प्रज्ञासिंह ज्या आता खासदार झाल्या आहेत, त्यांनीही दोन दिवसांपूर्वी असेच काहीसे वादग्रस्त विधान केले होते. ‘तुमची गटारे आणि शौचालये साफ करायला मी खासदार झालेली नाही’, अशी मुजोरीची भाषाच साध्वी प्रज्ञासिंहने केली होती. खरे पाहता, साध्वी प्रज्ञासिंह ज्या पक्षाच्या खासदार आहेत, त्या पक्षाचे असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाला मोठे महत्त्व दिले आहे. देशभरात हे अभियान राबविले जात आहे. साध्वी प्रज्ञासिंह यांचे हे विधान म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच आव्हान असल्याचा निष्कर्ष अनेकांनी काढला. पक्षानेही त्याची दखल घेतली आणि पक्षाचे नवीनच नेमण्यात आलेले कार्याध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी स्वत: हे गांभीर्याने घेत साध्वीला समज दिल्याचे सांगण्यात येत आहे. अर्थात, साध्वी प्रज्ञासिंह आपल्या पक्षाच्या कार्याध्यक्षांनी दिलेली समज किती गंभीरपणे घेतात, हे येत्या काळात समजेलच. पण, त्या ही समज गांभीर्याने घेतील असे म्हणता येणार नाही. कारण, लोकसभा निवडणुकीच्या काळात प्रचारादरम्यान त्यांनी महात्मा गांधींचे मारेकरी नथुराम गोडसेला शहीद म्हटले होते. तर, मुंबईत 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले होते. त्यांच्या पक्षाने त्यावेळीही त्यांच्या विधानांची दखल घेतली होती आणि समजावले होते. मात्र, साध्वीने पक्षाने दिलेल्या समजची दखलच घेतली नाही. सरकारवर टीका करणार्‍यांना देशद्रोही संबोधून थेट पाकिस्तानात पाठविणारे गिरिराज सिंग असतील किंवा साक्षी महाराज असतील, असे हे वाचाळवीर कधी शांत राहात नाहीत. सतत ते बरळत असतात. अर्थात, असे वाचाळवीर भाजपमध्येच आहेत असे नाही, तर इतरही पक्षात आहेत. आजच समाजवादी पक्षाचे खासदार आजम खान यांनी लोकसभेत वादग्रस्त विधान केले. त्यावरुन आता गदारोळ सुरु आहे. लोकसभेत चर्चेदरम्यान आजम खान टीकेचे धनी झाले आहेत. लोकसभेत भाजप खासदार रमा देवी सभापतींच्या खुर्चीत विराजमान असताना, आजम खान इकडे तिकडे बघून बोलत असताना, सभापती रमा देवींनी त्यांना इकडे तिकडे न बघता खुर्चीकडे बघून बोलण्याचा सल्ला दिला असता, आजम खान यांनी, ‘सारखे तुमच्या डोळ्यात पाहावे असे मला वाटते’, असे वादग्रस्त विधान केले. यावरुन आता गदारोळ सुरु आहे. आजम खान तसे वादग्रस्त विधानासाठी प्रख्यात आहेत. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान त्यांच्याविरोधातील भाजप उमेदवार जया प्रदा यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केले होते. असे वाचाळवीर काही उत्तर भारतातच आहेत असे नाही, तर महाराष्ट्रातही आहेत. त्यातल्या त्यात राम कदम तर भारीच प्रसिद्ध आहेत. 

अवश्य वाचा

सारे काही पाण्यासाठी..,