शाहू छत्रपती यांचा जन्म 26 जुलै 1874 रोजी झाला. जहागिरदार जयसिंगराव घाडगे हे त्यांचे वडील. कोल्हापूरचे छत्रपती शिवाजी यांच्या अकाली मृत्यूमुळे महाराणी साहेबांनी यशवंतरावांना दत्तक घेतले आणि छत्रपती होण्याचे भाग्य त्यांच्या नशिबी आले. 1894 ला राज्याभिषेक होण्यापूर्वी शाहूराजांनी प्रथम आपला सर्व देश फिरुन पाहिला. तसे राजे सुरुवातीला सनातनी वृत्तीचे, पण भारतभ्रमणात त्यांना भोंदू धर्माच्या अनेक प्रचिती आल्या. नाशिक येथे शाहू महाराजांकडून दक्षिणा लुटणारे ब्राम्हण काय किंवा हैदराबादच्या मुक्कामी असताना अल्लाच्या नावे शाहू राजांच्या मागे ओरडत जाणारे मुसलमान फकीर काय? दोघेही एकाच धर्माचे प्रतिनिधी. यातच त्यांचे प्रबोधन होते. पण, वेदोक्त प्रकरणामुळे समाजसुधारक शाहू म्हणून सार्‍या भारतात ते प्रसिद्ध झाले. 
कार्तिक महिन्यात चातुर्मासात कार्तिकस्नान करत असताना, नारायण भटजी हा आंघोळ न करता, मळके कपडे घालून वेदोक्त मंत्र न म्हणता पुराणोक्त मंत्र म्हणत आहे, ही गोष्ट छत्रपतींबरोबर असलेल्या रामशास्त्री भागवताच्या लक्षात आली. ती त्यांनी शाहूराजांच्या लक्षात आणून दिली. ‘आपण पुराणोक्त मंत्रच का म्हणता’ असे शाहूराजांनी विचारताच, ‘तुम्ही शूद्र आहात. दोनच वर्ण ब्राम्हण आणि शूद्र! शूद्रांना कसले आलेत वेदोक्त मंत्र?’ त्याच्या उत्तराने शाहूराजे बेचैन झाले. मी राजा, माझ्या पदरी हे पगारी नोकर आणि तरी तो माझ्याशी असा उद्धटपणे वागला. तर मग खालच्या जातींची काय अवस्था असेल? हे वेदोक्त प्रकरण शाहू महाराजांच्या धार्मिक सुधारणा चळवळीला कलाटणी देणारे ठरले. आता यातच क्रांती घडवून आणायची, हाच आपला पराक्रम, असे ठरवून त्यांनी पुढचे कार्य हाती घेतले. त्यातच वेदोक्त प्रकरणात टिळकांनी सनातन्यांची बाजू घेतली. ‘केसरी’, ‘वेदोक्ताचे खूळ’ असा अग्रलेख लिहून ब्राह्मणांना पाठिंबा दिला. टिळकांचे शिवरामपंत परांजपे, भाऊशास्त्री लेले हे सर्व शाहू महाराजांना वेदोक्ताचा अधिकार देता येणार नाही, असे बोलू लागले. याबद्दल श्री.म. माटे आपल्या आत्मचरित्रात लिहितात की, ‘टिळकांनी गर्जना करून छत्रपती क्षत्रियच आहेत, त्यांना वेदोक्ताचा अधिकार आहे, असे सांगितले असते तर महाराष्ट्रातील जातीय विचारांना निराळेच वळण लागले असते.’
त्या काळी कोल्हापूर संस्थानांची लोकसंख्या नऊ लाख होती. त्यात 80 टक्के ब्राह्मणच शिकलेले. त्यांची संख्या फक्त 26 हजार. इतर जातीच्या शिक्षणाचे प्रमाण 5 ते 10 टक्के. दरबारातील 71 अधिकार्‍यांपैकी 60 ब्राम्हण, महाराजांच्या खासगी नोकरीत 52 पैकी 45 ब्राम्हण. थोडक्यात, संस्थानातही नोकर्‍या ही ब्राह्मणांची मिरासदारी बनली होती. हे थांबले पाहिजे, म्हणून राजाने आपल्या संस्थानात देश स्वतंत्र होण्यापूर्वीच मंडल आयोगाची अंमलबजावणी करून 50 टक्के आरक्षण दिले. बहुजन समाजील तरुणांना मोठ्या पगारावरच्या जागा  दिल्या. आपल्या  खासगी कामांसाठी महार समाजातील तरुणांना प्राधान्य देऊन संस्थानातील शिवाशिवीचा खेळ त्यांनी बंद  केला. दलित तरुणांना वकिलीच्या सनदा दिल्या. 
दलित समाजाच्या उद्धाराची भीमपताका डॉ. भीमराव  आंबेडकर या दलित नेत्याच्या हाती जाणार हे द्रष्ट्या राजाने  आधीच जाणले होते. त्यांना भेटायला जाताना कोणतीही औपचारिक न पाळता त्यांचा पत्ता विचारत शोधत-शोधत त्यांनी वडाळ्याची चाळ गाठली.
सार्‍या भारतातील संस्थानिक आपल्या सत्तेत अंदाधुंद झाले  असता, संस्थानिकांमधील या प्रबोधनकारांचा मृत्यू 6 मे 1922 रोजी मुंबईत हृदयविकाराच्या झटक्याने झाला.
त्यांच्या  मृत्यूची  बातमी  कळताच  बहुजनांना  आपला  आधार  तुटला  असे  वाटू  लागले. तर,  दुसरीकडे  पुर्‍या  मुंबईसारख्या शहरात सनातनी उच्च वर्णियांनी एकमेकांना पेढे  वाटून आनंद दिन म्हणून साजरा केला, हे हिंदूंचे दुर्दैव, दुसरे काय!

अवश्य वाचा

सारे काही पाण्यासाठी..,