आज जिकडे-तिकडे डोंगर तोडले जात आहेत. 1990 पासून या कृत्यांना खूप वेग आला. गृहनिर्माण, रस्तेबांधणी, कोळसा, लोखंड, बॉक्साईट (अ‍ॅल्युमिनियम) आणि इतर खनिजांसाठी, सीमेंट आदी उद्योगांसाठी रोज डोंगर तोडले जात आहेत. डोंगर तोडले जात असताना, जंगल नष्ट होत असताना, लाखो बोअरवेल पाणी उपसत असताना आपण नद्या वर्षभर वाहत राहतील, विहिरी-तळी भरतील, भूजल टिकेल, पूरनियंत्रण होईल, उष्णता कमी होईल आणि मानवजात व जीवसृष्टीचे उच्चाटन टळेल अशी अपेक्षा तरी कशी करू शकतो? दरवर्षी लाखो माणसे पदव्या मिळवत आहेत, परंतु हा समाज आपल्याला अस्तित्व देणार्‍या या एकमेवाद्वितीय ग्रहाबाबत, पृथ्वीबाबत निरक्षर आहे. किंबहुना, या शिक्षणामुळेच निरक्षर आहे. मानवजात आणि जीवसृष्टीचे उच्चाटन सुरू झाले आहे व फक्त पृथ्वीशी सुसंगत जीवन अंगिकारले तरच मानवजात वाचू शकेल. 
इंधनासाठी रॉकेल वा गॅस वापरल्यास कुठे तरी हजारो किलोमीटर दूर समुद्राच्या खाली, पृथ्वीच्या पोटात किंवा वाळवंटात, जंगलात, भूमीत उत्खनन होते. तेलाचे प्रदूषण सर्वत्र पसरते. मग जहाज वा इतर वाहनांद्वारे वाहतूक होते. या तेलावरील प्रक्रियेसाठी प्रदूषण करणार्‍या रिफायनर्‍या चालतात. गॅसचे कोट्यवधी सिलिंडर बनवण्यासाठी वेगळी हानी होते. या सर्व गोष्टींमध्ये प्रचंड ऊर्जेचा वापर होतो, हरितद्रव्याचा नाश होतो. 40 अंशापेक्षा जास्त, असह्य वाढत्या उष्म्यामुळे युरोपमध्ये अनेक माणसे नग्नावस्थेत राहू इच्छितात. मोटार, वीज, सिमेंट नको म्हणता; मग आम्ही अश्मयुगात जायचे का, नग्नावस्थेत राहायचे का, असा सवाल करणार्‍यांनी हे समजून घ्यावे की मनुष्यप्राण्याने ‘प्रतिष्ठा’ किंवा ‘लज्जारक्षण’ अशा काल्पनिक कारणांनी सुरुवातीला वस्त्र परिधान केले नव्हते. थंडी, वाळूची वादळे इत्यादींपासून संरक्षण हवे म्हणून झाडांची पाने, कातडे वल्कले वगैरे स्वरुपाची आवरणे तो वापरू लागला. आता उष्म्यापासून जिवंत राहण्यासाठी त्याला वस्त्र फेकावे लागते. शेती, घरं, वस्त्र, अन्न शिजवणे, घोड्यासारख्या प्राण्याचा वा बैलगाडीचा वाहन म्हणून उपयोग करणे, यात पूर्ण नैसर्गिक जीवनापासून फारकत होती. तरी पृथ्वीच्या बैठकीला मूलभूत धक्का देत नसल्याने हे चालू शकत होते. आज मात्र शहाणपण यात जंगलयुगात जायचे नाही आणि यंत्रयुग जिवंत ठेवणार नाही अशी परिस्थिती आहे. म्हणून सुवर्णमध्य साधणार्‍या चरखा, हातमागाच्या शाश्‍वत होऊ शकणार्‍या कृषीयुगात जायला हवे. थोडाही (दोन-पाच वर्षांचा) विलंब मानवजातीचे उच्चाटन घडवू शकतो, अशी वेळ आली आहे.
हार्वर्डच्या एका तज्ज्ञाच्या अहवालात म्हटले आहे की, पुढील पाच वर्षांमध्ये उपाययोजना न केल्यास मानवजात वाचणार नाही. हे खरं आहे, पण पुढे त्यांनी पाच वर्षांमध्ये करण्याचा सुचवलेला उपाय म्हणजे दुसर्‍या महायुद्धाच्या पातळीवर प्रयत्न करून कार्बन प्रदूषण (उत्सर्जन) थांबवणे आणि ध्रुव प्रदेशावर येणारी सूर्यकिरणे परावर्तित करणे. हा उपाय न होणारा आणि चुकीचा आहे. फक्त तंत्रज्ञानाच्या चौकटीतून विचार केल्याने आणि पृथ्वीवरील जीवन समजून न घेतल्याने तंत्र आणि अर्थकेंद्री विचारप्रक्रियेमुळे त्यांना खरा उपाय दिसत नाही. स्वतःला प्रगत म्हणवणार्‍या मानवाने गेली 250 वर्षे पृथ्वीला स्वतःच्या अटींवर वागवले. आता त्याने चूक कबूल करून स्वतः पृथ्वीच्या अटीवर वागावे. हे म्हटले तर खूप कठीण आहे आणि म्हटले तर सोपे आहे. आजही असे जगणारी करोडो माणसे आहेत. शहर सोडून गावात-उद्योगपूर्व ऊर्जाविरहित जीवन जगण्यासाठी परत जाणे आणि माती-कुडाच्या घरात राहणे हे बहुतांश समाजाला टोकाचे वाटते. पण, पृथ्वीच्या संदर्भातले सत्य समजले तर विनाश घडवणार्‍या कार, वीज, सिमेंट, एसी या टोकाच्या गोष्टी आहेत आणि त्या वापरणार्‍या शहरात राहणे ही अतिटोकाची बाब आहे, हे लक्षात येईल. हा पृथ्वीच्या आणि जीवसृष्टीच्या संदर्भात दहशतवाद आहे. भयंकर स्वरुपाचा हिंसाचार आहे.
तंत्रज्ञान माणसाला संमोहित करून ताब्यात घेते, वश करते. तो हे मिळवू की ते मिळवू असे करत आयुष्य घालवतो. जगणे गमावतो. विकास नाही झाला तर जगायचे कसे, असा तर्कहीन प्रश्‍न विचारू लागतो. संपूर्ण मानवजातीवर केलेला हा एक ‘ब्ल्यू व्हेल’सारखा खेळ आहे. याच्या एक-एक पायर्‍या लहानपणापासून शिक्षणाद्वारे पार करायला लावल्या जातात. शेवटी या खेळात बेभान झालेली मानवजात आत्मघाताची शेवटची पायरी ओलांडेल; जी आता चालू आहे. आता जगभर तरुण पिढीला विश्‍वास आणि प्रेमाने वास्तवाचे ज्ञान देण्याची गरज आहे. सध्या निर्माणाधीन प्रकल्पांसह पूर्ण औद्योगिकरण आपल्या अस्तित्वासाठी थांबवणे गरजेचे आहे. त्यांना नोकरी करता येणार नाही. माणसे म्हणतात, आम्हाला कळले की मानवजात नष्ट होत आहे तर आम्ही योग्य ते करू. त्यांना हे कळत नाही की या प्रश्‍नाचे स्वरूप वेगळे आहे. यात मानवजातीला तिच्या आकलनावर सोडले तर उशीर होईल आणि कळेल तेव्हा वाचण्याची संधी संपलेली असेल. औद्योगिकीकरण थांबवले तर वाचण्याची शक्यता तयार होईल, पण ते थांबवण्यासाठी फक्त दोन-पाच वर्षेच उपलब्ध आहेत. 
फक्त 30 वर्षांमध्ये मानवजात नष्ट होत असताना, औद्योगिकरण चालू ठेवून हा प्रश्‍न सोडवू असे म्हणणे हे स्वप्नरंजन आहे. मृत्यूचा विचार सामान्यतः कुणालाही नकोसा वाटतो. अनेकांना अल्पावधीत मानवजात नष्ट होणार, हे सत्य पचवणे जड जाते, भयभीत करते. ज्याप्रमाणे लहान मूल भीतीदायक गोष्ट समोर आल्यावर आपले डोळे मिटून घेते आणि संकट टळले, अशी समजूत घालते, त्याप्रमाणे मोठी माणसेदेखील वेगवेगळ्या कल्पना करून स्वतःच्या मनाची समजूत काढतात की, हे संकट टळेल. त्यांनी आपल्या आसपास आता उशीरा का होईना, पण पडू लागलेल्या पावसात, अत्यंत प्रतिकूलतेतही फुलणार्‍या निसर्गाच्या सृजनाकडे नजर टाकावी आणि प्रेरणा घ्यावी. 
हीच जर चळवळ बनली तर मानवजात वाचेल. परंतु, परिस्थितीचे गांभीर्य माहीत नसल्याने विनाश अधिक जवळ आणणार्‍या विकासाची, आणि नोकर्‍यांची मागणी होत आहे. आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये प्रमुख देशांचे नेते अधिक उद्योग आणि व्यापाराचे करार करत आहेत. जी-20 परिषदेसाठी जपानला गेलेले आपले पंतप्रधान, पाच वर्षांमध्ये पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था आणि पन्नास हजार स्टार्ट अपची घोषणा करतात. दुसर्‍याच दिवशी भारतात परतल्यावर, पाण्याचे पारंपरिक स्त्रोत पुनरूज्जीवित करण्यात येण्याची गरजही मांडतात. या परस्परविरोधी बाबी आहेत याचे भान कुणाला नाही. काही दिवसांपूर्वी पंतप्रधानांनी शेतीत कार्पोरेटस वाढणार असल्याचे सूतोवाच केले आहे. आताच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात, एकाच वेळी उद्योगांची-महामार्गांची वाढ, देशातल्या प्रत्येक घरात 2022 पर्यंत वीज, गॅस सिलिंडर आणि प्रत्येक ग्रामीण घरात 2024 पर्यंत शुद्ध सुरक्षित पिण्याचे पाणी ही ‘जो जे वांच्छील, तो ते लाहो’ अशी भूमिका मांडण्यात आली आहे. औद्योगिकरण आणि पाण्याच्या पारंपरिक स्त्रोतांचे पुनरूज्जीवन एकत्र होऊ शकणार नाही, हे अजूनही तज्ज्ञ म्हणवणार्‍यांच्या लक्षात येत नाही. ते फक्त औद्योगिकरण नाकारून कृषीयुगात गेलो तरच शक्य आहे. ज्यांना सर्वनाश ओढवणार हे समजते, ते इशारा देतात की, भारत तापमानवाढीच्या समस्येला तोंड देण्यासाठी तयार नाही. आता तयार असणे म्हणजे काय? तापमानवाढ म्हणजे काय पाकिस्तान आहे; तोंड देण्यासाठी तयार असायला!
या ठिकाणी हे स्पष्टपणे सांगितले पाहिजे की, ताबडतोब सर्वाधिक धोकादायक असलेले ‘मोटार’ हे वाहन सोडा. वीज आणि सिमेंटचा वापर कमी करत जा. आणि, हे केल्यानेही मानवजात वाचणार नाही म्हणून लवकरात लवकर प्रत्येकाने आपले अन्न आपण पिकवणारा माणूस बनावे आणि स्वस्थ राहावे. आज जी 2022 व 2024 वर्षे भरभराटीसाठी सरकार सांगत आहे ती प्रत्यक्षात उत्तर ध्रुवावरील आणि हिमालयातील बर्फाचे आवरण नष्ट करणारी आणि म्हणूनच अंत निश्‍चित करणारी वर्षे आहेत. 135 कोटी लोकसंख्येचा हा देश आपले हजारो वर्षांचे शहाणपण आणि साधेपण सोडून अत्यंत महत्त्वाच्या क्षणी स्वीकारत असलेला मार्ग पूर्ण विनाशाचा आहे. आता जीवनाचे रक्षण करण्यासाठी जगभर, सरकारांच्या वा कुणाच्याही विरोधात नसलेली, किंवा कुणावर अवलंबूनही नसणारी पूर्ण मानवजातीची, स्वतःच्या आचरणात पृथ्वीसुसंगत बदल घडवणारी, अंतिम चळवळ तातडीने सुरू व्हावी.

अवश्य वाचा

रस्त्या केला गिळंकृत