दिल्लीच्या राजकारणावर मराठी माणसाचा दबदबा असण्याची परंपरा शिवाजी महाराजांपासून सुरु होती. पेशवाईत तर दिल्लीची राजकीय गणिते पुण्याच्या शनिवारवाड्याच्या पुस्तकातूनच सोडवली जायची. स्वातंत्र्यानंतरसुद्धा दिल्लीच्या राजकारणात मराठी माणसाला मानाचे स्थान होते. या परंपरेतला शेवटचा स्वाभिमानी मराठी माणूस चिंतामणराव द्वारकानाथ देशमुख उर्फ सी.डी. देशमुख. 
14 जानेवारी 1896 रोजी रायगड जिल्हातील महाड तालुक्यातील नाते या खेड्यात सी.डी. देशमुख यांचा जन्म झाला. रोह्यात माध्यमिक शाळेतील शिक्षण पूर्ण करुन पुढील शिक्षणासाठी त्यांनी मुंबई गाठली. मुंबई विद्यापीठाच्या मॅट्रिक परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होऊन मानाची जगन्नाथ शंकरशेठ संस्कृत शिष्यवृत्ती त्यांनी पटकावली. इंग्लंडमध्ये जाऊन आय.सी.एस. परीक्षा प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. याच काळात रोझिना नावाच्या एका इंग्लिश युवतीशी त्यांनी विवाह केला. 1919 साली त्यांनी लोकमान्य टिळकांची भेट घेऊन टिळकांच्या सांगण्यानुसार राजकारणात न पडता प्रशासकीय सेवेत प्रवेश केला. कारण, देश स्वातंत्र्य झाल्यानंतर तुमच्यासारखा हुशार कार्यक्षम प्रशासकीय अधिकार्‍याची राजकारणी लोकांपेक्षा जास्त गरज देशाला आहे, असे टिळकांचे म्हणणे आहे. 13 ऑगस्ट 1942 रोजी रिझर्व्ह बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर म्हणून त्यांची नेमणूक झाली. 1950 साली देशाच्या अर्थमंत्रीपदावर त्यांची नेमणूक झाली. 1952च्या निवडणुकीत कुलाबा (आताच रायगड) मतदारसंघातून ते लोकसभेवर निवडून गेले. अर्थमंत्रीपदावर असताना त्यांनी अत्यंत कुशलतेने राजकीय मुस्तद्दीपणा पणाला लावून विम्याचे राष्ट्रीयीकरण अतिशय गुप्तपणे पार पाडले. 
अर्थमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यावर त्यांनी पुणे विद्यापीठ अनुदान मंडळाचे अध्यक्षपद स्वीकारले. फिलिपाईन्सचा अत्यंत मानाचा असा ‘मॅगेसेस पुरस्कार’ त्यांना मिळाला. 1961मध्ये त्यांनी दिल्ली विद्यापीठाचे कुलगुरुपद भूषवले. 1969 मध्ये पुन्हा राजकारणात उडी घेऊन थेट राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवली. त्यात पराभव झाला; परंतु त्यांच्या राजकीय प्रवेशामुळे खुद्द इंदिरा गांधींना धडकी भरली होती. 1961 साली त्याची दुसरी पत्नी दुर्गाबाई हिचे निधन झाल्यावर 2 ऑक्टोबर 1982 रोजी सी.डीं.ची. प्राणज्योत मालवली. 
सी.डीं.चा जीवन अंक नाट्यमय प्रसंगाची भरलेला आहे. आपल्या अफाट बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांनी राष्ट्रीय नव्हे, तरी आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या कार्याचा ठसा उमटवला. तथापि, सी.डी. गाजले ते त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत नेहरुंच्या तोंडावर फेकलेल्या राजीनाम्यामुळे. आणि त्यानंतर 24 जुलै 1956 रोजी त्यांनी संसदेत पंडितजींच्या समोर मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, याबाबतीत केलेल्या निवेदनामुळे. या घटनेची थोडक्यात घटना अशी. 
मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, अशी कोटी-कोटी मराठी जनतेची भावना होती. त्या भावनांचा अनादर करून पण नेहरुंनी मुंबई ही महाराष्ट्रापासून तोडण्याचा घाट घातला आणि मुंबई केंद्रशासित प्रदेश ठेवण्याचा निर्णय घेतला. या घटनेने मराठी माणसाचे पित्त खवळले नाही, तर नवल व याचा निषेध म्हणून तत्कालीन महाराष्ट्रातील काँग्रेसचे दिग्गज नेते यशवंतराव चव्हाण यांनी राजीनाम्याची घोषणा केली. तेव्हा कॉ. कमिटीचे अध्यक्ष देवगिरीकर, पाटसकर, आळनेकर, भाऊसाहेब हिरे यांनी बैठक घेऊन राजीनामा द्यायचे पक्के केले. या काळात सी.डी. हे केंद्रीय मंत्रिमंडळात अर्थमंत्री होते. अर्थतज्ज्ञ या नात्याने त्यांच्या असे लक्षात आले की, मुंबई जर केंद्रशासित केली, तर गरिबांचे फार नुकसान होईल. तसेच सिंधूवाचून हिंदू तसेच मुंबईवाचून महाराष्ट्र ही कल्पना त्यांनाही सहन होणारी नव्हती. जेव्हा या मंडळींनी सी.डीं.च्या घरी येऊन आपल्या राजीनाम्याचा मनोदय व्यक्त केला व आम्ही उद्याच राजीनामा देत आहोत, अशी वल्गना राणा भीमदेवी थाटात केली, तेव्हा तुम्ही जर उद्या राजीनामा देत असाल, तर मी आजच देतो, असे म्हणून सी.डीं.नी आपला राजीनामा पाठवला; परंतु काँग्रेसच्या एकही नेत्याने दुसर्‍या दिवशी राजीनामा दिला नाही. 
आपल्या या राजीनाम्याचे सी.डीं.नी संसदेत 24 जुलै 1956 रोजी निवेदन केले. राज्यकर्त्यांच्या महाराष्ट्रद्वेष्ट्या भूमिकेवर त्यांनी कठोर टीका केली. त्यांच्या जाज्वल्यपूर्ण भाषणावर वेगवेगळ्या पक्षातील सदस्यांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या. डॉ. लंकासुंदर म्हणाले, ‘त्यांच्या भाषणाने माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले.’ ‘फारच रुबाबदारी जाणीव विदारक,’ अशी प्रतिक्रिया एक मद्रासी खासदाराने व्यक्त केली. एक बिहारी सदस्य म्हणाला, ‘गेली कित्येक वर्षे विरोधी पक्षाला जमले नाही, ते देशमुखांनी 30 मिनिटांत केले.’ शंकरराव मोरे म्हणाले, ‘ते बोलत असताना  शिवकालीन वीरपुरुष माझ्या डोळ्यांपुढे सरकत होते.’ त्यांच्या उत्तराला नेहरुंनी केलेले भाषण अगदीच मुळमुळीत झाले. त्यांच्या एकाही प्रश्‍नाचे धड उत्तर नेहरुंना देता आले नाही. दुसर्‍या दिवशी सर्वच वर्तमानपत्रांच्या हेडलाईन देशमुखांच्या भाषणांच्याच होत्या. परंतु, ही सर्वच वृत्तपत्रे भांडवलीवाल्यांच्या मालकीची असल्याने त्यांना मुंबई ही केंद्रशासित हवी होती. त्यामुळे त्यांनी देशमुखांच्या नावांनी बोटे मोडली आणि म्हणूनच आचार्य अत्र्यांनी आपल्या ‘नवयुग’ या साप्ताहिकात ‘चिंतामणी देशाचा कंठमणी झाला’ असा गौरवपूर्ण लेख लिहिला.

अवश्य वाचा

पोटनिवडणूक मतमोजणी सोमवारी.