जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात साऱ्या हिंदुस्थानानेच नव्हे तर इंग्लंडवासियांचे लक्ष मुंबई शहरातल्या 'सरदार गृहावर' केंद्रित झाले होते. याचा सरदारगृहाच्या तिसऱ्या मजल्यावर "स्वराज्य हा मजा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच,"अशी भीष्मप्रतिज्ञा करण्याऱ्या लोकमान्य टिळकांची मृत्यशी झुंज चालली होती. 

               टिळक त्या वेळी ६४ वर्षाचे होते. मंडालेच्या तुरुंगातून सुटून नुकतीच पाच -सहा वर्षे झाली होती. तुरुंगात असल्यामुळे प्रकृतीवर थोडाफार फरक पडला होता. पण काळ इतक्या लवकर झडप घालेल असे टिळकांना सुद्धा वाटले नव्हते. अंगात थोडासा ताप असल्यामुळे एके संध्याकाळी दिवाण चमनलाल यांनी त्यांना घेऊन आपल्या उघड्या मोटारीतून समुद्राच्या काठी गार वाऱ्यात फेरफटका मारला. वास्तविक ताप असताना टिळकांनी फिरायला नको होते. पण एवढी एकच चूक त्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरली.  कारण त्या हिवतापाचे रूपांतर न्यूमोनिया या आजारात झाले आणि हि खबर मुंबईत हाहा म्हणता पसरली. 

                  टिळकांचे सारे जीवनच अद्भुत चमत्कारांनी भरलेले असल्याने हा आजार बरा होईल असाच लोकांना समज होता.टिळकांच्या हातून अजून काहीतरी पराक्रम घडणार होते. सर्वात महत्वाचे म्हणजे देशाला स्वराज्य मिळवून देण्याचे त्यांचे स्वप्न अजून साकारले नव्हते. ते मिळाल्याखेरीज टिळक जाणार नाहीत. अशी लोकांची ठाम समजूत होती.पण काळच जवळ आल्याने वेळेचे काहीही चालले नाही. टिळकांचा शेवटचा आजार जेमतेम ८-१० दिवसच टिकला. तात्कालिक डॉक्टर मंडळी त्यांच्या बीछान्याजवळ बसून होती. डॉक्टरांनी आपल्या वैद्यकीय उपचारांचा अगदी परमोच्य बिंदू गाठला. पण ताप उतरण्याची काहीच चिन्हे दिसेनात,तेव्हा हिंदुस्थानवासीयांचे धाबे दणाणले. टिळकांच्या प्रकृतीच्या समाचारासाठी महाराष्ट्रातूनच नाही तर सबंध हिंदुस्थानातून लोकांची  रीघ मुंबईच्या सरदार गृहाकडे लागली. तासनतास हजारो लोक सरदार गृहाच्या तिसऱ्या मजल्याकडे आशाळभूतपणे पाहत होते. पण ...... 

                            शेवटच्या तीन चार दिवसांत आपल्या परिचयाची माणसेही ओळखू येईनाशी झाली. ३१ जुलैचा तो शनिवार होता. डॉक्टरांनी टिळकांच्या प्रकृतीबाबत आशा सोडली. टिळकांचे जगणे आता अशक्यच, हि बातमी साऱ्या शहरात पसरल्याने अल्पावधीत लक्षावधीत माणसे सरदार गृहासमोरच्या विस्तीर्ण रस्त्यावर उभी होती. बाहेर धोधो पाऊस कोसळत होता. १०,११,१२ वाजले तरीही गर्दी वाढत होती. पण रातकिड्याखेरीज कुणाचाही आवाज गर्दीतून येत नव्हता. सरदार गृहाच्या तिसऱ्या मजल्यावर खट्ट जरी वाजले  तरी लाखो चिंतातुर चेहरे  श्वास रोखून वर बघत. लोक मनातल्या मनात टिळकांच्या प्रकृतीला अराम मिळो, अशी प्रार्थना करत होते. तोच एक मनुष्य वरून खाली येत असल्याचे दिसले आणि 'गेले' हा एक भयाण अस्पष्ट शब्द तो कुजबुजला व लक्षावधी लोकांच्या तोंडातून तो अशुभ शब्द ऐकू येऊ लागला. हि घटना घडली तेव्हा ठीक १२. २४ मी. झाली होती. मुंबई कर अवघ्या तासाभरात  सरदार गृहाजवळ जमले होते. मृत माणसाच्या भोवती जशी आप्तमंडळी शांतपणे उभी असतात तशाच भावनेने देशभरातील लाखो नागरिक काळोखात उभे होते. टिळकांचे मृत शरीर पुण्याला न नेता चौपाटीच्या विस्तीर्ण वाळवंटातच त्यांच्या अंत्यविधी पार पडणार होता. सरदार गृहातून दुपारी दोन वाजता निघालेली अंत्ययात्रा ७ च्या सुमारास चौपाटीवर आली. चौपाटीच्या समुद्रावर माणसांच्या महासागराचा थवा उभा होता, आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप द्यायला त्याच रात्री १० वाजता महात्मा गांधींजीनी असहकार चळवळीची ब्रिटिशांविरुद्ध घोषणा केली. टिळकांनी लावलेली स्वातंत्र्याची मशाल खाली न पडू देता गांधीजींनी  ती आपल्या हाती त्याच दिवशी घेतली. किती अविस्मरणीय हा दिन आणि म्हणूनच १ ऑगस्ट हि तारीख कानावर आली कि आपल्या डोळ्यासमोर एक महान विभूती उभी राहते आणि ती म्हणजे 'लोकमान्य टिळक'.

 

१ ऑगस्ट 

इतर दिनविशेष 

१)१८६१- भारतीय रसायन शाश्त्रज्ञ आचार्य प्रफुल्लचंद्र रे यांचा जन्म. 

२) १८६६- आशिया खंडातील पहिले पशुवैद्यकीय महाविद्यालय मुंबईत सुरु. 

३)१९२०- राष्ट्रीय पक्षाचे साप्ताहिक 'लोकशाही' मुंबईत सुरु. 

४)१९३२- आयरिश अभिनेता पीटर ओटूल यांचा जन्म. 

५)१९५८- भारतीय क्रिकेट खेळाडूं अर्शद अय्युब यांचा जन्म.   

अवश्य वाचा