खरे तर राजकारण हा त्यांचा पिंड नव्हता. ते राजकारणात पडले नसते तर प्राच्यविद्या संशोधक झाले असते. हे ‘ओरायण’ म्हणजे ‘मृगशीर्ष’ हा ग्रंथ ज्या अर्थी त्यांनी लिहिला, त्यावरून वाटते. ऋग्वेदाचा अभ्यास करुन वैदिक काळ इ.स. पूर्व सहा हजार वर्षांचा असावा, असे मत त्यांनी मांडले, तर आचार्य मूळ वसतिस्थान कोणते या विषयावर रीींळल हेाश ळप ींहश र्ींशवरी हा ग्रंथ लिहिला. पण, ते राजकारणात पडल्यामुळे एक इतिहासकाराला आपण मुकलो. याशिवाय आपण एका गणितज्ज्ञाला मुकलो. कारण, ते स्वतःच म्हणाले की, मला जर राजकारणात पडावे लागले नसते, तर मी गणितासारख्या विषयात संशोधन करीत राहिलो असतो. त्यांना समाजकार्याचीही आवड होती. पण, देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या आवडीनिवडीचा त्याग करून राजकारणात उडी मारणारे, ब्रिटिशांच्या दृष्टीने भारतीय असंतोषाचे जनक असणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. 
लोकमान्य टिळकांचे वडील गंगाधरपंत हे पेशाने शिक्षक होते. लोकमान्यांना त्यांनी लहानपणीच गणित व संस्कृतची गोडी लावली होती. प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यावर टिळकांनी पुढील शिक्षणासाठी पुण्याचा रस्ता पकडला आणि मग बी.ए, एम.ए., एल.एल.बी.ची पदवी संपादन केली. पारतंत्र्याची सुरुवात ही शाळांपासून होते. याचे अचूक भान टिळकांना असल्यामुळे आपल्या राजकीय कारकीर्दीचा श्रीगणेशा त्यांनी पुण्यात केला. 1885 साली न्यू इंग्लिश स्कूल हा राष्ट्रीय विचारांची शैक्षणिक संस्था त्यांनी स्थापन केली. त्यानंतर अवघ्या चार वर्षात ‘केसरी’ व ‘मराठा’ ही राष्ट्राभिमानाची वृत्तपत्रांची स्थापना केली. त्यानंतर राजकारणात हे मराठी पाऊल पुढेच पडत चालले होते. 
1897च्या सुमारास पुण्यात प्लेगने थैमान घातले असता रँडने प्लेगच्या निर्मूलनाच्या नावाखाली अत्याचाराचा कळस केला. तेव्हा चाफेकरांनी ‘षंढांनो, हे अत्याचार सहन कसे करता’, असे उद्गार काढल्यावर लोकांचा ‘षंढ म्हणणारे स्वतः पुरुष असते तर रँड जिवंत राहिला असता का?’ असा खोचक उलटा सवाल चाफेकरांना त्यांनी केला. आणि मग पुढचे महानाट्य घडले. वीर सावरकर, सेनापती बापट, डॉ. खानखोजे इत्यादी क्रांतिकारकांचे प्रेरणास्थान टिळकच होते. बॉम्ब कसा उडतो, याचे प्रात्यक्षिकही त्यांनी पाहिले होते. तथापि, पुरेसे सैन्य तयार झाल्यावरच बंड पुकारण्याची त्यांची तयारी होती. टिळकांच्या या क्रांतिकारी वृत्तीमुळे रँडच्या वधापायी दीड वर्षाची सक्तमजुरीची शिक्षाही ब्रिटिशांनी दिली होती. त्यावेळी ‘राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नव्हे’ हा त्यांचा लेख गाजला. त्यांच्या अटकेच्या निषेधार्थ मुंबई बंद ठेवण्यात आली होती. मुंबई बंदची प्रथा ही टिळकांच्या अटकेपासून सुरु झाली. गणेशोत्सव, शिवजयंती उत्सव सुरु करून त्यांनी धर्माभिमानातून राष्ट्रभिमानाचा प्रज्ज्वलित केला. 
मंडालेच्या तुरुंगातून सुटका झाल्यावर ‘पुनःश्‍च हरी ओम’ म्हणत त्यांनी होमरुल चळवळीची घोषणा केली. होमरुलच्या निमित्ताने देशभर टिळकांनी वातावरण तापवले. भारतीय असंतोषाचे जनक असे बोलणार्‍याला चिरील या लंडनच्या न्यायालयात खेचून त्याच्याविरुद्ध अब्रुनुकसानीचा दावा ठोकला. त्यात ते हरले खरे; परंतु पुढे असंतोषाचे जनक ही बिरुदावली त्यांची गौरवदायी ठरली. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील चिखलगावसारख्या छोट्या खेड्यात 23 जुलै 1856 रोजी जन्माला आलेले हे बाळ आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर राज्यमान्य ते लोकमान्य असा प्रवास करुन अखिल भारतीय पातळीवर आपला दबदबा निर्माण करणे ही काही सामान्य गोष्ट नव्हे. कोणाच्याही ध्यानीमनी नसताना 1 ऑगस्ट 1920 रोजी केवळ ताप आल्याचे निमित्त होऊन टिळकांना देवाज्ञा झाली. 
(सौजन्य ः सहज शिक्षण यू ट्यूब वाहिनी)

दिनांक 23 जुलै 2019 
आजचे इतिहासातील दिनविशेष : 

वनसंवर्धन दिन 
1) 1856- लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म. 2) 1898- ज्ञानपीठ पुरस्कार विजेते बंगाली साहित्यिक ताराशंकर बंदोपाध्याय यांचा जन्म. 3) 1906- नोबेल विजेते स्विस रसायनशास्त्रज्ञ ब्लाडीमिर प्रलॉग यांचा जन्म. 4) 1908- लोकमान्य टिळकांच्या अटकेच्या निषेधार्थ मुंबईच्या कामगारांनी संप पुकारला. 5) 1916- स्कॉटिश  रसायनशास्त्रज्ञ सर विल्यम्स रॅमसे यांचे निधव. 6) 1927- मुंबईत आकाशवाणीची नियमित सेवा सुरु. 7) 1936- आधुनिक बालशिक्षण क्षेत्रातील आद्य कार्यकर्ते गिजुभाई बधेका यांचा जन्म. 8) 1949- फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया या देशव्यापी स्वयंसेवी संस्थेची मुंबईत स्थापना. 9) 1968- ब्रिटिश शरीरविज्ञान शास्त्रज्ञ सर हेन्री हॅलेट डेल यांचे निधन. यांना ‘द केमिकल ट्रान्समिशन ऑफ नर्व्हइनम्पलेसेस’ या संशोधनाबद्दल नोबेल पारितोषिक मिळाले. 10) 1983- स्वदेशी बनावटीच्या कल्पक्कम अणु वीज केंद्राचे पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते उद्घाटन. 11) 1993- ‘इन्सॅट 2 ब’ या भारताच्या उपग्रहाचे यशस्वी उड्डाण. 12) 1999- कोलंबिया यानाचे यशस्वी उड्डाण. या यानाद्वारे अमेरिकेने एक वेधशाळा अंतराळात सोडली. त्याला भारतीय शास्त्रज्ञ डॉ. चंद्रशेखर सुब्रम्हण्यम यांचे नाव दिले. 13) 2004- अभिनेते ओम पुरी यांची ब्रिटनच्या राजघराण्यातर्फे दिल्या जाणार्‍या ‘ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर’ या पुरस्कारासाठी निवड. 14) 2014- ट्रान्सएशिया एअरवेजचे विमान तायवानच्या पघु द्वीपमध्ये उतरण्यापूर्वीच चक्रीवादळामुळे इमारतीला जाऊन धडकले. यात 48 प्रवाशांचा मृत्यू झाला. 15) 2015- नासाच्या शास्त्रज्ञांचा केपलर 452 बी या सूर्यासारख्या तार्‍याचा शोध लागल्याचा दावा. 16) 2016- अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये आत्मघातकी हल्ल्यात 80 ठार. 17) 2016- भारतीय हवाई दलाचे विमान बंगालच्या उपसागरावरून जाताना बेपत्ता. विमानात 32 जवान. 18) 2015- चिनी सैन्याकडून तैवानच्या राष्ट्राध्यक्षांच्या प्रसादाची प्रतिकृती बनवून त्यावर हल्ल्याचा सराव.अवश्य वाचा