शीख धर्मियांचे तीर्थक्षेत्र असलेले पंजाबमधील डेरा बाबा नानक साहिबपासून पाकिस्तानमधल्या गुरुद्वारा दरबार साहिब कर्तारपूर या ठिकाणी जाण्यासाठी भारत-पाकिस्तानने द्विपक्षीय चर्चेद्वारे सीमाभागात खास मार्ग तयार केला. त्याला कर्तारपूर कॉरिडॉर असे संबोधले जाते. या कॉरिडॉरचा वापर भारतात खलिस्तानी घुसवण्यासाठी केला जाणार नाही ना, अशी शंका तज्ज्ञांनीच व्यक्त केल्याने भारताला सुरक्षेची काळजी घ्यावी लागेल.

डेरा बाबा नानक साहिब ते कर्तारपूर या रस्त्याची मागणी तीस वर्षे जुनी आहे. अटलबिहारी वाजपेयी यांच्यासह अनेकांनी ती केली होती. भारताच्या सीमेपासून साडेचार किलोमीटर अंतरावर असलेले कर्तारपूर पंडित नेहरुंना भारतात ठेवता आले असते; परंतु, त्यांना ते जमले नाही. आतापर्यंत कर्तारपूर कॉरिडॉरसाठी कधीही सहकार्याचा हात पुढे न करणार्‍या पाकिस्तानने इम्रान खान पंतप्रधान झाल्यानंतर लगेच कॉरिडॉर करण्याचे मनावर का घेतले, याचे उत्तर तज्ज्ञांनी सरकारला दिलेल्या सल्ल्यातून मिळते. काश्मीरमध्ये लष्कराने आक्रमक पवित्रा घेतला आहे. पाकिस्तानची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने जगाचे दडपण आहे. अशा पार्श्‍वभूमीवर पाकिस्तान काश्मीरमधल्या अतिरेकी चळवळीला थेट मदत करू शकत नाही, काश्मीरमध्ये अतिरेकी घुसवू शकत नाहीत. अशा पार्श्‍वभूमीवर पारपत्राची गरज नसणार्‍या मार्गाचा वापर करून खलिस्तानसमर्थक अतिरेकी भारतात घुसवण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न तर नाही ना, अशी शंका आपल्याला यायला हवी होती; परंतु, त्या वेळी ती आली नसली, तरी आता गुप्तचर यंत्रणा आणि तज्ज्ञांनी दिलेल्या इशार्‍याकडे दुर्लक्ष केले तर ते आपल्याला परवडणारे नाही.
शांतता आणि सुसंवादाचे प्रतीक समजल्या जाणार्‍या कर्तारपूर मार्गानेच पाकिस्तान भारतात खलिस्तानवादी दहशतवादी पाठवू शकतो, असा संशय गुप्तचर यंत्रणा आणि या विषयातल्या तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. स्वतंत्र खलिस्तानची मागणी करणार्‍या या चळवळीला पाकिस्तानद्वारे प्रोत्साहन देण्यात येत आहे. पाकिस्तान कर्तारपूर कॉरिडॉरचा वापर करून खलिस्तानवादी चळवळीच्या समर्थकांचे काही गट (जथ्थे) भारतात पाठवून या चळवळीला खतपाणी घालण्याचे काम करत आहे. पाकिस्तान आपला हा कुटील हेतू साध्य करण्यासाठी जगभरातल्या शीख समाजाला निशाणा बनवू शकतो. तसेच याद्वारे कर्तारपूर या पवित्रस्थळाचा वापर केला जाऊ शकतो. नवी दिल्लीतल्या इन्स्टिट्युट ऑफ काँफ्लिक्ट मॅनेजमेंटचे कार्यकारी संचालक अजय सहानी यांनी पाकिस्तानला शीख धर्मीयांच्या धार्मिक भावनांबाबत कसलीही सहानुभूती नाही; तो केवळ आपला हेतू साध्य करण्याच्या प्रयत्नात आहे, असे मत व्यक्त केले आहे. कर्तारपूरचा कॉरिडॉर पाकिस्तानने शीखांच्या भावनांचा विचार करून केलेला नाही, तर कट्टरतावादी आणि दहशतवाद्यांना गोळा करण्यासाठी केला आहे. याद्वारे पाकिस्तानमधून मोठ्या प्रमाणावर दहशतवादी सहजरित्या भारतात दाखल होतील, असेही सहानी यांनी म्हटले आहे.
पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयने या मुद्द्यावरून वारंवार भारताशी वाद घालण्याचा प्रयत्न केला आहे. शिखांचे कल्याण हा मुद्दा पाकिस्तानच्या दृष्टीने कधीही प्राधान्याचा नव्हता. कारण, पाकिस्तानमध्येच अल्पसंख्य असणार्‍या शिखांवर अनन्वित अत्याचार केले जात आहेत. या शीखांना कट्टरवादी मुस्लिमांनी नेहमीच टार्गेट केलं आहे. त्याची दखल घेऊन कट्टरतावाद्यांना रोखण्याचे काम पाकिस्तानने कधीही केले नाही. शीख समुदायाचे पहिले गुरू नानकदेव यांची समाधी आजच्या पाकिस्तानमध्ये येते. भारतीय सीमेपासून ती साधारणतः साडेचार किलोमीटर अंतरावर आहे. भारतीय शीख बांधव सीमेवरून दुर्बिणीद्वारे या पवित्र स्थानाचे दर्शन घेतात. आता हे तीर्थक्षेत्र भारतीय भाविकांसाठी खुले होणार आहे. कर्तारपूर गुरुद्वार्‍याकडे जाणारा कॉरिडॉर नव्या कारस्थानाची सुरुवात ठरणार तर नाही ना, अशी भीती तज्ज्ञांना वाटते आहे. पाकिस्तानने या कर्तारपूर कॉरिडॉरची घोषणा केली, त्याच्या आसपासच्या घटना समजून घ्यायला हव्यात. नॉर्वेच्या भूतपूर्व पंतप्रधानांनी श्रीनगरला जाऊन हुरियतच्या प्रतिनिधी मंडळाची भेट घेतली आणि नंतर ते इस्लामाबादला रवाना झाले. बहुतेक त्यांनी काही तरी संदेश सोबत नेला असावा. गुरू नानकदेव यांच्या वास्तव्याने पवित्र झालेले हे धार्मिक स्थळ शीख बांधवांसाठी खुले होणार असल्याने, पाकिस्तान सरकारला शीख धर्मियांबद्दल किती प्रेम आहे याचे गोडवे गाणाराही एक सूर या चर्चेमध्ये होता; मात्र, त्याच वेळी खलिस्तानी नेता गोपाल सिंह चावला यालाही उद्घाटनाच्या कार्यक्रमात बोलावून पाकिस्तान सरकारने खलिस्तान आंदोलनासोबतची आपली जवळीकही दाखवून दिली, हे विसरता येणार नाही. गेल्या अनेक वर्षांचा भारत-पाक संबंधांमधला अनुभव सांगतो की, नेहमी अनपेक्षित असलेल्या गोष्टीच इथे घडत असतात. पाकिस्तानचे हृदयपरिवर्तन होण्याची सूतराम शक्यता नाही. आजपर्यंतच्या पाकिस्तानच्या कारवायांपासून धडा न घेतल्यामुळे याही वेळी त्याने अतिशय काळजीपूर्वक टाकलेल्या जाळ्यात भारत अडकू नये, याची भीती मात्र या घटनाक्रमात नक्कीच आहे. पाकिस्तानमध्ये लपलेल्या खलिस्तानवाद्यांनी ‘जस्टिस फॉर सीख’ नावाची एक नवी चळवळ सुरू केली आहे. त्यांना त्यासाठी भारतातल्या शीख समुदायाचे समर्थन मिळवायचे आहे. पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कोणतीही व्यक्ती विराजमान झाली तरी या देशाच्या भारताविषयीच्या भूमिकेत आणि सातत्याने कुरघोड्या करण्याच्या प्रयत्नांमध्ये काहीही फरक पडत नाही. काश्मीरमधल्या दहशतवादी कारवाया, घुसखोरी यांना अलीकडील काळात भारतीय लष्कराच्या कठोर आणि काहीशा आक्रमक भूमिकेमुळे प्रचंड मर्यादा येऊ लागल्यामुळे पाकिस्तानने आता आपले लक्ष पंजाबवर केंद्रित केल्याचे दिसत आहे. कर्तारपूरचा मुद्दा पुढे करण्यामागे पाकिस्तानचे आणखी एक षड्यंत्र आहे. खलिस्तानवादी चळवळीला समर्थन देऊन भारताविरोधात कारस्थान करण्याचा प्रयत्न आयएसआय ही पाकिस्तानची गुप्तहेर संघटना गेल्या काही वर्षांपासून सातत्याने करत आहे. कर्तारपूरच्या भूमीपूजनावेळी तिथे मोठमोठी पोस्टर्स झळकवून त्यावर खलिस्तानवादी नेत्यांचे फोटो लावले गेले. यामध्ये पाकिस्तानमध्ये आश्रयाला असणार्‍या खलिस्तानवाद्यांचा सर्वात मोठा नेता असलेल्या गोपाल चावलाचा फोटो होता. या समारंभाला हा चावला पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांच्या बाजूला बसला होता. त्यांच्याबरोबर हस्तांदोलन करत होता. या गोपाल चावलाचे हाफिज सईद बरोबर अत्यंत घनिष्ट संबंध आहेत. आयएसआय, पाकिस्तानी लष्कर आणि खलिस्तानवादी यांच्यामध्ये भारतविरोधी कारस्थानांना सुरुवात झाली आहे. लवकरच गुरू नानक यांची 550वी जयंती आहे. या निमित्ताने पाकिस्तानमध्ये मोठे शीख संमेलन भरवण्यात येणार आहे. हे संमेलन खलिस्तानवादी भरवत आहेत. याचे औचित्य साधून शीख बांधवांनी मोठ्या प्रमाणावर तिथे यावे, यासाठी या कॉरिडॉरचे काम करण्यात आले आहे. या निमित्ताने आता मोठ्या प्रमाणात शीख लोक पाकिस्तानमध्ये जातील. तिथे त्यांना खलिस्तानवादी चळवळीकडे आकर्षित करण्याचे, त्यांचे समर्थन मिळवायचे पाकिस्तानचे प्रयत्न सुरू आहेत.


अवश्य वाचा