Politics

| मुंबई | वृत्तसंस्था |

लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या विजयावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा संशय घेतला आहे. मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये सत्ता असताना भाजपचा पराभव झाला आणि कॉंग्रेस विजयी झाली. लोकसभा निवडणुका जिंकण्यासाठी तर भाजपने या तिन्ही राज्यात स्वत:चा पराभव करून घेतला नव्हता ना? अशा शब्दांत शरद पवार यांनी ईव्हीएम मशीनवर शंका उपस्थित केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ईव्हीएमवरून उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. 

’ईव्हीएम मशीन आणि त्यांच्या संख्येबाबत माझ्या मनात फार आधीपासून शंका होती. मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड येथे भाजपची सत्ता असताना भाजपाचा पराभव झाला आणि कॉंग्रेस पार्टी विजयी झाली. पण कदाचित हा पराभव देशाच्या निवडणुका जिंकण्यासाठी तर नाही, अशी शंका माझ्या डोक्यात आली होती. ही तिन्ही राज्ये एकमेकांना लागून आहेत आणि आता भाजप तेथील तत्कालीन सरकार पाडण्याच्या विचारात आहे,’ अशी शंका शरद पवार यांनी उपस्थित केली आहे. तसं ट्विटही त्यांनी केलं आहे. 

निवडणूक यंत्रणेबाबत निवडणुकीत कधी नव्हे तितका विचार करण्यात आला. आपलं मत योग्य ठिकाणी गेलं की नाही याबाबत लोकांना शंका वाटत आहे. देशात लोकांच्या मनात अशी शंका याआधी कधी निर्माण झाली नव्हती. आजही लोकांची शंका कायम आहे, असं सांगत पवार यांनी ईव्हीएमच्या विश्वासहार्यतेवरही शंका उपस्थित केली आहे. त्यामुळे आगामी काळात ईव्हीएमचा मुद्दा तापण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 

अवश्य वाचा