Sports - ICC Cricket World Cup 2019

उसाचा रस काढताना जसा ऊस जसा त्याचे पार चिपाड होईपर्यंत पुन्हा पुहा गुर्‍हाळात/चरख्यात टाकून पिळून घेतला जातो; तसाच काहीसा प्रकार आयसीसीने विश्‍वचषक २०१९ च्या कव्हरेजचे हक्क विकताना केला आहे. आत्तापर्यंत कुणाच्याही ध्यानी-मनी नसलेल्या ठिकाणाहूनही त्याचे कव्हरेजचे पैसे आयसीसीने वसूल केले आहेत. एकच गोष्ट आयसीसीने, प्रत्येकाच्या गरजेनुसार विकली आहे. त्यांनी थेट प्रक्षेपणासाठी स्टार स्पोर्ट्सला भागीदार केले आहे. प्रामुख्याने भारत, बांगलादेश, भूतान, नेपाळ, श्रीलंका, मालदिव येथे स्टारचे हक्क असतील. स्काय स्पोर्ट्सचे हक्क इंग्लंड आणि आयर्लंडपुरते मर्यादित असतील. मध्य पूर्व आणि उत्तर आफ्रिकेत प्रक्षेपणाचे हक्क ‘ओएसएन’कडे आहेत. विलो टीव्ही अमेरिकेत क्रिकेट विश्‍वचषक दाखविणार आहे. दक्षिण आफ्रिकेत सुपर स्पोर्टकडे हक्क आहेत. ऑस्ट्रेलियात विश्‍वचषक दाखविणार आहे ‘फॉक्स स्पोर्ट्स’. स्काय टीव्ही न्यूझीलंडमध्ये तर इएसपीएन वेस्ट इंडिजमध्ये, पीटीव्ही व टेन स्पोटर्सचे प्रक्षेपण असेल पाकिस्तानात. जी टीव्ही आणि बी टीव्ही बांगलादेशात तर एसएलआरसी श्रीलंकेत सामने दाखविणार आहे. एसएलआरसीकडेच अफगाणिस्तान, हॉंगकॉंग, फिजी, मलेशिया व युरोपचे अधिकार आहेत.

आत्तापर्यंत विश्‍वचषक कव्हरेज म्हणजे एवढेच, असा समज होता. यावेळी मात्र आयसीसीने डिजिटल क्लीप्स हक्क, ऑडिओ राईट्स, इन फ्लाईट राईट, प्रोग्रामिंग राईट्स, पब्लिक स्क्रीनिंग राईट्स, डेटा राईट्स, न्यूज ऍक्सेस राईट्स, आर्का इव्हज् राईट्स, अशी कल्पक विभागणी करण्यात आली आहे. ज्या ज्या नव्या क्लायंट्सनी विचारणी केली होती, त्या त्या क्लायंट्सच्या गरजेनुसार हक्क वेगळे करुन निघायचे. एकाच सामन्याच्या प्रक्षेपणानंतरच्या अशा वेगवेगळ्या गरजांनुसार हक्क विकण्याची शक्कल यावेळी तरी त्यांच्या पथ्यावर पडली आहे.

डिजिटल क्लिप राईट्स हॉटस्टार (भारत), बीबीसी (इंग्लंड), इएसपीएन (ऑस्ट्रेलिया विभाग), डामलॉग (श्रीलंका), खलीफ टेक्नॉलॉजी (पाकिस्तान), टाईम्स इंटरनेट (अमेरिका व कॅनडा) यांना विकण्यात आले आहेत. इनफ्लाईट राईट्स विकत घेणार्‍या कंपनीने फक्त विमान कंपन्यांनाच नाहीत तर क्रूझ शीप ऑपरेटर्सनाही विकले आहे. 

सिनेमागृहात किंवा अधिक माणसे एकत्र येतात अशा ठिकाणी सामने दाखविण्यासाठीही आता पैसे मोजावे लागणार आहेत. प्रसिद्धी माध्यमांना विश्‍वचषक आकडेवारी देण्याचे अधिकृत एजंट म्हणून आयसीसीने ओप्टा स्पोर्ट्सला हक्क विकले आहेत. विश्‍वचषक लोगो, फोटो, आकडेवारी, मैदानातील घटना, किस्से, एवढेच नव्हे संघातील खेळाडूंचे सराव सामने, त्यांचा सामन्यांच्या परिसरातील वावर याचेही अधिकार विकले आहेत. आयसीसीने जेथे जेथे पैसे काढता येतील, तेथून ते काढले आहेत. फुकट काहीही नाही. 

२० षटकांच्या क्रिकेटचा एवढा पगडा आशियाई खेळाडूंच्या मनावर आहे की, ५० षटकांमधील उरलेल्या षटकांपर्यंत कसे पोहोचायचे याचा विचारच कुणाच्याही फलंदाजीतून दिसत नव्हता. ५० षटकांचे नियोजन फलंदाजीत कसे करायचे, हे पाकिस्तान, श्रीलंका, अफगाणिस्तान यांच्या फलंदाजीत तरी दिसून आले नाही. अनुभवी भारतीय संघ या तीन संघांचे डाव पाहून तशी चूक करणार नाही, अशी अपेक्षा आहे.

५० षटकेही फलंदाजी न केलेल्या संघाने गोलंदाजांकडून चमत्काराची अपेक्षा करु नये. भेदक गोलंदाजीच्या आक्रमणाला किमान २५० ते २७० धावांचे पाठबळ तरी हवेच. ३५० धावसंख्यादेखील जेथे सुरक्षित मानली जात नाही, तेथे एवढी माफक अपेक्षा आहेच.

इंग्लंडमधील साडेदहाची सुरुवात ही वेगवान, मध्यमगती गोलंदाजांसाठी सहाय्यक ठरणारच. त्यामुळे त्या कालावधीत धावा वेगात काढण्यापेक्षा विकेट राखून ठेवणे महत्त्वाचे आहे. १५ ते ३५ षटकांदरम्यान डावाच्या धावांच्या इमारतीचा आराखडा तयार होतो. उरलेल्या १५ षटकांमध्ये अंतिम पॉवर प्ले गृहित धरुन स्फोटक फलंदाजीची आखणी व्हायला हवी. ५०० धावांचे लक्ष्य गाठण्याची अपेक्षा इंग्लंडसारख्या संघांकडून किंवा बेदरकार वेस्ट इंडियन फलंदाजांकडूनच करता येईल. दुपारी सुरु होणार्‍या दिवस-रात्र सामन्यात कदाचित प्रथम फलंदाजी करणार्‍या संघाला या लक्ष्यासाठी सूर गवसू शकेल. मात्र, पहिल्या तीन दिवसांच्या खेळानंतर आशिया खंडातील संघांचे कच्चे दुवे उघडे पडले आहेत, एवढे मात्र निश्‍चित!

 

फोटो ः आयसीसी

अवश्य वाचा