Sports - ICC Cricket World Cup 2019

आशियातील संघांना झालेय तरी काय?
विश्‍वचषक स्पर्धेतील सहभागी दहा संघांपैकी पाच संघ आहेत आशिया खंडातील. क्रिकेटची मैदानावरील ताकद यामुळे स्पष्ट होत आहे का? हा प्रश्‍न पडतो. कारण, पाचांपैकी पाचही संघांची इंग्लंडमधील सुरुवात काही चांगली झाली नाही. यामध्ये सराव सामन्यांचादेखील समावेश आहे. अगदी विश्‍वचषकासाठीचा दावेदार मानल्या गेलेल्या भारतानेही न्यूझीलंडविरुद्ध सराव सामन्यात ५० षटकेही खेळून काढली नाहीत. भारतानंतर ज्या संघांकडे सक्षम संघ म्हणून पाहिले जाते तो पाकिस्तानचा संघ, पात्रता फेरीतून मुख्य स्पर्धेत दाखल झालेल्या वेस्ट इंडिज संघांविरुद्ध २५ षटकेही फलंदाजी करु शकला नाही. तीच परिस्थिती श्रीलंकेची. न्यूझीलंडविरुद्ध सलामीच्या सामन्यात त्यांना ५० षटकेही खेळून काढता आली नाहीत. पाकिस्तान आणि श्रीलंका या दोन माजी विजेत्यांना दीडशे धावसंख्यादेखील गाठता आलेली नाही. त्यांच्या तुलनेत नवोदित अफगाणिस्तानने हाणामारी करीत किमान दोनशे धावसंख्या तरी ओलांडली. राहिला बांगलादेशचा संघ. त्यांनाही सराव सामन्यात फारशी चमकदार कामगिरी करता आली नाही. असं का?
विश्‍वचषक स्पर्धेआधी, इंग्लंडमधील खेळपट्ट्या कोरड्या असतील, त्यावर फिरकी गोलंदाजीला अधिक संधी मिळेल, अशी आवईही उठविण्यात आली होती. पाटा खेळपट्टीवर ५०० धावसंख्या फटकाविली जाईल, अशी भविष्यवाणीही वर्तविण्यात आली आहे.
असं असतानाही आशिया खंडातल्या संघांना ५० षटकेही का खेळता आली नाहीत? तिन्ही खेळपट्ट्या संथ होत्या. प्रारंभीच्या अर्ध्या तासाच्या खेळात, खेळपट्टीवरचा दमटपणा चेंडू अधिक स्वींग करण्यास कारणीभूत ठरतो. नाणेफेकीच्या वेळी प्रथम फलंदाजी करणार्‍या कप्तानानेच ती गोष्ट जाहीरपणे मांडली होती. मग माशी कुठे शिंकली?
आशिया खंडातील फलंदाजाचे तंत्र कच्चे आहे का? पाटा खेळपट्ट्यांवर खेळण्याची सवय जडलेल्या फलंदाजांना चेंडू स्वींग झाल्यास खेळता येत नाही का? फक्तच स्वींगच नाही तर, चेंडू आपटल्यानंतर हूकचे फटके खेळतानाही होणारी तारांबळ आपण पाहिली. त्यापेक्षाही वाईट गोष्ट म्हणजे, कुणाकडेही खेळपट्टीवर उभे राहण्याचा संयम नाही. इच्छाशक्ती नाही. ट्वेंटी-२० क्रिकेट लीग क्रिकेटचा एवढा पगडा या खेळाडूंवर आहे, की डावाची बांधणी करण्याची कुणाचीही मानसिक तयारी नाही. बेसबॉलपटूसारखे ‘स्वीच हिट’ मारुन षटकार मिळाला की आपले काम झाले, असं प्रत्येकाला वाटत होतं. चौकार-षटकारांमध्ये, मोठ्या खेळीच्या उभारणीसाठी एकेरी-दुहेरी धावांचीही गरज आहे. ही गोष्ट ठाऊक असूनही अंमलात येत नाही.

अवश्य वाचा