dummy politics pic

| मुंबई | वृत्तसंस्था |

 

नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सीबीआयने मुंबईतून दोघांना अटक केली आहेत. संजीव पुनाळेकर, विक्रम भावे अशी आरोपींची नावे आहेत. अंधश्रद्धा आणि बुवाबाजी यासारख्या अनिष्ट रुढी परंपरांविरुद्ध लढणारे ज्येष्ठ कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची २० ऑगस्ट २०१३ रोजी पुण्यातील ओंकारेश्‍वर मंदिराजवळील महर्षी शिंदे पुलावर गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. राज्य पोलीस आणि सीबीआयचे पथक या प्रकरणातील आरोपींचा शोध घेत होते. दरम्यान, पुनाळेकर व भावे यांना रविवारी सुट्टीकालीन न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे कळते.

 

दाभोलकर हत्या प्रकरणातील पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली पुनाळेकर आणि भावे यांना अटक करण्यात आल्याची प्राथमिक माहिती हाती येत आहे. दाभोलकर हत्याप्रकरणी खटल्यात आरोपींच्यावतीने संजीव पुनाळेकर व त्यांचे सहकारी भावे हे न्यायालयात बाजू मांडत आहेत. गेल्यावर्षी या प्रकरणात तपास यंत्रणांना यश मिळाले होते. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग सीबीआयने सचिन प्रकाशराव अंधुरे याला अटक केली होती. नालासोपारा स्फोटक प्रकरणात अटकेत असलेल्या शरद कळसकरच्या चौकशीतून सचिन अंधुरेचे नाव समोर आले. सचिन आणि शरद दोघे मित्र आहेत.

अवश्य वाचा