अलिबाग 

       अलिबाग शहरातील जुना कोळीवाडा परिसरात असणार्‍या भंगार गोडावूनला सायंकाळी साडेसातच्या सुमारास आग लागल्याने कोळीवाडा परिसरात मोठी खळबळ उडाली होती. आरसीएफ कंपनी तसेच अलिबाग नगरपरिषदेच्या अग्निशमन यंत्रणेकडून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे आटोकाट प्रयत्न केले जात होते मात्र गोडावूनमध्ये असलेल्या रसायनांमुळे पुन्हा पुन्हा आग लागत असल्याने काही प्रमाणावर अडचणी येत होत्या. त्यामुळे नागरी वस्तीठिकाणी असणार्‍या भंगार व्यवसायींकांची तपासणी करुन रसायनांचे साठे असणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरीत आहे. सुदैवाने जिवीतहानी टळली असली तरी लाखोरुपयांची आर्थिक हानी झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान, सतर्कता म्हणून अलिबाग शहरातील वीजपुरवठा खंडीत करण्यात आल्याने मोठी दुर्घटना टळली. 

       शहरातील जुना कोळीवाडा परिसरात इकबाल यांचे गोडावून आहे. या गोडावूनमध्ये विविध प्रकारच्या वस्तू असतात. त्यात काही प्रमाणांवर रसायनअसलेली साधने, सिलींडर देखील असू शकतात. गुरुवारी सायंकाळी साडेसात ते पावनेआठच्या सुमारास अचानक याचपैकी रसायनाने पेट घेतल्याने अचानक आगीचा भडका उडाला. लागलेल्या आगीने सर्वच घाबरुन गेले. यावेळी तिथे असणार्‍या काहिंना तातडीने बाहेर काढण्यात आले. त्यानंतर लगेचच परिसरातील नागरिकांच्या मदतीने आग विझविण्यास सुुरुवात केली. तोपर्यंत अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. त्यानुसार अलिबाग नगरपरिषद आणि आरसीएफ कंपनीचे अग्निशमन यंत्रणा ताबडतोब हजर होऊन आग विझविण्यास सुरुवात झाली. नगरसेवक अनिल चोपडा आणि संदीप शिवलकर यांच्यासह अनेक जण आग विझविण्यात सहभागी झाले होते. 

        या गोडावूनमध्ये असलेल्या रसायनांच्या साठयामुळे आग विझत येते न येते तोच पुन्हा एकदा रसायनांच्या होत असलेल्या स्फोटामुळे परत आग पेट धरत होती. त्यामुळे बघ्यांमध्ये देखील भीतीचे वातावरण पसरुण मध्येच धावाधाव होत असल्याचे चित्र पहावयास मिळत होेते. शेवटी अग्निरोधक बॉल्सचा वापर करुन या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु करण्यात आले. साडेआठच्या सुमारास आग विझविण्यात यश आले असले तरी घटनास्थळी असणार्‍या रसायनांच्या साठयामुळे परिसरातील रहिवाशांना भितीच्या सावटाखालीच रात्र काढण्याची वेळ ओढवली आहे. 

अवश्य वाचा

शिघ्रे नदी बनलेय डंम्पिंग.