रोहे अष्टमी 

       रोहा तालुक्यातील ग्रामीण भागासह संपूर्ण जिल्ह्यात समाधानकारक मेघराजाने वर्षाव करून बळीराजासह सर्वांनाच सुखद आनंद दिला आहे. गेल्या आठवडाभर सतत रोह्यात दमदार पाऊस झाल्याने येथील नदी, नाले, तलावांसह विहीरी  पाण्याने तुडूंब भरलेले पहाताना दिसत आहेत. रोह्याची जीवनवाहिनी कुंडलिका नदीही दुथडी भरुन वाहू लागली आहे. गेले आठ दिवस पावसाने हाहाकार केल्याने रोहा तालुकाभरात नव्हे तर मुंबई, कोकणासह सर्वच भागात सर्वत्र पाणीच पाणी झालेले आहे. त्यामुळे या पावसामुळे लांढर तसेच तळाघर येथील धबधबे पांढ-याशुभ्र फेसाळयुक्त रंगात धो-धो वाहत आहेत. यातच निसर्गप्रेमींना व पर्यटकांना हवाहवासा वाटणा-या पावसाळ्यातील हिरवेगार मनमोहक निसर्गानेही हिरवी शाल पांघरलेले दृश्य सगळीकडे पहाताना दिसत आहे. असेच कडेकपारीतुन हिरवीशाल नेसलेल्या डोंगर रांगांतून  पांढ-याशूभ्र रंगाचे वाहत असलेले व मंजूळ स्वरांचा खळखळाट करीत वाहत असणारे तळाघर व  शेजारील असलेल्या लांढर येथील निसर्गरम्य धबधबे.

    रोहा तालुकाभरातील निसर्गप्रेमींना साद घालीत आहेत. हे रोह्यातील प्रसिद्ध लांढर व तळाघर येथील धबधबे पाण्याने भरभरुन वाहू लागले आहेत. धाटाव दशक्रोशीसह तालुकाभरातील तरुण तरुणी या धबधब्यावर वर्षा सहलीचे बेत आखत आहेत. या धबधब्यावर सध्या  मोठ्या प्रमाणात तरुणांची गर्दी येथे पहाताना दिसत आहे.लहान- थोरांसह सर्वांनाच आकर्षित करीत आहेत. येथील घनदाट हिरवेगार जंगल परिसर तसेच धबधब्या शेजारी असलेले हिरवेगार पठार, पक्षांच्या वेगवेगळ्या स्वरांचा किलबिलाट, बहरलेली वृक्षवल्ली यातच उंचावरून वाहत असलेल्या धबधब्यातील पाण्याचा खळखळाट आवाज अगदी देहभान हरपून जाऊन निसर्गाचा आनंद लुटतांना अनुभवास येतो. अशा नयनरम्य ठिकाणी पर्यटक व निसर्गप्रेमींची मोठी गर्दी सध्या येथे पहायला मिळत आहे. 

         अनेक ठिकाणच्या धबधब्यांचे ठिकाणी असणा-या असुरक्षिततेबाबतीत माहिती दिली जाते. तसेच काही धबधब्यांवर जाण्यास बंदीही आहे.तरीही तरूण - तरूणींना अतिशय आकर्षण वाटते ते म्हणजे धबधब्यावर जाऊन आनंद घेण्याचा. असेच सुंदर निसर्गरम्य , घनदाट डोंगर रांगांमधून भरभरून वाहणारे, शुभ्र रंगांचे व पाण्याचा मोठ्या खळखळाटात आवाजात वाहणारे रोह्यातील लांढर व तळाघर येथील हे धबधबे आहेत.

            येथे एकदा जाऊन आले की पुन्हा- पुन्हा जाण्यासाठी मोह वाटणारा हा हिरवागार परीसर अगदी स्वप्नातील आहे असा वाटतो. उंचावरून पहाताना कोकणातील खेडेगावाचे कौलारू घरांचे लांढर गाव मनाला हवाहवासा वाटून मन प्रसन्न करते. सध्या सगळीकडे होत असलेल्या सिमेंटच्या जंगलामुळे निसर्गाचे चित्र पहायलाच मिळत नाही. परंतु येथील कौलारू एकसमान घरे, मधेच मान उंचावणारे माडाचे झाड, मंदिराचे कळस  व सर्व बाजूने दिसणा-या ऊंच-ऊंच डोंगर रांगा आणि दुरवर दिसत असणारी धाटाव नगरीतील कारखाने नगरी व माथ्यावरील दाटून आलेले ढग पहाताना आनंद होतो.

रोहा तालुक्यातील घनदाट निसर्गाच्या कूशीत लपलेल्या 4 कि.मी. अंतरावरील तळाघर व त्याच्याच अर्ध्या किमी अंतरावर असलेल्या लांढर धबधब्या ठिकाणी वर्षा सहल , फॅमिली पिकनीक , लहान-थोरांना आनंद देणारे अगदी सुरक्षित ठिकाण आहे. येथे रोहा तालुकाभरातील निसर्गप्रेमी येऊन धबधब्याचा आनंद घेतात.

     येथे जाण्यासाठी रोहा येथून भुवनेश्वर, निवी, तळाघर, बोरघर आणि लांढर असे जाता येते. तसेच दुसरा मार्ग एक्सेल स्टाॅप ते प्रसिध्द महादेव मंदिर, तळाघर किंवा वाशीमार्गे लांढर असे सुरक्षित मार्ग आहेत. चार चाकी, दुचाकी वहानाने जाता येते. तसेच दररोज ये-जा करण्याकरिता मिनीडोअर व्यवस्था रोह्यातून आहे. नुकतेच या मार्गाचे डांबरीकरण झाल्याने प्रवासाचा आनंदही द्विगुणीत होतो. 

      आता दोन दिवस पावसाने उगडझाप करीत मधेच धो-धो बरसत आहे. अशा वातावरणात या घनदाट डोंगर परिसरात धबधब्यावर डुंबताना मन भरुन येते. हे धबधबे तरुणांचे आकर्षण असल्याने मोठ्या घोळक्याने तरुण येऊन धबधब्यात डुंबण्याचा आनंद घेत आहेत. मात्र काही तरुण येथे मद्यप्राशन करीत असल्याचे येथील झाडीत दिसलेल्या बियर बाटलीवरुन वाटत आहे. अशा तरुणांना येथील ग्रामस्थांनी समज देत धबधब्यावर डुंबण्याचा आनंद घ्यावा असे सुरक्षिततेच्या दृष्टीने सुचवित आहेत. अतिशय सुरक्षित असणारे लांढर व तळाघर येथील धबधब्यांवर लहान सहान मुलेही लक्ष ठेवले तर सुरक्षित पोहण्याचा आनंद घेऊ शकतात. मात्र कोणत्याही गोष्टीचा अतिरेक होता कामा नये. 

      हिरवा शालू नेसलेल्या या डोंगर रांगावरील धो-धो वाहणा-या स्वच्छ पाण्याचा ओघ अंगावर घेत निखळ पावसाळी पर्यटनाचा आनंद घेतल्याचे समाधान येथे आल्यावर होते. तेव्हा प्रत्येकाने येऊन येथील वर्षा सहलीचा आनंद घ्यावा असे सांगावेसे वाटत आहे.

अवश्य वाचा