पाली/बेणसे 

      पाली खोपोली राज्य महामार्गावर असलेला पाली आंबा नदी पुल अत्यंत महत्वाचा पुल आहे. मुसळधार पावसामुळे येथील अंबा नदी दुथडी भरुन वाहत अाहे. त्यामुळे बुधवारी (दि.10) रात्री वाकण पाली मार्गावरील अंबा नदिच्या पुलावरून पाणी गेले. यामुळे सकाळी पुलावर वाहून अालेल्या झाडाच्या फांद्या, काठ्या, थर्माकोल, प्लास्टिक बॉटल व राडारोडा साचला होता. त्यामुळे वाहन चालक अाणि पादचार्यांची गैरसोय झाली होती.  पुलावरील लोखंडी संरक्षक कठड्यांमुळे (रेलिंग) कचरा व घाण अडकून पुलाला धोका निर्माण होतो. त्यामुळे हे रेलिंग काढण्याची मागणी ग्रामपंचायतीने केली आहे. या पुलावरील खड्डे बुजविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर खडी टाकण्यात आली आहे. मात्र ही खडी रोगापेक्षा इलाज भयंकर अशीच वाटू लागली आहे.

     हा पुल मुंबई गोवा महामार्ग व मुंबई पुणे द्रुतगती मार्गाला जोडतो. त्यामुळे येथून मोठ्या प्रमाणात प्रवासी व अवजड वाहनांची वाहतुक होते. या पुलावर ठिकठिकाणी मोठाले खड्डे सुद्धा पडले आहेत. लोखंडी रेलिंग व सिमेंटचे कठडे देखील काही ठिकाणी तुटले आहेत. मागील आठवड्यात देखील पुलावरून पाणी गेले होते. त्यावेळी देखील राडारोडा पुलावर आला होता. साधारणपणे पाऊस सुरू झाल्यावर काही दिवसांनी पुलावरील संरक्षक कठडे (लोखंडी रेलिंग) एमएसआरडीसी कडून काढले जातात. मात्र अजून पर्यंत ते काढले गेलेले नाहीत. परिणामी पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून येणारे मोठे ओंडके, वायर, झाडाच्या फांद्या , इतर मोठे साहित्य आणि राडारोडा पुलावर अडकून राहतो. पुलावर साठलेल्या झाडांच्या फांद्या, काठ्या, प्लास्टिक अाणि चिखलामुळे वाहनांना अडथळा निर्माण होतो. तसेच पादचार्यांना देखिल पुलावरुन वाट काढतांना अडचण होते. अडकून पडलेल्या विविध वस्तू आणि राडारोडयामुळे नदीच्या पाण्याच्या प्रवाहाला मोठा अडथळा निर्माण होतो. अशा वेळी पूल अधिक कमजोर होतो. तसेच पुलावरील कमकुवत संरक्षक कठडे, मोठे खड्डे, क्षमतेपेक्षा अधिक वाहनांची ये-जा, वारंवार पुलावर वाहून येवून साठलेला राडारोडा यामुळे वाहतुकीच्या दृष्टीने हा पुल अत्यंत धोकादायक झाला आहे. त्यामुळे वेळीच या पुलाची दुरुस्ती करण्यात यावी. पुलावरील राडारोडा साफ करण्यात यावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे. 

 

अवश्य वाचा

शिघ्रे नदी बनलेय डंम्पिंग.