पुणे, १० जुलै २०१९

     भारतीय वाहन उद्योगात २०२० पर्यंत भारत ६ - BS - VI हा उत्सर्जन विषयक मानदंड अमलात येणार असल्यामुळे निर्माण झालेल्या संधीचा लाभ घेण्याच्या उद्देशाने जपानच्या होरिबा कंपनीने त्यांच्या पुण्याजवळ चाकण येथील तंत्रज्ञान केंद्रात एक नवा वाहन उत्सर्जन चाचणी विभाग सुरु केला आहे. ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया च्या संचालक डॉ. रश्मी ऊर्ध्वरेषे यांनी नुकतेच या विभागाचे  उद्घाटन केले. 

    होरिबा इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष डॉ. राजीव गौतम यांनी आज एका पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. होरिबा (जपान) चे अध्यक्ष डॉ. मासायुकी अदाची आणि तंत्रज्ञान सेवा व्यवसायाचे उपाध्यक्ष हिरू चिहारा पत्रकार परिषदेत उपस्थित होते. 

      या  नव्या विभागात BS - VI  या मानदंडाच्या पूर्ततेसाठीची वाहनांची चाचणी, युरो VI मानदंडासाठीची चाचणी (निर्यात वाहनांसाठी), वाहनांची कामगिरी, उंचीवरील प्रदेशात वाहनांचा वापर तसेच प्रत्यक्ष रस्त्यांवरून वाहन चालत असतानाची चाचणी अशा विविध चाचण्या करण्याची आहे असे श्री गौतम म्हणाले.  होरिबा च्या सध्याच्या कार आणि मालवाहू वाहनांच्या इंजिन चाचणी सेवेला या नव्या सेवांची जोड मिळणार आहे, असे त्यांनी नमूद केले.

      डॉ गौतम म्हणाले की भारतीय वाहन उद्योगाने नवे उत्सर्जन निकष पाळण्याची पूर्ण सिद्धता केली असून सरकारने दिलेल्या अंतिम मुदतीपूर्वी सर्वच वाहन उत्पादक हे निकष पूर्ण करण्यासाठी तयार असतील. "या झपाट्याने चाललेल्या प्रक्रियेमुळे वाहन उद्योगावर आणि पर्यायाने आमच्यावर ताण पडत आहे परंतु आमच्या पूर्ण स्वयंचलित आणि एकात्मिक चाचणी क्षमतेच्या बळावर आम्ही ते आव्हान झेलत आहोत," असे डॉ गौतम म्हणाले.

      होरिबा ने याचवेळी वाहन निर्मात्यांसाठी इंजिनिअरिंग कन्सल्टिंग आणि टेस्टिंग ही नवी सेवा सुरु केली. भारतीय वाहन उद्योगाला अधिक कार्यक्षम, सुरक्षित आणि पर्यावरण पूरक वाहने उत्पादन करण्यासाठी आणि विशेषतः विजेवर चालणा-या वाहनांच्या निर्मितीत या सेवेचा उपयोग होऊ शकेल असे डॉ. मासायुकी यांनी सांगितले.      

      होरिबा भारतात नागपूर येथे १०० कोटी रुपयांची गुंतवणूक करून नवा कारखाना उभारत असून तेथे आरोग्य सेवेत वापरण्यात येणा-या उपकरणांची तसेच कंपनीच्या इतर काही उत्पादनांची निर्मिती होईल, असे डॉ. गौतम म्हणाले. नवा वस्तू आणि सेवा कर कायदा अमलात आल्यामुळे सध्या देशात असलेली कंपनीची पाच गोदामे बंद करून नागपूर येथे एकच गोदाम उभारले जाईल असेही ते म्हणाले. 

अवश्य वाचा

शिघ्रे नदी बनलेय डंम्पिंग.