पोलादपूर

      रायगडचे माजी पालकमंत्री तटकरे यांच्यानंतर विद्यमान पालकमंत्री ना.रवींद्र चव्हाण आणि सध्याचे खासदार सुनील तटकरे यांची रायगडमध्ये वैद्यकीय महाविद्यालयाची घोषणा पोलादपूर तालुक्यासाठी आशादायी असून पोलादपूर येथील दि लेप्रसी मिशन हॉस्पिटलचा परिसर यासाठी सर्वोत्तम ठिकाण आहे.

      पोलादपूर तालुक्याचे पहिले जागतिकीकरणाचे द्योतक म्हणजे दि लेप्रसी मिशन हॉस्पिटल, इंडिया हे काही वर्षांपूर्वी बंद झाले आहे. सध्या मिरजच्या मिशनरी हॉस्पिटलकडे कारभार सोपविण्यात आला आहे. येथे ओपीडी, जनरल वार्ड, 7 कर्मचारी निवासस्थाने, शाळा, दोन जुन्या पेशन्टच्या खोल्या, डोंगरालगतचे कर्मचारीवर्गाचे बंगले, चर्च, शाळागृह अशा इमारती, वातानुकूलन, पाणी, जनरेटर, बाग-बगिचे अशा सर्व सुविधा सुमारे 22 एकर परिसरामध्ये उपलब्ध आहेत.

      आता तेथे कुष्ठरोग निर्मूलनाचे प्रयत्न होत नसल्याने दि लेप्रसी मिशन हॉस्पिटलचा परिसर निर्मनुष्य झाला आहे. येथे बहुउद्देशिय संकूल सुरू करण्याचा संकल्प मिशनच्या संचालकांनी घेतल्याची चर्चा मध्यंतरी झाली. मिशनची मुंबई ते गोवा नॅशनल हायवेलगतच्या जमिनीची विक्री झाल्यानंतर या हॉस्पिटलच्या परिसराबाबतही असाच प्रकार होण्याची साशंकता पोलादपूरवासियांमध्ये आहे. आजमितीस टीएलएमचे बहुउद्देशिय संकूल होण्याबाबत कोणतीही कार्यवाही संचालक मंडळाने केली नाही. रायगड जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय होण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या रायगडचे तत्कालीन पालकमंत्री ना.सुनील तटकरे यांनी आता खासदार झाल्यानंतर लोकसभेत इंडियन मेडिकल काऊन्सिल विधेयकावर झालेल्या चर्चेत रायगड जिल्ह्यामध्ये वैद्यकीय महाविद्यालय होण्याचा पुनरूच्चार केला आहे. यापुर्वी, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या रस्त्यांच्या भुमिपुजनावेळी पोलादपूर येथे आलेले रायगडचे विद्यमान पालकमंत्री तथा बंदरे, रस्ते, वैद्यकीय शिक्षण, अन्न नागरी पुरवठा राज्यमंत्री ना. रवींद्र चव्हाण यांनीदेखील पोलादपूर येथील दि लेप्रसी मिशन हॉस्पिटल, इंडिया परिसरामध्ये वैद्यकीय महाविद्यालय होण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची ग्वाही दिली आहे.

       दि लेप्रसी मिशन हॉस्पिटल,पोलादपूरच्या मुंबई ते गोवा नॅशनल हायवेलगतच्या 8.7 एकर जमिनीची मागणी विधानपरिषदेचे आमदार व शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आ.जयंत पाटील यांनी रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे पहिल्यांदा चेअरमन झाल्यानंतर पोलादपूर येथे महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या कार्यालयावर 1998 साली अवाजवी वीज बिलांबाबत शेकापक्षाचा महामोर्चा नेल्यानंतर दि लेप्रसी मिशन हॉस्पिटलच्या प्रशासनाची भेट घेऊन केली होती. त्यावेळी तेथे वैद्यकीय महाविद्यालय, अपघात उपचार हॉस्पिटल, रायगड बाजार आणि रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा असे एकत्रित संकूल उभारण्याचा मनोदय आ.जयंत पाटील यांनी व्यक्त केला होता. यावेळी लेप्रसी हॉस्पिटलच्या सूत्रांनी कुलाबा (सध्याचा रायगड) जिल्हा परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष प्रभाकर पाटील यांनी या हॉस्पिटलला भेट देऊन 125 रूपयांची देणगी दिल्याची आठवण सांगून या देणगीतून कुष्ठरूग्णांसाठी पोल्ट्री व्यवसाय सुरू करण्यात आल्याची माहिती दिली. या जमिनीवर भातशेती पिकवून तसेच कलमी आंब्यांचे पिक घेऊन हॉस्पिटलला उत्पन्न मिळत असे. याच जमिनीची मागणी आ.जयंत पाटील यांनी केली होती. मात्र, ती जमीन दहा वर्षांपूर्वी खासगीरित्या विकण्यात आली.

      आता दि लेप्रसी मिशन हॉस्पिटलच्या अकार्यान्वित परिसरातील एकेक इमारती देखभाल दुरूस्तीअभावी जीर्ण होण्यापूर्वीच तेथे रायगड जिल्ह्याचे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज असून जी दूरदृष्टी शेकापक्षाचे सर्वेसर्वा आ.जयंत पाटील यांनी दाखविली होती. त्यानुसार येथे आता तत्कालीन पालकमंत्री व विद्यमान खासदार सुनील तटकरे हे त्यांनीच केलेल्या घोषणेनुसार जर वैद्यकीय महाविद्यालयासाठी योग्य जागेच्या शोधात ते असतील, तर या जागेपेक्षा अधिक सुसज्ज जागा व वैद्यकीय पार्श्वभूमी असलेला परिसर रायगड जिल्ह्यात त्यांना इतरत्र कोठेही उपलब्ध होणार नसल्याने त्यांनी प्राधान्याने या जागेचा व परिसरातील इमारतींचा उपयोग करून आधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या अभ्यासक्रमास प्रारंभ आणि त्यासोबतच नव्याने इमारती उभारण्यास सुरूवात करण्याची संधीही येथे असल्याची उपयुक्तता लक्षात घेण्यासारखी आहे.

        1978 च्या सुमारास पोलादपूरचे मार्गदर्शक डॉ.काका करमरकर यांनी या लेप्रसी मिशन हॉस्पिटल परिसराला त्यांच्या विधायक मानवतावादी कार्यासाठी घरपट्टी कायम माफ करण्याचा ठराव केला. त्याशिवाय दिवाबत्ती आणि स्वच्छताविषयक कामेही ग्रामपंचायतीमार्फत करण्याचे ठरले होते. त्यानुसार आजपर्यंत पोलादपूर ग्रामपंचायत या सुविधा विनाकरआकारणीने देत आहे. गेली अनेक वर्षे राष्ट्रीय व धार्मिक सणासुदीला तसेच विविध राजकीय व्यक्तींच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पोलादपूरकर दि लेप्रसी मिशन हॉस्पिटलमधील कुष्ठरूग्णांना मिठाई वाटप करीत असत. अलिकडेच, पोलादपूरची ग्रामपंचायत असताना एका ठरावाद्वारे गावठाण विस्तारासाठी प्राधान्याने दि लेप्रसी मिशन हॉस्पिटलच्या ताब्यात असलेल्या 22 एकर जमिनीपैकी महाबळेश्वर रस्त्यालगतची काही जमीन उपलब्ध झाल्यास गावाचा सीमाविस्तार शक्य असल्याचे नमूद केले आहे. जुलै 2010 मध्ये येथील कुष्ठरूग्णांना अचानक मिरजच्या दि लेप्रसी मिशन हॉस्पिटलमध्ये स्थलांतरीत करण्यात आले असून संचालक असलेल्या दास यांच्याकडे काही निवृत्त कर्मचाऱ्यांनी किमान येथील चर्चतरी प्रार्थनेसाठी खुले राहावे, अशी मागणी केली आहे. मात्र, खासदार सुनील तटकरे यांनी रायगड जिल्ह्यासाठीच्या वैद्यकीय महाविद्यालयासाठी बंद असलेल्या दि लेप्रसी मिशन हॉस्पिटलचा परिसर निश्चित केल्यास पोलादपूर तालुक्यासह कोकणाला ऊर्जितावस्था प्राप्त होऊ शकणार आहे.

अवश्य वाचा

शिघ्रे नदी बनलेय डंम्पिंग.