वीर सावरकर हा भारतीय इतिहासातील एक चमत्कार आहे. सावकारांचा सारा जीवनपट हा अद्भुत चमत्काराच्या घटनांनी भरला आहे. यातील अद्भुत आणि नाट्यमय घटना कोणती, असे विचारले तर एकमुखाने सर्व इतिहासकार म्हणतील, त्रिखंडात गाजलेली 8 जुलै 1910 ची उडी.

अनंत कान्हेरेने जॅक्सनचा घेतलेला बळी, लंडनमध्ये कर्झन वायलीचा मुर्दा पाडणारा मदनलाल धिंग्रा, हिंदुस्थानात ब्रिटिशांवर होणारे बॉम्बहल्ले या घटनांमागचे खरे सूत्रधार हे सावरकरच आहेत. याची पक्की माहिती इंग्रजांनी गोळा केली होती. सावरकर या सुमारास क्रांतिकार्यासाठी  पॅरिस येथे मुक्कामी होते. आपल्याला पकडण्यासाठी ब्रिटिश सरकार आपल्या माणसावर अत्याचार करत आहेत, तेव्हा आता आपण पॅरिस येथील सुरक्षित स्थळी न थांबता इंग्लंडला परतावे, असे सावरकरांनी ठरविले. लंडनच्या  व्हिक्टोरिया  स्टेशनवर उतरताच सावरकरांना अटक झाली. त्यांच्यावरील खटला हिंदुस्थानात चालणार असल्याने मोरिया व बोटीतून 1 जुलै, 1910 रोजी त्यांची रवानगी करण्यात आली. तत्पूर्वी, सावरकरांनी आपला  सहकारी अय्यर यांची भेट घेतली होती. आपण आता मॉर्सोलिसला भेटू, असे सावरकरांनी सांगितल्यावर अय्यर यांना क्षणभर काही कळलेच नाही. तेव्हा सावरकरांनी त्याला सांगितले की, लंडनहून मुंबईकडे जाणारी कोणतीही बोट कोळसा व पाण्यासाठी मॉर्सोलिसला बंदरावर थांबतेच तेव्हा पॅरिसमध्ये तुम्ही तयार राहा. मी तेथे पोहचतो. हे ऐकून अय्यर थक्क झाला.

1 जुलै 1910 रोजी मोरिया बोट हिंदुस्थानच्या वाटेकडे निघाली. ती आता मॉर्सोलिसला थांबली होती. सावरकरांचा अंदाज खरा ठरला.तथापि, पहारा अत्यंत कडक होता.एका क्षणासाठीही त्यांना एकटे सोडले जात नव्हते. अशाही परिस्थितीत एका भयंकर धाडसाची आखणी सावरकर करत होते. शौचकुपाची   पोर्टहोल नेहमीच अर्धवट उघडे असायचे, त्यामुळे तेथून उडी मारणे, हा एकच सुटकेचा मार्ग आहे, हे सावरकरांच्या लक्षात आले होते. आंघोळीच्या वेळी त्यांनी जानव्याने छातीचे आणि पोर्टहोलचे माप घेतले होते. सुदैवाने ते सारखेच भरले. 

आणि इतिहास घडणारी ती तारीख उजाडली. 8 जुलै, 1910 सकाळचे 6.15 झाले होते. मला शौचाला जायचे आहे, असे हेड पार्करला त्यांनी सांगितले. पार्कर सावरकरांना घेऊन शौचकूपीपर्यंत गेला. आणि महंमद सादिक व अमरसिंग यांना पहार्‍यावर बसवून स्वतः मात्र परत झोपला. सावरकरांनी अंगावरचा कोट कोचेवरच्या खिळ्याला अडकवला. त्यामुळे आता काय घडणार आहे, हे बाहेरच्या व्यक्तींना कळणारच नव्हते. आणि, क्षणाचाही विलंब न करता सावरकरांनी पोर्टहोल झपकन उघडले आणि आपले शरीर पोर्टहोलच्या छिद्रातून बाहेर काढले तेव्हा पाठ सोलपटून निघाली. पण, त्याची पर्वा ना करता समुद्रात उडी घेतली. उडीचा आवाज ऐकताच महंमद सादिक व अमरसिंग कैदी भाग गया म्हणून ओरडत सुटले... जहाजावर मोठा गोंधळ माजला. सावरकर तो अर्धा-एक मैलावरील फ्रान्सचा किनारा गाठत होते. पाठीमागून गोळ्यांचा वर्षाव होत होता. नऊ फुटांची ती भिंत चढून त्यांनी पॅरिसच्या भूमीत पाय ठेवले. पण... पण घात झाला. अय्यर आणि कामाबाई कुठेच दिसत नव्हत्या. सावरकर तशाच अवस्थेत रस्त्यावरुन धावत होते. पाठीमागून ब्रिटिश चोर-चोर म्हणून ओरडत होते. परंतु, भाषेची अडचण असल्यामुळे सावरकर काय बोलतात, हे फ्रेंच नागरिकांना कळत नव्हते. याचाच फायदा इंग्रजांनी घेतला. तेथील फ्रेंच पोलिसांच्या हातावर नोटांचे बंडल ठेवून ब्रिटिशांनी सावरकरांना पकडले. हातापायात बेड्या अडकवल्या. पार्कल पावेल सावरकरांना शिव्या देऊ लागले. ‘क्या अवलाद है’, असे म्हणून महंमद सादिकने त्यांच्यावर हात उचलला. पुन्हा असे करशील तर ठार मारू, असे पार्कल पावेलने म्हटल्यावर अशा असहाय्य अवस्थेतही सावरकर म्हणाले. 

अनाघ मी अवध मी, अनंत मी भाला।

जिंकील टिपू करून असा जगती जन्मला।

अर्थात, हे सारे समजणे त्यांच्या बुद्धीपलीकडचे होते.

आजचे इतिहासातील दिनविशेष : 

इतर दिनविशेष : 1) 1695- लंबकाच्या घड्याळाचा शोध लावणारे शास्त्रज्ञ खितीन हाफन्स यांचे निधन. 2) 1857- सातार्‍याच्या छत्रपतींचा वकील रंगो बापूजी गुप्ते परळीच्या किल्ल्यातून एकाएकी गायब. 3) 1857- बुद्धिमापन चाचण्यांचे जनक आल्फ्रेड लिनेट यांचा जन्म. 4) 1910- स्वातंत्र्यवीर सावरकरांची गाजलेली उडी या दिवशी मारली. 5) 1917- अमेरिकन रसायन शास्त्रज्ञ रुबर्ट बर्न्स वुडवर्ड यांचे निधन. 6) 1921- टिळक स्वराज्य फंडासाठी मुंबईत संयुक्त मानापमान नाटकाचा प्रयोग. 7) 1954- भाक्रा-नागल कालव्याचे पं. नेहरुंच्या हस्ते उद्घाटन. 8) 1958- बर्लिन चित्रपट महोत्सवात व्ही. शांताराम यांच्या ‘दो आँखे बारह हाथ’ चित्रपटाला सुवर्णपदक. 9) 1984- आनंदयात्री कवी बा.भ. बोरकर यांचे निधन. 10) 1996- टी.एन. शेषन यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर. 11) 2001- तबलावादक उ. बाबासाहेब मिरजकर यांचे निधन. 12) 2003- ज्ञानपीठ विजेते बंगाली साहित्यिक सुभाष मुखोपाध्याय यांचे निधन. 13) 2003- संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. ह.श्री. शेणोलीकर पंचत्वात विलीन. 14) 2009- दिल्लीच्या जामा मशीदचे  माजी शाही इमाम मौलाना सय्यद अब्दुल्ला बुखारी यांचे निधन. 15) 2014- विश्‍वकरंडक   फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत यजमान ब्राझीलचा पराभव करुन जर्मनी अंतिम फेरीत. 16) 2015- न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंज व्यवहार तांत्रिक अडचणींमुळे चार तासांसाठी  ठप्प. 17) 2016- महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक परिषदेच्या द्विभाषिक पुस्तकाच्या खरेदीस स्थगितीचा आदेश. 18) 2016- रशियाच्या सीरिया व युक्रेनमधील उचापतीविरोधात काय करायचे? यासाठी नाटो सदस्यांची वॉरसी येथे बैठक.

अवश्य वाचा