तिवरे धरणफुटीच्या घटनेने राज्यातल्या धरणांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर आला. खरं तर, धरणांच्या सुरक्षिततेकडे होणारं अक्षम्य दुर्लक्षच याला कारणीभूत आहे. अशी एखादी दुर्घटना घडल्यावर पाहणी, चौकशी समित्या, अहवाल यानं आपणच आपला आत्मघात करत आहोत. वस्तुत: धरणांच्या बांधकामांचा दर्जा उत्तम राखणं, धरणांचं वेळच्या वेळी स्ट्रक्चरल ऑडिट, त्यात हलगर्जीपणा करणार्‍यांवर कठोर कारवाई गरजेची आहे.

गेल्या काही दिवसांमधल्या विविध दुर्घटनांमुळे महाराष्ट्र पुरता हादरुन गेला आहे. या दुर्घटनांमध्ये अनेकांचे बळी गेले. त्याच बरोबर या दुर्घटनांसाठी मानवी चुकाच कारणीभूत असल्याचं आणि शक्य असूनही या दुर्घटना टाळल्या गेल्या नसल्याचं स्पष्ट झालं आहे. काही दिवसांपूर्वीच पुण्या-मुंबईत सीमा भिंत झोपड्यांवर पडून झालेल्या दुर्घटनांमध्ये अनेकांचा बळी गेला, तर इतरांचे संसार उघड्यावर आले. बांधकामं करताना पुरेशी काळजी घेतली न जाणं वा मजुरांच्या सुरक्षिततेच्या उपाययोजनांकडे झालेलं दुर्लक्ष ही यामागील प्रमुख कारणं असल्याचं दिसून आलं. या घटनांचा अधिक तपास सुरू असतानाच कोकणात चिपळूणमधलं तिवरे धरण फुटून हाहाकार माजला. या अस्मानी संकटानंही अनेकांचे बळी घेतले तर घरादाराचं होत्याचं नव्हतं होऊन गेलं. नेहमीप्रमाणे मंत्री, लोकप्रतिनिधींनी दुर्घटनास्थळी भेटी दिल्या. दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले गेले. दुर्घटनेतल्या मृतांच्या नातेवाईकांना तसंच जखमींना सरकारतर्फे मदत दिली जाईल. दुर्घटनेच्या चौकशीचा अहवाल समोर येईल. त्यात दुर्घटनेसाठी दोषी आढळणार्‍यांवर कारवाईचे आदेश दिले जातील. मात्र, या सार्‍यातून दुर्घटनाग्रस्तांना खरा दिलासा मिळणार का, हा खरा प्रश्‍न आहे. या निमित्ताने सरकारी यंत्रणेचा हलगर्जीपणा, बांधकामाच्या दर्जाकडे बांधकाम कंत्राटदाराचं  झालेलं वा जाणीवपूर्वक केलं गेलेलं दुर्लक्ष या मुद्द्यांचा पुन्हा एकदा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे.

तिवरे धरणाची निर्मिती सुमारे 15 वर्षांपूर्वी करण्यात आली. या धरणाची लांबी 308 मीटर आणि उंची 28 मीटर इतकी आहे. या धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 2,452 दशलक्ष घनफूट इतकी आहे. 2004 मध्ये या धरणातील गाळ काढण्यात आला होता. त्यामुळे धरणात पुरेसा पाणीसाठा होण्यातला अडसर दूर झाला होता. हे धरण सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमेवर उंचीवर असल्यामुळे संपूर्ण खोर्‍यातल्या पाण्याचा संचय होतो. या खोर्‍यात पावसाचं प्रमाण सर्वसाधारणपणे अधिक रहात असल्यानं दर पावसाळ्यात हे धरण ओसंडून वाहत असतं. या मातीच्या धरणाच्या दोन्ही बाजूंना कालव्यांची कामं अर्धवट स्थितीत आहेत. त्यामुळे या कालव्यांद्वारे पाण्याचा शेतीला लाभ मिळू शकत नाही. त्याचबरोबर धरणातलं उर्वरित पाणी खाली सोडून देण्याशिवाय पर्याय राहात नाही. महत्त्वाची बाब म्हणजे अलीकडेच या धरणाच्या गळतीचा प्रश्‍न ऐरणीवर आला होता. त्या संदर्भात स्थानिक नागरिकांनी लघुपाटबंधारे विभागाचे उपअभियंता, लोकप्रतिनिधी तसंच धरणाच्या मूळ ठेकेदाराला वारंवार कल्पना दिली होती. त्यानंतर मे महिन्याच्या शेवटी धरणाची गळती बंद करण्यासाठी काही कामंही करण्यात आलं. एवढंच नाही, तर या धरणाला कोणताही धोका नसल्याचं स्पष्टीकरण पाटबंधारे विभागाकडून देण्यात आलं होतं. मात्र, ते चुकीचं असल्याचं या दुर्घटनेतून स्पष्ट झालं. त्याचबरोबर धरणांच्या दुरुस्ती-देखभालीकडे होणार्‍या दुर्लक्षाचा वा त्यातील हलगर्जीपणाचा मुद्दाही या निमित्ताने समोर आला. 

तिवरे धरण ज्या नदीवर बांधण्यात आलं आहे तिचा उगम त्याच भागात होतो. हे सह्याद्रीच्या खोर्‍यातलं धरण असून आजुबाजुला तीन-चार डोंगर आहेत. या भागात पावसाचं प्रमाण अधिक असल्यानं डोंगरावरून मोठ्या प्रमाणावर पाणी खाली येतं आणि या धरणात साठतं. या धरणाच्या बांधकामाच्या वेळी इथल्या वस्तीवर राहणार्‍या कुटुंबीयांना स्थलांतराबाबत सांगण्यात आलं होतं. परंतु त्यांनी त्याला नकार दिला. याबाबत स्थानिक आमदारांनी प्रयत्न केले असता ङ्गआम्हाला दुसरीकडे घरं बांधून देण्यापेक्षा याच ठिकाणी एक मंदिर बांधून द्याफ अशी मागणी करण्यात आली. त्यानुसार आमदारांनी गणपतीचं मंदिर बांधून दिलं. या मंदिराच्या आजुबाजुला सगळी वस्ती आहे. खरं तर एक प्रकारे ही वस्ती या धरणाच्या कुशीतच वसली आहे. म्हणजे, वस्तीच्या उशाला धरणाची मुख्य भिंत अशी परिस्थिती आहे. त्या दृष्टीने विचार करायचा तर ही वस्तीच बेकायदेशीररित्या वसली, असं म्हणता येईल. कारण, धरणाच्या पाणलोट क्षेत्रात कोणाला वास्तव्य करता येत नाही, असा नियम आहे. असं असतानाही या वस्तीकडे दुर्लक्ष करण्यात आलं. त्यावेळीच ही वस्ती अन्यत्र हलवली असती किंवा त्यातल्या लोकांची समजूत घालून वा प्रसंगी कायद्याचा वापर करत स्थलांतर केलं असतं तर आज या दुर्दैवी प्रसंगात कोणाला जीव गमावण्याची वा जखमी होण्याची वेळ आली नसती.

रत्नागिरी जिल्ह्यात मातीच्या भरावाची, तशी बांधणी असलेली अन्यही धरणं आहेत. मात्र, त्यांच्या देखभाल, दुरूस्तीचा विषय कुठेही चर्चेत येत नाही आणि त्या संदर्भात उपाययोजनाही केल्या जात नाहीत. विशेष म्हणजे, अन्य धरणांच्या गळतीच्या तक्रारी पुढे येत आहेत. त्यामध्ये डेरवणचं धरण, कामटे धरण, कळवंडे धरण, खेड-शिरगावकोणी धरण यांचा समावेश होतो. आताच्या दुर्घटनेतून बोध घेऊन तरी या धरणांमधून हेाणारी पाण्याची गळती रोखण्यासाठी तातडीने पावलं उचलली जाणं गरजेचं आहे. अन्यथा, अशीच एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तिवरे धरणफुटीची घटना ताजी असतानाच भोकरदन तालुक्यातील धामणा लघु प्रकल्पाच्या भिंतीला तडे जाऊन त्यातून पाणीगळती सुरू झाल्याचं दिसून आलं. 50 वर्षांपूर्वी बांधलेल्या या प्रकल्पात यंदाच्या पावसानं 83 टक्के पाणीसाठा झाला असतानाच ही गळतीची घटना उघडकीस आली. अशा स्थितीत हे धरणंही फुटणार का, अशी भीती या भागातल्या नागरिकांच्या मनात कायम आहे. त्या दृष्टीने प्रशासनाने नजिकच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पुण्याजवळील पानशेत धरण फुटण्याच्या दुर्घटनेच्या कटू आठवणी अजून कायम आहेत. त्यात अलीकडेच टेमघर धरणाच्या गळतीचा प्रश्‍न समोर आला होता. ही गळती थांबवण्यासाठी   करावयाच्या उपाययोजनांसाठी पाणी सोडून देऊन संपूर्ण धरण रिकामं करावं लागलं होतं. आता टेमघर धरणाची दुरूस्ती झाली असली तरी आताची दुर्घटना लक्षात घेता याही धरणाच्या सुरक्षिततेबाबत त्या क्षेत्रातल्या नागरिकांच्या मनात प्रश्‍नचिन्ह निर्माण होणं साहजिक आहे. 

खरं तर, सर्वच धरणांचं स्ट्रक्चरल ऑडिट वेळच्या वेळी वा ठराविक कालावधीत होण्याची आवश्यकता आहे. त्यात गळती दिसून आली तर बुजवण्यासाठी तातडीनं उपाययोजना केल्या जायला हव्यात. धरण बांधून पूर्ण झाल्यावर ते किती काळ उत्तम स्थितीत राहणार आहे, किती कालावधीनंतर त्याच्या डागडुजीची आवश्यकता भासू शकते, या बाबींच्या नोंदी उपलब्ध असणं आणि त्या आधारे धरण प्रकल्पावर वेळच्या वेळी लक्ष दिलं जाणं कठीण नाही. परंतु आपल्याकडे कोणतीही मोठी दुर्घटना घडल्याशिवाय संबंधित यंत्रणा खर्‍या अर्थानं जाग्या होत नाहीत, हेच वारंवार प्रत्ययाला येत आहे. विशेष म्हणजे, एखाद्या मोठ्या दुघटनेनंतर संबंधित यंत्रणा काही काळ सतर्क राहतात आणि त्यानंतर पुन्हा ‘ये रे माझ्या मागल्या...’ या न्यायाने कर्तव्यात शिथिलता येते. मात्र, हीच शिथिलता अनेक निष्पापांच्या जीवावर बेतते.

अवश्य वाचा