राजकीय आणि समाजिक क्षेत्रात 20 व्या शतकात इतकी अलौकिक व्यक्तिमत्त्वे निपजली की, त्यांच्या कर्तृत्वाला उंचीमुळे हिमालयातील सारी हिमशिखरेही खुजी वाटतात. अपवाद फक्त औद्योगिक क्षेत्रात. पारतंत्र्यात आणि स्वातंत्र्यानंतरही औद्योगिक क्षेत्रात भारतीयांची कामगिरी तशी खुजीच. पण, एखादी दंतकथाच वाटावी, अशी अलौकिक कामगिरी औद्योगिक क्षेत्रात ज्यांनी केली त्यांचे नाव धीरुभाई हिराचंद अंबानी.

जुनागड जिल्ह्यातील माळिया तालुक्यातील चोरबाड नावाच्या एका खेड्यात 26 डिसेंबर, 1932 रोजी धीरुभाईंचा जन्म झाला. त्यांचे वडील हिराचंद शाळेमध्ये मास्तर होते. जुनागड हे तेव्हा संस्थान होते. राज्यकर्ता मुस्लीम होता. त्याच चोरबाड हे खेडेगाव. थोडक्यात, लोक अजूनही तेथे मध्ययुगात वावरत होते. आणि, हिराचंदची सात जणांचे कुटुंब आपल्या दारुद्र नावाच्या सोबतीणीबरोबर महिना 15 रु. पगारावर भागवत होते. खुद्द धीरुभाई सहा मैल पायी अनवाणी चालून कुटुंबासाठी ताक आणत, फुकट मिळते म्हणून. अशा वातावरणात धीरुभाईंचे शिक्षण चालू होते. त्यांचे इंग्रजी चांगले होते, पण गणितात मात्र बोंब होती. पुढील आयुष्यात अब्जावधी रुपयांची आकडेमोड हाताच्या बोटांवर केली तो भाग निराळा. सन 1947 मध्ये स्वतंत्र मिळाल्यानंतर नबाबाने पाकिस्तानात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. तेव्हा संस्थानातील वातावरण बिघडले. आक्रमक धीरुभाई आर्य समाज आणि राष्ट्रीय  स्वयंसेवक संघाची भगवी पताका हाती घेऊन नबाबाच्या विरोधात उभं राहिले. याचे विस्मरण ते उद्योगपती झाल्याने अनेकांना झाले.

मॅट्रिक झाल्यानंतर 200 रु. पगारावर येडनला जाण्याचा धाडसी निर्णय त्यांनी घेतला. तेथे ते आणि त्यांचा मोठा भाऊ ए-बेस कंपनीच्या पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्याचे काम करत असतानाच आपणही एक रिफायनरी स्थापन करू असे भव्यदिव्य स्वप्न धीरुभाई पाहात होते, हे ऐकून आपल्याला ते एक दिवास्वप्नच आता वाटेल. एडनला असताना 10 रुपये खर्च करायचे असतील तर धीरूभाई 100 वेळा विचार करत असत. पण, यापासून धीरुभाईंची औद्योगिक जडणघडण होत होती. आणि, एक धाडसी निर्णय त्यांनी घेतला तो नोकरी सोडण्याचा. नोकरी करण्यापेक्षा आपण नोकर्‍या निर्माण केल्या पाहिजेत, यासाठी मायभूमीत जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला. 1958 साली त्यांनी एडन सोडले. दरम्यानच्या काळात सन 1954 मध्ये त्यांचा कोकिळाबेनशी विवाह झाला. एडन सोडल्यानंतर जीवनाच्या दुसर्‍या अंकाच्या महानाट्याचा प्रारंभ झाला.

बुद्धीवैभव हे धीरुभाईंच्या मेंदूच्या भात्यातील खास अस्त्र. दूरदृष्टी नजरेसमोर ठेवून मुंबईतील भुलेश्‍वर या ठिकाणी एका चाळीत आपल्या मुलांसह धीरुभाईंनी मुक्काम ठेवला. भविष्यात पुढे त्यांनी औद्योगिक साम्राज्य उभे करून लौकिक मिळवला. त्या साम्राज्यशाहीची वर्तमान राजधानी एका चाळीवजा खोलीत होती. आणि गंगाजळी होती फक्त 15 हजार रुपये. आणि त्या बळावर धीरुभाईंनी रिलायन्स कमर्शियल कॉर्पोरेशनची स्थापना केली. ती प्रामुख्याने काजू, लवंगा, मिरी, मिरचीच्या व्यापाराची. व्यापाराचं सहावं इंद्रियच धीरूभाईंना लाभलं होतं. अगदी मातीतून सोनं निर्माण करण्याची त्यांची ताकद होती. एका अरबाला अरबस्तानात गुलाब फुलविण्यासाठी भारतीय माती पटवून लाखो रु.चा नफा मिळविला होता. साहजिकच मिरी, मिरची दळण्यासाठी काही त्यांनी रिलायन्सची स्थापना केली नव्हती, तेव्हा ते स्वतःच्या मालकीची मिल स्थापण्याची महत्त्वाकांक्षा बाळगू लागले. आणि, 1966 साली रिलायन्स टेक्सटाईल्स इंडस्ट्रीचा जन्म झाला. त्यानंतर धीरुभाईंनी मागे वळून पाहिलेच नाही. 1977 मध्ये रिलायन्सचे रुपांतर पब्लिक लि. कंपनीत झाले. लहान गुंतवणूकदारांकडून पैसा उभा करणारे धीरुभाई हे पहिले उद्योगपती. 1978  मध्ये विमल हा ट्रेडमार्क लोकप्रिय करून कापड बाजारावर त्यांनी कब्जा केला. 1980 च्या दशकात शेअर बाजारावर नियंत्रण मिळविले. 1982 हे वर्ष तर यांच्या औद्योगिक भरारीच्या मैलाचे दगड ठरले. रायगड जिल्ह्यातील पाताळगंगा येथे अत्याधुनिक भव्यदिव्य असा पॉलिस्टर फिलामेंटायार्नचा  प्रकल्प सुरु केला. 1991 मध्ये गुजरात येथे पेट्रोकेमिकलचा प्रकल्प उभारला. 1992 मध्ये आतापर्यंत कोणत्याही भारतीय उद्योगपतीला न साधणारी कामगिरी त्यांनी केली. ती म्हणजे, परदेशात 15 कोटी डॉलर उभे केले. 1995 मध्ये रिलायन्सने टेलिकॉम क्षेत्रात पदार्पण केले. 1999 मध्ये रिलायन्सने 25 हजार कोटी रु. गुंतवून जामनगर येथे रिफायनरीचा प्रकल्प सुरु केला. एकाच प्रकल्पावर एवढी मोठी गुंतवणूक भारतात प्रथमच करण्यात आली. सन 2000 मध्ये भारतातील क्र. 2 च्या आयपीसीएलवर रिलायन्सने ताबा मिळावला.

आता सार्‍या जगाने धीरुभाईंची दाखल घेतली. बुझनेस इंडिया, इकॉनॉमिक टाइम्स तसेच मुंबई महानगरपालिकेने धीरुभाईंचा गौरव केला. अमेरिकेच्या पेन्सीव्हानिया विद्यापीठाच्या वार्टन स्कूलने त्यांना डीनची पदवी देऊन गौरव केला. यशाची ही शिखरे गाठत असताना त्यांचे प्रतिस्पर्धी बाँबे डाईंगचे नसली वाडिया तसेच इंडियन एक्स्प्रेस या वृत्तसमूहाचे गोयंका यांच्याबरोबर संघर्षाची ठिणगी पडली, तर कधी ते अमुक पक्षाचे आहेत, असा शिक्काही त्यांच्यावर पडला. पण धीरूभाऊ आपल्या सर्व प्रतिस्पर्ध्यांना पुरून उरले. नियतीच्या पुढे कोणाचेही चालत नाही. 24 जून 2002 रोजी मेंदूत रक्तस्त्राव झाल्याने त्यांना ताबडतोब ब्रीच कँडी रुग्णालयात हलविण्यात आले. या घटनेने सारा देश हादरला. जवळजवळ 15 दिवस वर्तमानपत्र आणि टी.व्ही. वर धीरूभाईच्या आजारपणाशिवाय दुसरा विषयच नव्हता. धीरूभाई काही नट नव्हते की खानदानी श्रीमंत की खानदानी उद्योगपती, तरीही अफाट लोकप्रियता यांच्या वाट्याला आली.अखेर मृत्यूशी झुंज देत 6 जुलै 2002 रोजी ज्येष्ठ वद्य एकादशी, शनिवार या दिवशी वयाच्या 70व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली.

अवश्य वाचा

शिघ्रे नदी बनलेय डंम्पिंग.