आपल्या देशात लाखो नवउद्योजकांची (आंत्रप्रेन्युअर) परिसंस्था निर्माण करायची असेल तर निव्वळ तरुणाईला आवाहन करणे पुरेसे ठरणार नाही. पुढच्या दोन दशकांसाठी एक निश्‍चित स्वरुपाचा नॅशनल रोडमॅप आखला गेला पाहिजे. त्याची सुरुवात शिक्षण व्यवस्थेद्वारे विद्यार्थ्यांना शालेय वयापासूनच उद्योजकतेची प्रेरणा व प्रशिक्षण देण्यापासून केली पाहिजे. 

मी व्यवसायाचा व्याप सांभाळून अलीकडे एका गोष्टीसाठी जाणीवपूर्वक वेळ काढतो. कुठल्याही शहरात एखाद्या यजमान संस्थेने आमंत्रित केल्यास मी स्वखर्चाने तेथे जातो. उपस्थितांना माझी जीवन कहाणी ऐकवतो. उद्योजकतेविषयी मार्गदर्शन करतो. अशाच एका मार्गदर्शन कार्यक्रमात एका तरुणाने मला विचारले, ‘सर! आपल्या भारतात गरीब अधिक मध्यमवर्गीय लोक 90 टक्के, तर श्रीमंत केवळ 10 टक्के अशी विषमता का आढळून येते?’ त्यावर मी उत्तर दिले, ‘मित्रा! नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे एक वाक्य आहे, ‘होय. मीसुद्धा स्वप्न बघतो, पण जागेपणी त्यांचा पाठलागही करतो.’ तुझ्या प्रश्‍नाचे उत्तर यातच आहे. आपल्या देशात लोक मुळात शाश्‍वत श्रीमंतीचे स्वप्नच बघत नाहीत तर कष्टपूर्वक पाठलाग करणे दूरच. गरीबांचे स्वप्न पोटापुरते मिळावे इतके छोटे असते, तर मध्यमवर्गीयांना उत्तम पगाराची नोकरी आणि सुखवस्तू राहणीमान हवे असते. दुर्दैवाने जे श्रीमंतीचे स्वप्न बघतात त्यांनाही झटपट पैशाचे आकर्षण वाटते. फारच थोडे लोक असे असतात, जे समृद्धीचा ध्यास घेऊन वर्षानुवर्षे संयमाने, कष्टाने आणि निर्धाराने पाठपुरावा करतात. लक्ष्मी चंचल असते. तिचा पाठलाग करणार्‍यांना ती हुलकावणी देते, पण जे उद्योगाच्या ध्येयमार्गावर अविरत चालतात, त्यांच्यामागे ती आपणहून जाते.

खरोखर आपल्याही घरातून उद्योजक निर्माण व्हावा, असे वाटत असेल तर आपण स्वतः ते स्वप्न बघावे किंवा ते शक्य न झाल्यास आपल्या मुलांमध्ये लहानपणापासून रुजवावे. शाळांमधून मुलांच्या कला-गुणांना, क्रीडापटुत्वाला, स्पर्धात्मकतेला उत्तेजन मिळते. त्यात आता उद्यमशीलतेची भर पडायला हवी. मला आठवते. मुंबईत मित्राच्या घरी गेलो असताना आम्ही दोघे बोलत होतो. तेवढ्यात त्या मित्राचा शाळकरी मुलगा एक पावती-पुस्तक घेऊन आला आणि उत्साहाने म्हणाला, ‘बाबा! आमच्या शाळेने सुविधा निधी जमवण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला हे पावती-पुस्तक दिले आहे. तुम्ही स्वतः एक पावती फाडा आणि तुमच्या ओळखीच्या लोकांकडूनही निधी जमवायला मला मदत करा.’ हे ऐकताच माझा मित्र नाराज होत मुलाच्या अंगावर खेकसला, काही गरज नाही लोकांकडे जाऊन भीक मागायची. त्या सगळ्या पावत्या माझ्या नावाने फाड आणि पैसे शाळेत नेऊन दे. मुलगा बिचारा हिरमुसला आणि निघून गेला.

माझा मित्र माझ्याकडे वळून म्हणाला, ‘बघितलीस या शाळांची तर्‍हा? यांना पैसे पाहिजेत तर थेट पालकांकडून मागावेत. विद्यार्थ्यांना कशाला दारोदार हिंडवतात?’ त्यावर मी त्याला समजावले, ‘अरे! तू चुकीचा विचार करतोयस. हा अगदी स्तुत्य उपक्रम आहे. या पावती-पुस्तकाच्या माध्यमातून शाळा आपल्या विद्यार्थ्यांकडून विक्रीकलेची आणि जनसंपर्काची पूर्वतयारी करुन घेत आहे. या पुस्तकात 50 पावत्या आहेत. तुझ्या मुलाला ओळखीच्या-अनोळखी अशा 50 घरांमध्ये जाऊ देत. काही लोक कौतुकाने पैसे देतील. काही लोक ‘यात आमचा फायदा काय’, असे विचारुन स्पष्ट नकार देतील. काही उर्मटपणाने बोलून त्याला वाटेला लावतील, तर काहीजण ‘नंतर बघू’ असे सांगून टोलवतील. पण, हे विविध अनुभव त्याला शाळकरी वयापासूनच घेऊ दे. व्यवसायासाठी विक्रीकला गरजेची असते, तसेच विक्रेत्यासाठी हे अनुभव महत्त्वाचे. संयम, गोड बोलणे, चिकाटीने प्रयत्न करणे, मुद्दा पटवून देणे, अशी अनेक कौशल्ये त्यातून लाभतात. याची सुरुवात लहानपणापासूनच करायला हवी. माती ओली असतानाच चांगली वळते आणि तिला मनासारखा आकार देता येतो.’ 

मी स्वतः हे विक्रीचे अनुभव दारोदार हिंडून घेतले आहेत. मला कुणी शिकवणारा नसल्याने माझे विक्रीकलेचे शिक्षण एकलव्यासारखे स्वयंसरावाने झाले. पण, मी व्यवसायात रुळल्यावर माझ्या मुलांना मात्र अगदी लहानवयापासून नेहमीच उद्यमशीलतेसाठी प्रोत्साहन दिले. आपण ठरवले तर बर्‍याच सोप्या गोष्टींतून मुलांची उद्योजकीय जडण-घडण करु शकतो. घरचा व्यवसाय असेल तर त्यात त्यांना किरकोळ मदतीला घेणे, सुटीमध्ये त्यांच्याकडून घरगुती कामे करुन घेऊन त्याचा मोबदला देणे, खरेदी-विक्रीचे छोटे व्यवहार मुद्दाम करायला लावणे, नोटांची किंमत व सुट्याचा हिशेब शिकवणे, प्रासंगिक विक्रीस (गणपती सजावटीचे साहित्य, दिवाळीत फराळ-उटणी-तेले-भेटकार्डे-दिवाळी अंक इ.) उत्तेजन देणे अशा गोष्टी यात येतात. मुलांना आपल्या पालकांच्या कामात मदत करण्याची हौस असते. त्याला लुडबूड म्हणून हेटाळणी करत ती हौस मारु नये. उलट, तशी मदतीची संधी देऊन धंद्याची गोडी लावावी. शाळांनाही विद्यार्थ्यांचे गट करुन उत्पादनांचे प्रदर्शन व विक्रीस प्रोत्साहन देता येईल. मुले जाणत्या वयाची झाल्यावर त्यांना मोठी औद्योगिक प्रदर्शने दाखवावीत. परवानगी काढून मोठे कारखाने दाखवावेत, उद्योग क्षेत्रातील नामवंतांचे अनुभव ऐकण्यासाठी व्याख्यानांना घेऊन जावे.

एका सुभाषितात म्हटले आहे, की ‘प्राप्ते तु षोडशे वर्षे, पुत्रे मित्रवदाचरेत’ (मुला-मुलीला सोळावे वर्ष लागताच त्यांच्याशी मित्राप्रमाणे वागावे.) आता हे वय थोडे अलीकडे आणावे लागेल. मुले माध्यमिक शाळेत असल्यापासून आपण त्यांच्याशी प्रेमाने आणि समजूतदारपणे बोलले पाहिजे. ते उत्साहाने नव्या कल्पना मांडत असतील तर त्या शांत व विचारी वृत्तीने ऐकून घ्याव्यात. तिरकस बोलून त्यांना नाऊमेद करु नये. त्यांच्या विचारांतील त्रुटी बोलून पटवून द्याव्यात. शांतपणा हा गुण उद्योजकतेला नेहमी पोषक ठरतो. शेवटी मुलेही आपलेच अनुकरण करुन शिकत असतात.

अवश्य वाचा