आज 21व्या शतकात पाश्‍चात्य देशात भारतीय वंशाच्या नागरिकांनी काही चमकदार कामगिरी केल्यास आपली मान ताठ होते. तेव्हा ज्या वेळेस देश पारतंत्र्यात होता, ब्रिटिश आपल्यावर राज्य करत होते. स्वतंत्र हा शब्द उद्गारणेसुद्धा तेव्हा देशद्रोहासारखा गुन्हा मानला जाई, त्याच ब्रिटिश पार्लमेंटमध्ये ब्रिटिश नागरिकाचा पराभव करून मोठ्या दिमाखात एका भारतीय व्यक्तीने प्रवेश केला. त्याचे नाव भारतीय राजकारणातील पितामह-दादाभाई नौरोजी.

4 सप्टेंबर, 1825 रोजी दादाभाईंचा जन्म मुंबईत झाला. शिक्षण पूर्ण झाल्यावर एलफीन्स्टन कॉलजमध्ये ते गणिताचे प्रोफेसर होते. एलफीन्स्टनमध्ये प्रोफेसर होण्याचा भारतीय लोकांत त्यांनाच पहिला मान मिळाला. 1852च्या बॉम्बे असोसिएशनच्या स्थापनेनुसार ते 1885च्या राष्ट्रीय सभेच्या स्थापनेपर्यंतच्या इतिहासाचेही दादाभाई पितामह आहेत. तत्पूर्वी कामा कंपनीच्या कामानिमित्त ते इंग्लंडला गेले व पुढे या व्यापाराच्या देशात त्यांनी व्यापार करण्याचे साहस करून स्वतःची दादाभाई नौरोजी आणि कंपनी  स्थापन करून इंग्लंडमध्ये चंचूप्रवेश केले.

दादाभाईंना भारतीय राजकारणातील पितामह म्हणतात, तसेच ते भारतीय अर्थकारणाचेही पितामह होते. देश पारतंत्र्यात असताना त्यांनी भारतीयांचे दरडोई उत्पन्न अवघे 20 रु. असल्याचे सिद्ध केले. त्यावेळी इंग्रस सरकार कैद्यांवर दरडोई 30 रुपये खर्च करत होते. म्हणजे भारतीयांचे उत्पन्न कैद्यापेक्षाही कमी होते. याला कारण इंग्रजांची अर्थनीती. यावर भाष्य करताना दादाभाईंनी सांगितले की, गझनिच्या मुहम्मदाने 18 स्वार्‍यांत जेवढी लूट केली नव्हती ती अवघ्या एका वर्षात (तीन लाख पौंड) इंग्रजांनी केली. ही लूट थांबायची असेल, तर त्यांनी स्पष्टच सांगितले होते की, व्हॉईसरॉय व सेनापती असे काही वरिष्ठ अधिकारी सोडून बाकीच्या अधिकारपदांवर हिंदी लोकांचीच नेमणूक करावी, अशी त्यांनी मागणी केली. राष्ट्रीय सभेच्या स्थापनेनंतर काही वर्षांनीच जहाल मवाळ मतभेद वाढले. दादाभाईंचा ब्रिटिश न्यायबुद्धीवर विश्‍वास होता. साहजिकच ते मावळ म्हणून ओळखले याजचे. परंतु, जहालांमध्येच त्यांना अतिशय मानाचे स्थान होते. परिणामी, 1906 मध्येच राष्ट्रीय सभा दुभंगण्याची स्थिती निर्माण झाली असताना मावळ्यांनी राजकीय खेळी करून दादाभाईंना अध्यक्ष केले. तेव्हा जहालांचा जहालपणा ओसरला. परंतु, याच अधिवेशनात दादाभाई स्वतःच जहाल झाले, त्यातच 1905 च्या बंगालच्या फाळणीमुळे व कर्झनशाहीमुळे त्यांचा ब्रिटिश न्यायबुद्धीवरील विश्‍वास उडाला. जहालांचा स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार हा संदेश त्यांनी जपला. व चळवळ करा, चळवळ करा व अखंड चळवळ करा असा संदेश तरुणांना दिला. तथापि, दादाभाईंनी 5 जुलै, 1892 रोजी तो घडवला तो पाहणे फारच महत्त्वाचे आले.

भारताच्या दारिद्य्राला ब्रिटिशच कारणीभूत आहेत. हे इंग्लंडच्या लोकांना समजण्यासाठी कॉमन्समध्ये निवडून गेले पाहिजे, असे त्यांना वाटे. तथापि, एका काळ्या माणसाला ब्रिटिश पार्लमेंटमध्ये प्रवेश देणे हे गोर्‍या मनोवृत्तीच्या इंग्रजांना सहजासहजी पचण्यासारखे नव्हते. त्यामुळे 1886च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. 1892च्या निवडणुकीत लिबरन पक्षातर्फे फिन्सबरी या मतदार संघातून दादाभाई उभे होते. त्यावेळी ब्रिटनचे पंतप्रधान लॉर्ड सॉल्सबरी व त्यांच्या हुजूर पक्षाने लिबरन पक्षाने एका काळ्या माणसाला उमेदवार म्हणून उभे केल्याने निषेध केला होता. तसेच काळा-गोरा असा जहरी प्रचार सुरु केल्याने लिबरन पक्षातूनच एक गोरा उमेदवार निवडणुकीला उभा राहिल्याने दादाभाईंपुढे एक नवे आव्हान उभे राहिले. परंतु, त्याने माघार घेतल्याने फिन्सबरी मतदारसंघातून दादाभाई अवघ्या तीन मतांनी निवडून आले. आणि... 5 जुलै 1892 रोजी भारतीयांच्या दृष्टीने एक इतिहास घडला. एक कृष्णवर्णीय भारतीय माणूस ब्रिटिश पार्लमेंटमध्ये निवडून आला. हा इतिहास घडिवणारे दादाभाई हे पहिलेच भारतीय.

अवश्य वाचा

शिघ्रे नदी बनलेय डंम्पिंग.