हिंदी भाषा म्हणजे त्यांचा जीव की प्राण. 1917 साली प्रयाग येथे हिंदी साहित्य संमेलनाची बैठक होती. या बैठकीस जाण्यस संस्थानिकांनी रजा मंजूर न केल्याने नाभा संस्थानातील कायद्याच्या पदाचा राजीनामा देणारे हिंदीप्रेमी राजर्षी पुरुषोत्तमदास टंडन हे होय. त्यांचा जन्म 1 ऑगस्ट 1882 रोजी अलाहाबाद येथे झाला.

अलाहाबादच्या सी.ये.व्ही. शाळेत प्रवेश घेतला. तेथून एम.ए. इतिहासाच्या बरोबर कायद्याची ही पदवी त्यांनी संपादन केली. तो काळ आणि त्या काळातील विद्यार्थी स्वदेशप्रेमाने भारावलेले. अशाच एक भारावलेल्या वातावरणात विद्यार्थी असतानाच ते लखनौ अधिवेशनात साधा स्वयंसेवक म्हणून काँग्रेसमध्ये दाखल झाले. स्वयंसेवक ते काँग्रेसचा अध्यक्ष असा 80 वर्षांचा प्रवास त्यांनी जीवनात केला. त्यात विधानसभा अध्यक्ष, खासदार अशी अनेक पदे त्यांनी भूषवली. 1920च्या असहकार आंदोलनात उडी घेतल्यानंतर गांधीजींच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणूनच आपल्या वकिलीचा त्याग केला. परिणामी, ते आणि त्यांचे कुटुंबीय अत्यंत हलाखीचे जीवन जगत असत. अगदी 1956 सालापर्यंत त्यांनी हलाखीचे दिवस काढले. या काळात उद्योगपती नामनालाल बजाज यांनी देऊ केलेली आर्थिक मदतही नाकारली.

स्वातंत्र्याच्या लढ्यात त्यांचे योगदान गांधी, नेहरू यांच्याइतकेच आहे. 1920च्या असहकार  चळवळीपासून त्यांचा काँग्रेसमधील सहभाग  वाढू लागला. तत्पूर्वी, 1919च्या जालियनवाला बाग हत्याकांडासंबंधातील चौकशी समितीवर त्यांनी काम केले. 1962 साली त्यांनी केंद्रीय किसान संस्थेची स्थापना करून जमीनदार व सावकारांच्या कचाट्यातून शेतकर्‍यांची सुटका करण्यासाठी चळवळ उभारली. त्यात त्यांना कारावास घडला. सत्तेचा मोह त्यांना कधी झाला नाही. केवळ पं. नेहरुंच्या आग्रहाखातर त्यांनी 1936ची निवडणूक लढवली. पण, मुख्यमंत्री होण्यास मात्र नकार दिला. 1942च्या ‘छोडो भारत’च्या चळवळीत त्यांनी हिरीरीने भाग घेतला व त्यांना कारावास भोगावा लागला. तेव्हा ते आजारी होते. इंग्रज त्यांना मुक्त करणार होते, पण काही अटींवर. कोणत्याही अटीवर त्यांनी मुक्तता करून घेण्यास त्यांनी नकार दिला. 1946 साली त्यांनी नियुक्ती भारतीय घटना परिषदेवर झाली.

14 ऑगस्ट 1947 रोजी देश दुभंगल्याने त्यांना तीव्र दुःख झाले. परिणामी, 15 ऑगस्ट या दिवशी होणार्‍या सार्‍या समारंभांपासून ते गांधीजींप्रमाणे दूर राहिले. हिंदू-मुस्लिम ऐक्याचे ते कट्टर पुरस्कर्ते होते. या दोन्ही समाजाच्या लोकांनी एकाच गल्ली मोहल्ल्यात राहून सामाजिक देवाण-घेवाण करावी म्हणजे जातीय दुरावा वाढणार नाही, असे त्यांचे विचार होते; परंतु दोन्ही समाजाच्या सैतानी वृत्तीमुळे त्यांचे मन विटले. पुढे लोकाग्रहास्तव निवडणूक लढवल्या. लोकसभा आणि राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून आले. तत्पूर्वी, नेहरुंचे पाकिस्तानविषयक धोरण त्यांना मान्य नसल्याने काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा त्यांनी राजीनामा दिला. 1956 पासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी सार्वजनिक जीवनातून निवृत्ती पत्करली. राजर्षी टंडनजींनी हिंदी भाषेची जी सेवा केली, यासाठी हा देश सदैव त्यांचा ऋणी राहील. हिंदीला राष्ट्र भाषेचा दर्जा मिळाला. शासकीय व्यवहार हिंदीतून व्हावे, हिंदीला प्रतिष्ठा मिळावी व तिच्या प्रचारासाठी त्यांनी आपार मेहनत घेतली. हिंदी साहित्य संमेलनाची स्थापना करून अलाहाबाद येथे हिंदी भवन उभारले. अभ्युदय नावाचे हिंदी वर्तमानपत्रही त्यांनी चालवले. अलाहाबाद येथे हिंदी विद्यालय स्थापन केले. या विद्यालयाचे पहिले आचार्य ते स्वतः होते. त्यांच्या हिंदी भाषेच्या प्रेमामुळे ते संकुचित भाषावादी होते, अशी टीका त्यांचे विरोधक  करीत असत. परंतु, देशाच्या एकात्मतेसाठी हिंदी आवश्यक आहे, असे त्यांना वाटे.

राजर्षी हे नाव त्यांना गांधीजींनी दिले. 1961 साली ‘भारतरत्न’ हा किताब खुद्द राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांना दिला. 2 जुलै 1962 रोजी ते अनंतात विलीन झाले.

अवश्य वाचा